प्रत्येक घरात ‘अर्जुन’ जन्माला यावा

By admin | Published: January 10, 2016 02:58 AM2016-01-10T02:58:55+5:302016-01-10T02:58:55+5:30

कठीण असतं स्वत:ची समजूत काढणं. म्हणजे स्वत:च्या मनासारखं जगणं याला स्वत:ची समजूत काढणं, असं जर आपण म्हणत असू तर घोळ आहे. दुसऱ्याला काय हवं आहे हा विचार करत

Every house should be born 'Arjun' | प्रत्येक घरात ‘अर्जुन’ जन्माला यावा

प्रत्येक घरात ‘अर्जुन’ जन्माला यावा

Next

- पराग कुलकर्णी

कठीण असतं स्वत:ची समजूत काढणं. म्हणजे स्वत:च्या मनासारखं जगणं याला स्वत:ची समजूत काढणं, असं जर आपण म्हणत असू तर घोळ आहे. दुसऱ्याला काय हवं आहे हा विचार करत स्वत:मध्ये बदल घडवणं, याला स्वत:ला समजावणं असं म्हणतात. असं निदान मलातरी वाटतं. आपल्या आयुष्याचा अधिक वेळ दुसरा आपल्याबद्दल काय विचार करतो हा विचार करण्यात जातो. आपण मात्र समोरच्याचा विचार करून वागत नाही; आणि वागलो तरी त्याला त्याची जाणीव करून द्यायची एकही संधी सोडत नाही. बघा विचार करून.

