कधी पालटेल चित्र?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2016 02:16 AM2016-07-26T02:16:27+5:302016-07-26T02:16:27+5:30

तमाम भारतीयांचे कोणत्या एका बाबीवर एकमत असेल, तर ते म्हणजे शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे आणि त्यांना हलाखीच्या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी खूप काही

Ever painted picture? | कधी पालटेल चित्र?

कधी पालटेल चित्र?

Next

तमाम भारतीयांचे कोणत्या एका बाबीवर एकमत असेल, तर ते म्हणजे शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे आणि त्यांना हलाखीच्या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी खूप काही व तेदेखील तातडीने करणे आवश्यक आहे! ज्या शेतकऱ्यांनी १९७० च्या दशकात हरितक्रांती घडवून, अन्नधान्यासाठी भिकेचा कटोरा घेऊन जगापुढे तोंड वेंगाडणाऱ्या या देशाला स्वयंपूर्णच नव्हे तर निर्यातदार बनविले, त्या शेतकऱ्यावर आज आत्महत्त्येची पाळी येण्यामागील नेमक्या कारणांचा शोध अद्यापही कुणालाच घेता आलेला नाही. देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला खरा; पण ज्यांनी हा चमत्कार घडवून आणला, त्यांच्या पदरात काहीही पडले नाही, ही दुर्दैवी असली तरी वस्तुस्थिती आहे. आता २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या बाता केल्या जात आहेत. उत्पन्न दुप्पट करण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक उत्पादन दुप्पट करणे किंवा दर दुप्पट करणे! दुसरी शक्यता दुरापास्त असल्याने उत्पादन दुप्पट करावे लागेल. त्यासाठी देशातील कृषी संशोधन संस्थांना संशोधनाच्या क्षेत्रात चमत्कार घडवून आणावा लागेल. हरितक्रांतीच्या वेळी तसे घडले पण कृषी संशोधन संस्थांना यामध्ये सातत्य राखता आले नाही. कृषी संशोधन संस्थांची कामगिरी खालावण्यामागील कारणांचा शोध घेतला असता, असे निदर्शनास येते की हरितक्रांतीनंतर नव्या संशोधनाला, नव्या तंत्रज्ञानाच्या निर्मितीला जणू काही ग्रहणच लागले. त्यामागचे कारण म्हणजे, या संस्थांना ज्या प्रमाणात वित्त पुरवठा व्हायला हवा होता, त्या प्रमाणात तो झाला नाही. उपलब्ध आकडेवारीनुसार, २०१० मध्ये भारताने कृषी जीडीपीचा ३१ टक्के हिस्सा संशोधनावर खर्च केला होता. त्याच वर्षी चीनने जवळपास ६० टक्के हिस्सा, तर बांगलादेशसारख्या अविकसित देशानेही ३८ टक्के हिस्सा संशोधनावर खर्च केला. हुशार विद्यार्थ्यांचा कृषी क्षेत्राकडे कल नसणे, हे कृषी संशोधनाला खीळ बसण्याचे दुसरे प्रमुख कारण आहे. तेव्हा सरकारला खरोखरच कृषी क्षेत्रातील उत्पादन दुप्पट करावयाचे असेल, तर या दोन बाबींकडे तातडीने लक्ष पुरविणे आवश्यक आहे. अर्थात तेवढेच पुरेसे नाही. पाणी व विजेची उपलब्धता हे आणखी दोन महत्त्वपूर्ण पैलू आहेत. या सगळ्यांची सांगड नीट जुळली तरी, मागणीच्या तुलनेत उत्पादन वाढले की दर कोसळतात, हा अर्थशास्त्रामधील महत्त्वाचा सिद्धांत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याच्या वाटेत आडवा येईलच! थोडक्यात काय, तर शेतकऱ्याचे दिवस पालटण्याची चिन्हे काही दृष्टिपथात नाहीत, असेच म्हणावे लागेल!

Web Title: Ever painted picture?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.