म्हणे ईव्हीएमच दगाबाज !

By सचिन जवळकोटे | Published: May 17, 2018 03:31 AM2018-05-17T03:31:41+5:302018-05-17T09:44:09+5:30

​​​​​​​जगापासून संपर्क तुटलेली दुर्गम वस्ती म्हणजे डोंगरकपारीतली इरसालवाडी. अशा या वाडीत भलतंंच आक्रित घडलेलं. वस्तीमागच्या दाट जंगलात एक विचित्र वस्तू भावड्याला सापडलेली. छोट्याशा सुटकेसच्या आकाराचं कसलं तरी यंत्र घेऊन भावड्या पाराजवळ आला, तेव्हा तिथल्या रिकामटेकड्या कंपूला नवा विषय मिळाला.

EWMCH Dangerous! | म्हणे ईव्हीएमच दगाबाज !

म्हणे ईव्हीएमच दगाबाज !

Next

- सचिन जवळकोट
जगापासून संपर्क तुटलेली दुर्गम वस्ती म्हणजे डोंगरकपारीतली इरसालवाडी. अशा या वाडीत भलतंंच आक्रित घडलेलं. वस्तीमागच्या दाट जंगलात एक विचित्र वस्तू भावड्याला सापडलेली. छोट्याशा सुटकेसच्या आकाराचं कसलं तरी यंत्र घेऊन भावड्या पाराजवळ आला, तेव्हा तिथल्या रिकामटेकड्या कंपूला नवा विषय मिळाला.
‘आरं ये भावड्या ऽऽ कुठून उचलुनशान आन्लास रं हे डबडं?’ नाकातलं बोट गराऽऽ गरा फिरवत नाम्यानं विचारलं. तेव्हा भावड्या खेकसला, ‘जंगलातल्या चिखलामंदी गावली तसं घिवुनशान इकडं आलूया.’
‘पन ही कोन्ची मशीन म्हनायची रं? रेडू तर नाय वाटत लगाऽऽ,’ कानातला मळ काढत ग्यानबानं अक्कल पाजळली. ‘पन बटणं-बिटणं हायती की हिला. छोटा टीवी तर नाय ना?’ गण्याही नवनवे शोध लावू लागला.
एवढ्यात एकानं वरचं बटण दाबलं तसं यंत्रावर फुलाचं चित्र दिसू लागलं. दोघंजण घाबरून मागं सरकले... तर तिघंजण उत्सुकतेनं पुढे सरसावले. ‘आरं ऽऽ ह्यो तर कॅमेरा हाय वाटतं. बटण दाबलं की, समोरच्या धोतऱ्याच्या झाडावरचं फूल दिसतंया याच्यामंदी.’ भावड्याच्या डोक्यात नवा प्रकाश पडला. मात्र, किसन्याच्या डोक्यात वेगळीच वीज चमकली. ‘आरं खुळ्यांनुऽऽ ह्ये धोतºयाचं नाय.. कमळाचं फूल हाय कमळाचं.’
कधीतरी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन आलेल्या अर्धशिक्षित सुभ्यानं मात्र पटकन ही वस्तू ओळखली. ‘ह्याला इलिक्शानचं होटिंग मशीन म्हंत्याती भावाऽऽ. इकडं बटण दाबलं की, तिकडं पीयेम् फिक्स. सीयेएमचं नावबी फायनल.’ तेव्हा भावड्याची छाती उगीचंच फुलून आली. ‘तरुणांनोऽऽ, देशाचं भवितव्य आता तुमच्याच हाती!’ असं कुणीतरी कधीतरी म्हटल्याचं त्याला आठवलं. त्यानं खाडकन दोन नंबरचं बटण दाबलं. मात्र, पुन्हा फुलाचंच चित्र झळकू लागलं.
‘ह्ये कसलं इक्रित म्हणायचं गड्याऽऽ? पैलं बटण दाबलं, कमळ आलं. दुसरं बटण दाबलं, पुनांदा कमळच आलं.’ गण्या चित्कारताच नाम्यानं धडाऽऽधडा सर्व बटण दाबली..पण काय सांगावं? प्रत्येकवेळी कमळाचंच चिन्ह. हे पाहून चाँदचे डोळे विस्फारले, तर चंद्याचे डोळे लकाकले. सुभ्यानं खिशातला भजीचा पुडा उघडला. त्यातल्या कागदावरची बातमी त्यानं जोरात वाचून दाखविली. ‘कमळवाल्यांचा ईव्हीएम् घोटाळा. उद्धोंचा शोध. राजचा आरोप.’
... ‘म्हंजी ह्ये मशीन गद्दार हाय तर?’ गण्यानं शंका व्यक्त केली, तेव्हा सुभ्यानं डोकं खाजवत अजून एक पिल्लू सोडलं, ‘काय सांगता येत नाय रं त्या कमळवाल्यांचं.. पन लगाऽऽ मशीनमंदी त्यांनी घोळ करूनशान ठिवला आसलं तर मग कर्नाटकामंदी त्यांना आठ आमदार का कमी पडल्याती? म्हंजी या मशीननं त्यांच्यासंगंबी गद्दारी केली म्हनायची की तिथं !’
या प्रश्नावर सारेच डोके खाजवू लागले. कुणालाच उत्तर सापडलं नाही. असो, दोन दिवसांपासून या प्रश्नानं बंगलोर अन् दिल्लीतही अनेकांचं डोकं खाल्लंय. नेत्यांचा भेजा पार आऊट झालाय. कुणाकडं असेल याचं उत्तर.. तर त्यानं जाहीर करावं.
( टीप : इरसालवाडीत सापडलेली ही
वस्तू म्हणजे ‘लोटस’ कंपनीचं लहान
मुलांचं खेळणं होतं. उगाच निवडणूक यंत्रणेचा तिसरा डोळा आम्हा पामरावर नको.)

Web Title: EWMCH Dangerous!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.