शहराचे सौंदर्य राखणे प्रत्येकाचेच कर्तव्य

By संजय वाघ | Published: January 18, 2018 03:27 AM2018-01-18T03:27:34+5:302018-01-18T03:27:41+5:30

शहरांच्या मानगुटीवर बसलेले फलकांचे भूत आता कायमस्वरूपी उतरविण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे.

Everyone's duty is to maintain the beauty of the city | शहराचे सौंदर्य राखणे प्रत्येकाचेच कर्तव्य

शहराचे सौंदर्य राखणे प्रत्येकाचेच कर्तव्य

googlenewsNext

सागरी किनारपट्टीवरून निघालेले मोसमी वारे एकवेळेस उशिरा पोहचतील, एखाद्या रोगाचा संसर्ग होण्यास थोडा-फार विलंब होऊ शकेल मात्र फलकांचे वारे इतक्या अफाट वेगाने शहर व गावातील चौकांना व्यापतील याची कुणी कल्पनादेखील केलेली नसावी. हल्ली फलकांचा जो सुळसुळाट झालेला आहे, तो शहर किंवा गावाचे विद्रुपीकरण तर करीत आहेच; पण याचबरोबर माणसाला असलेली प्रसिद्धीची हाव कोणत्या थरापर्यंत घेऊन जाऊ शकते, याचे उत्तम प्रत्यंतर सर्वसामान्य जनतेला येत आहे. शहरांचे सौंदर्य अबाधित राखण्यास स्थानिक कारभारी कमी पडले म्हणून आता खुद्द उच्च न्यायालयानेच फेब्रुवारीपर्यंत शहरे फलकमुक्त करण्याचा बडगा उगारल्याने राज्यातील महानगरपालिका प्रशासनाचे धाबे दणाणले.
पूर्वी खेडेगावात एखादी गोष्ट लोकांना माहिती व्हावी यासाठी गावातील मुख्य चौकातून दवंडी दिली जायची. कालौघात दवंडीची प्रथा बंद पडली. त्याची जागा माहिती पुरविणाºया फलकांनी घेतली. या फलकांच्या माध्यमातून एखादा कार्यक्रम अथवा घटनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचविली जायची. कालांतराने या फलकांचा अतिरेक झाला. महनीय व्यक्तींच्या जयंती-पुण्यतिथीनिमित्त काही कार्यक्रम झाल्यास त्याची माहिती अन्य भागातील लोकांना प्रसिद्धी माध्यमाच्या मार्गाने दुसºया दिवशी व्हायची. जग झपाट्याने बदलत चालले आहे त्यासोबत प्रसिद्धीलोलुप राजकीय नेत्यांच्या मानसिकतेतही आमूलाग्र परिवर्तन होऊ लागले आहे. पूर्वीच्या माहिती फलकांची जागा आता जाहिरात फलकांनी घेतली आहे. आता तर फलकांची ही कल्पना एवढी स्वस्त झालेली आहे, की सामाजिक कामाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेली व आपल्या गल्लीव्यतिरिक्त शेजारच्या गल्लीत ज्यांची तोंडओळख नाही अशी मिसरूड न फुटलेली मुलेदेखील प्रसिद्धीच्या हव्यासापायी दोन-चार मित्रांकडून वर्गणी गोळा करून आपल्या नावाचा छायाचित्रासह फलक चौका-चौकांत लावू लागले आहेत. कौटुंबिक वातावरणापुरतेच मर्यादित असलेल्या अभीष्टचिंंतन सोहळ्याला जाहीर स्वरूप देणे हे कोणत्या चौकटीत बसते? असे फलक लावण्यामागे सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा हेतू संबंधितांचा असला तरी त्यातून सकारात्मक असे फारसे काहीही निष्पन्न होणारे नाही. उलट यातून स्वच्छ, सुंदर व हरित शहराला विद्रूप होण्याचाच धोका अधिक आहे. अशा फलकांच्या सुळसुळाटामुळे बाजारपेठ, रस्ते व चौक अधिक कुरूप होत चालले असून, जागा दिसेल त्याठिकाणी फलक लावण्याच्या अट्टाहासामुळे महत्त्वाची कार्यालये, दुकानांची नावे व चौकाचौकांतील देशभक्तांचे पुतळे झाकोळले जात आहेत. फलक लावण्यावरून व तो फाटल्यावरून दोन गटांत हाणामारीचे प्रकारही वाढीस लागत आहेत. बºयाचदा रस्त्याच्या मधोमध किंवा एखाद्या वळणावर लावलेल्या फलकांमुळे कोठे ना कोठे छोटे-मोठे अपघाताचे प्रकार घडत आहेत.
शहराच्या सौंदर्यास बाधा आणणारे, दोन गटातील कार्यकर्त्यांची मने कलुषित करणारे, अपघातास निमंत्रण देणारे हे फलक समाजोपयोगी ठरण्याऐवजी डोकेदुखी ठरू पाहत आहेत. नेत्यांनी व लोकप्रतिनिधींनी सामाजिक स्वास्थ्याचा व शहराच्या सौंदर्याचा विचार करून आपापल्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या भावनांना आवर घालणे गरजेचे आहे. तसेच अनावश्यक फलकांवर अनाठायी खर्च करण्यापेक्षा त्या रकमेतून आधाराश्रमातील निराधार व उपाशी जीवांना एकवेळचे भोजन दिले तर त्यांचा दुवा तरी मिळू शकेल.
- संजय वाघ

 

Web Title: Everyone's duty is to maintain the beauty of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.