ही दुही मोदींवर उलटणारीच...

By admin | Published: March 13, 2016 10:03 PM2016-03-13T22:03:42+5:302016-03-13T22:03:42+5:30

रायपूर या छत्तीसगडच्या राजधानीलगत असलेल्या कुचना या छोट्याशा गावातील चर्चवर हिंदुत्ववादी म्हणविणाऱ्या समूहाने जबर हल्ला करून तेथे प्रार्थनेत गढलेल्या स्त्रीपुरुषांना बेदम मारहाण केली

This is exactly the opposite of Modi ... | ही दुही मोदींवर उलटणारीच...

ही दुही मोदींवर उलटणारीच...

Next

रायपूर या छत्तीसगडच्या राजधानीलगत असलेल्या कुचना या छोट्याशा गावातील चर्चवर हिंदुत्ववादी म्हणविणाऱ्या समूहाने जबर हल्ला करून तेथे प्रार्थनेत गढलेल्या स्त्रीपुरुषांना बेदम मारहाण केली. त्याचवेळी त्या प्रार्थनास्थळाची नासधूस करून तेथील येशूच्या मूर्तीचीही तोडफोड केली. हा हल्ला झाल्यानंतर थोड्याच वेळात त्या राज्याच्या रमणसिंह सरकारने त्याची गंभीर दखल घेत या हल्लेखोरांपैकी सात जणांना ताब्यात घेतले आणि त्यातल्या इतरांचाही शोध आता सरकारने चालविला आहे. हिंदुत्ववादी हल्लेखोर हल्ला चढवितात आणि भाजपाचे सरकार त्याची तत्काळ दखल घेते ही गोष्ट प्रथमच घडत असल्यामुळे आपण तिची प्रशंसा केली पाहिजे. एरव्ही अशा हल्ल्यांचे समर्थन करण्यात किंवा त्याविषयी मौन बाळगण्यातच तो पक्ष व त्याचा परिवार धन्यता मानत असतो. एकेकाळी ओडिशामध्ये या हल्लेखोरांनी ख्रिश्चनांची १२०० पूजास्थाने जाळली तर कर्नाटकात ६००. मात्र त्यावेळी केंद्रात काँग्रेसचे सरकार होते आणि या राज्यात भाजपा व त्याचे संमिश्र मंत्रिमंडळ अधिकारारुढ होते. पुढच्या काळात ओडिशाच्या नवीन पटनायकांनी भाजपाच्या लोकांना आपल्या सरकारातून बाहेर काढले. तर कर्नाटकच्या जनतेने त्या पक्षाचा सरळ पराभवच केला. भाजपाच्या अशाच हुच्च वागणुकीमुळे बिहारच्या नितीशकुमारांनीही त्या पक्षाला आपल्या सरकारबाहेर काढले व परवाच्या निवडणुकीत त्याचा दारूण पराभवही केला. बाबरीचा प्रयोग एकदा यशस्वी झाला की तो नेहमी व सर्वत्रच यशस्वी होईल असे नाही. कधीतरी भाजपाच्या सरकारला त्याच्या बचावासाठी नसले तरी प्रतिमेसाठी रमणसिंहांसारखे स्वपक्षातील अतिरेक्यांना आवर घालायला पुढे यावे लागेल. गोहत्त्या, गोमांस, आंतरधर्मीय लग्ने वा प्रेम यावरून उभे केले जाणारे वाद धार्मिक नसून राजकीय असतात आणि त्यांचा उद्रेक आपले राजकारण पुढे रेटण्यासाठी केला जातो हे वास्तव आता देशाला कळून चुकले आहे. अशा उद्रेकांना खतपाणी घालण्यात भाजपा व तिचे केंद्र सरकार यांचा हात असतो ही गोष्टही आता लपून राहिलेली नाही. कायद्याचे काळे कोट अंगात घातलेल्या भाजपाच्या वकिलांनी दिल्लीतील न्यायालयाच्या परिसरात कन्हैयाकुमार व त्याच्या साथीदारांना जी मारहाण केली तिने हा सगळा इतिहास खराच ठरवून टाकला आहे. त्या पक्षाने आणलेला देशभक्तीचा आवही त्याचसाठी आहे. आम्हीच केवळ देशभक्त आहोत आणि बाकीचे सारे देशविरोधी आहेत असे सांगताना या पक्षाच्या सरकारांनी