नाही म्हणायला शीक.. नाही म्हणायला शीक.. सकाळी शेजारच्या काकूंचा आवाज कानावर पडला आणि खडबडून जाग आली. माफ करा ‘काकू’ नाही. ‘काकू’ हा शब्द पुण्यासारख्या थोर संस्कृतीतून नाहीसा होताना दिसतोय तर मुंबई आणि इतर महानगरांचं काय विचारता. असो, वीणा आपल्या मुलावर म्हणजेच अर्जुनवर रागावत होती. ‘नाही म्हणायला शीक..’ म्हणून त्याची समजूत काढत होती. आता आली का पंचाईत! स्वत:मधला बदल घडवून आणायला या वर्षी ‘नाही’ हा शब्द खोडून काढायचा मनसुबा असताना हा ‘नाही’ ‘नाही’ ‘नाही’चा गोळीबार कुणावर आणि का होतोय हे ऐकून मी जखमी झालो. काय कारण असावं एका आईनं आपल्या मुलावर ‘नाही बोलायला शीक’ म्हणून संस्कार करण्याचं. व्यसन? पैसा? महागडा शौक? माफ करा पण ‘नाही’. दहावीनंतर तिच्या मुलाला सैन्याची वाट धरायची होती. त्यांचा चार-पाच मित्रांचा ग्रुप होता. त्यांनी एकत्रितपणे हा निर्णय घेतला होता. ‘मी माझ्या मित्रांना नाही म्हणणार नाही. मलाही सैन्यात जायचं आहे.’ अर्जुनचा हा निर्धार त्याची आई खोडून काढत होती. का? पठाणकोटमध्ये जे जवान शहीद झाले त्यांच्या परिवाराचे फोटो बघून? की दिवाळी, दसऱ्याच्या दिवशी आपला मुलगा घरात नसेल म्हणून ?
कशी गंमत आहे बघा. हो! गंमतच म्हणीन मी. इतकी वर्षे अशा घटना घडत आहेत. जवान शहीद होत आहेत. त्या वेळी ती बातमी वाचताना आपली काय प्रतिक्रिया असते? वाईट वाटतं. राज्यकर्त्यांचा राग येतो. ‘एकदाच काय तो निकाल लावून टाका’ म्हणून ट्रेनमध्ये, चहाच्या टपरीपासून ते मोठमोठ्या आॅफिसात वातानुकूलित खोलीत चर्चा होते. पण ज्या दिवशी स्वत:च्या घरात सैनिक जन्माला येतो तेव्हा काय? त्या वेळी एक शब्द अगदी सहज आपल्या तोंडून निघून जातो.. ‘सिक्युरिटी नाही रे तिकडे’. आजकाल ब्रह्मज्ञानाचा दृष्टांत झाल्याप्रमाणे प्रत्येकाच्या तोंडी ‘सिक्युरिटी’ हा शब्द आहे. म्हणजे ज्यासाठी खऱ्या अर्थाने सीमेवरचा सैनिक जागतो त्या ‘सिक्युरिटी’ या शब्दाला आपण घाबरतो.
कारगिलच्या वेळेची ही घटना आहे. मी एकटा मनालीला गेलो होतो. मला त्या वातारणाचा अनुभव घ्यायचा होता. मनालीच्या बायपास रोडवरून २७ मिलिटरी ट्रक एकामागून एक विशिष्ट गतीने जाताना मी बघितले. प्रत्येक ट्रकच्या आत आपले जवान होते. दिल्ली स्टेशन तर मिलिटरीच्या पोषाखांनी उजळून गेले होते. असे वाटत होते आत्ताच वसंत ऋतू इथे स्टेशनवर मुक्कामाला उतरला आहे. सगळं हिरवंगार! डेहराडुनला जाणाऱ्या एका ट्रेनमध्ये शिरणारा एक-एक सैनिक पहाडासारखा वाटत होता. अभिमानाने आणि गर्वाने छाती फुगून आली होती. त्याच ट्रेनमध्ये बसणारा हवाईदलाचा एक अधिकारी फलाटावर आपल्या मुलाची समजूत काढत होता. वीणाचा मुलगा अर्जुन याच्याच वयाचा होता तो मुलगा. मी लांब उभा होतो. काय समजावत असतील ते वडील आपल्या मुलाला? ‘मी परत आलो तर येईन’? की ‘मी नक्कीच परत येईन.’ काही अंतरावर त्या अधिकाऱ्याची पत्नी उभी होती आणि कौतुकाने दोघांना बघत होती. कौतुकाने बघत होती की आपल्या मुलाला ‘नाही’ म्हणायला कसं शिकवायचं याचा विचार करत होती?
उघड्या मालगाडीत, रणगाड्याच्या तोफेवर हिरवा जाड कपडा घालून त्याच्या खाली स्टोव्हवर अन्न शिजवणारे जवान बघितले आणि थक्क झालो. त्यांची गाडी सीमेवर जात होती आणि मी शहराकडे धावत होतो. आपण ‘कर’ भरतो ते देशाच्या सीमेचे रक्षण करायला हा विचार बरोबर; पण ‘कर’ भरतो म्हणजे आपल्या घरात सैनिक जन्माला येऊ नये याची ही फी भरतो. हा विचार कितपत योग्य आहे? देश जसा नागरिकांमुळे घडतो तसा सैनिकही घराघरांतून घडवावा लागतो. परत आपण कुठे अडकतो? सुरुवात माझ्यापासून नाही शेजारच्या घरातून व्हायला हवी.
मला खात्री आहे की, दिल्ली स्टेशनवरच्या त्या अधिकाऱ्याची पत्नी ज्या सकारात्मक विचारांनी आपल्या नवऱ्याला आणि मुलाला बघत होती, तितक्याच सकारात्मक दृष्टीने आज विश्वाचा निर्माताही त्याने निर्माण केलेल्या जगाकडे बघत नसेल. तिच्या विचारात आणि त्या अधिकाऱ्याच्या समजावण्यात जर ‘नाही’ असता तर आपण ते
युद्ध जिंकलो असतो? बदलायला हवं.. स्वत:ला आणि आपल्या विचारांना. उद्या पठाणकोटसारखी घुसखोरी आपल्या घरात घडली तर आपण काय करणार? सोसायटीच्या ‘सिक्युरिटी’ला कामावरून कमी करणार? आणि आणखीन चार सीसीटीव्ही कॅमेरे लावणार? हे सगळं नंतर होईल हो. त्याआधी शत्रूचा विरोध तर करायला हवा. आणि त्यासाठी प्रत्येक घरात ‘अर्जुन’ हवा.
तो घरातही हवा आणि घरातून सीमेवरही जायला हवा. त्यासाठी स्वत:कडच्या ‘सकारात्मक’ हत्यारांनी बुरसट विचार व तो ‘सिक्युरिटी’ नावाचा असुर कापून काढायला हवा. देशासाठी प्राण त्यागलेल्या प्रत्येक जवानासाठी हीच खरी नवीन वर्षाची
भेट असेल. भेटच म्हणायला हवी. ‘श्रद्धांजली’ त्यांना वाहिली जाते ज्याचं अस्तित्व नाहीसं होतं. देशासाठी प्राण त्यागलेला प्रत्येक जवान आज आपल्या श्वासात जिवंत आहे. कारण त्याच्यामुळे आपला श्वास ‘श्वास’ म्हणून जिवंत आहे. म्हणून प्रत्येक श्वासात ‘सकारात्मकता’ हवी. त्या ‘सकारात्मक’ विचारातून ‘माझ्या’ घरात सैनिक जन्माला यायला हवा!

(डोंबिवली फास्ट, गैर, पोर बाजार, सांगतो ऐका, असे अनेक सुपरहिट चित्रपट आणि लागी तुझसे लगन, इस देस ना आना लाडो, लक्ष, देवयानी, पोलीस फाईल्स, युनिट ९, या सुखांनो या, यासारख्या हिंदी-मराठी मालिकांचे लेखन परागने केले आहे. )

Web Title: Every house should be born 'Arjun'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.