हार्दिक पटेल व कन्हैयाकुमार यांना तर देशविरोधी ठरविलेच पण तसा गुन्हा त्यांनी खुद्द राहुल गांधींविरुद्धही नोंदविला. भाजपाच्या बाजूने वेळीअवेळी बोलणाऱ्या अनुपम खेर या अभिनेत्यालाही या एकतर्फी अभिनिवेशाचा उबग येऊन अशा प्रचारी तोंडवळांना व हल्लेखोरांना पायबंद घालण्याची मागणी परवा सरकारकडे करावीशी वाटली. प्राची किंवा आदित्यनाथ यांची नावे खेर यांनी प्रत्यक्ष घेतली असली तरी त्यांचा रोख अशा सगळ्याच एकारलेल्या अतिरेक्यांवर आहे हे उघड आहे. देशाची प्रगती त्यातल्या शांततामय सुस्थितीवर अवलंबून आहे. नरेंद्र मोदी म्हणतात तसा ‘सबका साथ, सबका विकास’ येथे व्हायचा असेल तर देशाचे बहुसंख्याक व अल्पसंख्याक असे विभाजन करणे व त्यांच्यात वैर उभे करणे ही बाब चालणारी नाही. दुर्दैवाने बाबरी मशीद पाडल्यापासून संघ परिवार, भारतीय जनता पक्ष आणि त्यातील धर्मवेडाने पछाडलेले काही अतिरेकी यांनी असे विभाजन करण्याचेच प्रयत्न सातत्याने व संघटितपणे चालविले आहेत. देशात असलेले २७ कोटी अल्पसंख्याक त्यांना देशविरोधी दिसू लागले आहेत. त्यांना धडा शिकविण्याची धार्मिक जबाबदारी आपल्यावर आहे असेही त्यांना वाटत आहे. ओडिशात कुष्ठरोग्यांची सेवा करणाऱ्या ख्रिस्ती धर्मगुरूला त्याच्या मुलांसकट जिवंत जाळण्याचा अघोरी प्रकार जेव्हा घडला तेव्हा त्याची साऱ्या जगाने संतप्त दखल घेतली. भारतातही त्याचे अतिशय रोषपूर्ण प्रतिसाद उमटले. मात्र धर्मवेडाने पछाडलेल्या या मूठभर हिंदुत्ववाद्यांवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. उलट ओडिशातील ती हत्त्या हा आपला धर्मविजय आहे अशाच वेडसर समजात तो वर्ग तेव्हा राहिला व अजूनही तसाच आहे. ओडिशा ते दादरी, वेमुला ते कन्हैया आणि अलीगड ते अलाहाबाद येथे झालेल्या अशा घटनांमधील एकसूत्रता पाहिली की संघ परिवारातील अनेकांना देशाच्या धार्मिक विभाजनात रस आहे असेच वाटू लागते. झालेच तर त्यासाठी मोदींच्या विकास कार्यक्रमांच्या मार्गात अडथळे उभे करणे आणि समाजाचे लक्ष विकासाच्या मार्गावरून हिंसेच्या दिशेने वळविणे हेही त्यांना हवे आहे असेच त्यांचे सध्याचे वर्तन आहे. भाजपाला हेच हवे असले तरी ही दुही त्या पक्षाला राजकारणात तर साथ देणारी नाहीच पण समाजकारणातदेखील नाही हे त्याने गेल्या तीन-चार वर्षातील अनुभवांवरून ध्यानात घेतले पाहिजे. दिल्ली व बिहारमधील दारुण पराभवाला त्याच्या परिवाराचे दुहीचे राजकारण किती कारणीभूत ठरले याचा फार गंभीरपणे विचार त्याला करावा लागणार आहे. नव्या पिढ्यांना व त्यातल्या सुशिक्षित पदवीधरांना विकासाची संधी हवी आहे. त्यांना कोणत्याही हिंसाचारात वा धर्मवेडात रस नाही. ज्यांना तो आहे त्यांच्या बौद्धिक क्षमतेसमोर प्रश्नचिन्ह आहे. या प्रश्नांकितांना आवर घालणे हे मोदी सरकारएवढेच संघाच्या नेतृत्वाचेही काम आहे.

Web Title: This is exactly the opposite of Modi ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.