दुसऱ्यासाठी खोदलेला खड्डाच पाकला भोवला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2017 12:26 AM2017-02-22T00:26:09+5:302017-02-22T00:26:09+5:30
मागच्या आठवड्यात सुफी पंथीयांच्या सिंधमधल्या लालबादशहा शहाबाज कलंदर यांच्या दर्ग्यामध्ये झालेला दहशतवादी हल्ला
मागच्या आठवड्यात सुफी पंथीयांच्या सिंधमधल्या लालबादशहा शहाबाज कलंदर यांच्या दर्ग्यामध्ये झालेला दहशतवादी हल्ला २६/११च्या मुंबई हल्ल्याची आठवण करून देणारा होता यात शंकाच नाही. या हल्ल्यात सर्वात जास्त बळी मुस्लिमांचेच गेले आहेत. गेल्या पाच दिवसांमध्ये त्या देशात झालेला हा दहावा दहशतवादी हल्ला होता. ह्या आत्मघातकी बॉम्बस्फोटाची जबाबदारी इसिस या संघटनेने घेतली आहे. या हल्ल्यात जवळपास शंभर जणांना जीव गमवावा लागला, तर सुमारे २५० जण जखमी झाले होते. पाकिस्तानातील गेल्या काही दिवसांतील हा सर्वात भयंकर हल्ला आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी दहशतवादाविरोधात उघडलेल्या व्यापक मोहिमेत शुक्रवारी शंभरहून अधिक दहशतवादी ठार झाले आहेत. पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी अफगाणिस्तानमधल्या अतिरेकी दहशतवादी गटांना ह्या हल्ल्यासाठी जबाबदार ठरवले आहे आणि अफगाणिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राइक केल्याचा दावा पाकिस्तानने केलेला आहे. या हल्ल्यावरून दहशतवादाचा खड्डा पाकिस्तान दुसऱ्या देशांसाठी खणू पाहतो आहे त्यात तोच स्वत: कसा अडकला याचेच विदारक चित्र जगाला दिसलेले आहे. या अमानुष घटनेचे पडसाद उमटणे क्रमप्राप्तच आहे.
द नेशनमध्ये मियां रऊफ या स्तंभलेखकाचा लेख प्रकाशित झाला आहे. पाकिस्तानमध्ये आतंकवाद वाढण्याच्या कारणांची जी चर्चा त्या लेखात रऊफ यांनी केलेली आहे ती महत्त्वाची आहे. पाकच्या निर्मितीपासूनच तिथे अतिरेकी, असहिष्णू आणि धार्मिक कट्टरतावादी विचारांचे प्राबल्य राहिलेले आहे हे नमूद केले आहे. अफगाणिस्तानात आक्रमण केलेल्या रशियाला विरोध करण्यासाठी तिथे सशस्त्र लढा उभारला गेला आणि त्यातून तालिबानी शक्ती प्रबळ झाल्या असे सांगत या लढ्यासाठी अमेरिकेने अपरंपार शस्त्रे आणि साधनसामग्री तिथे ओतली होती याकडे रऊफ यांनी लक्ष वेधले आहे. त्यावेळचे पाकचे सर्वसत्ताधीश झिया उल हक यांनी जहाल आणि कट्टरतावादी इस्लामी शक्तींना दिलेले बळदेखील पाकमध्ये अतिरेक्यांच्या वाढीला कारणीभूत झाल्याचे ते सांगतात. पाकमध्ये असलेली निरक्षरता हा घटकदेखील महत्त्वाचा असल्याचे ते सांगतात. तिथे जेमतेम ५७ टक्के साक्षरता आहे आणि त्यामुळे अशिक्षित तरुण आणि बालकांची संख्या मोठी आहे. या गोष्टीदेखील अतिरेकी शक्तींच्या वाढीला कारणीभूत होत आहेत हे ते सांगत आहेत. रऊफ यांचे हे विश्लेषण अनेकांना फारसे नवीन वाटणारे नाही. पण ते एका पाकिस्तानी लेखकाने केलेले आहे हे महत्त्वाचे आहे.
डॉनमध्येच मोहसीन रझा मलिक यांच्या ‘पाकची युद्धभूमी’ या लेखात पाकमधल्या अतिरेकी दहशतवादी कारवायांसाठी दोन प्रकारची कारणे सांगितली जातात असे म्हटले आहे. त्यातल्या पहिल्या कारणात पाकने आजवर स्वत:च अतिरेकी दहशतवादी शक्तींना प्रोत्साहन दिलेले आहे आणि त्यामुळे तिथे कट्टरतावादी शक्ती वाढून अतिरेकी दहशतवादी वाढल्याचे म्हटले जाते. तर दुसऱ्या प्रकारच्या विश्लेषणात पाकमधल्या वाढत्या अतिरेकी कारवायांना प्रदेशातल्या विद्वेषी शक्तींना (म्हणजेच पाकच्या दृष्टीने मुख्यत: भारताला) जबाबदार धरले जात असते. या दोन्ही प्रकारच्या मतांची चर्चा करीत मलिक यांनी अखेरीस जो निष्कर्ष काढला आहे तो महत्त्वाचा आहे. मोहसीन मलिक म्हणतात की, आपल्या राष्ट्रीय उद्दिष्टांसाठीच देशाची सरकारे सशस्त्र अतिरेकी आणि दहशतवादी गटांची निर्मिती करीत असतात. हा आतंकवाद मुळासकट खणून काढायचा असेल तर पाकिस्तानला गांभीर्यपूर्वक परराष्ट्र धोरणांची आखणी करावी लागेल. तसेच आपल्या देशांतर्गत दहशतवादी शक्तींना समूळ उखडण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी अफगाणिस्तानमधल्या पाकविरोधी शक्तींचे प्राबल्य कमी करण्याचे प्रयत्नदेखील करावे लागतील. अर्थात मोहसीन मलिक यांनी पाकमधल्या वाढत्या दहशतवादी कारवायांचे खापर भारताच्या माथी फोडत पाकिस्तानने भारताला रोखण्यासाठी सक्रिय राहून प्रयत्न करावेत असे सांगितले आहे. हा हल्ला म्हणजे संपूर्ण देशावरचा हल्ला आहे असे सांगत जनतेने शांत रहावे असे आवाहन करीत पाकच्या लष्करप्रमुखांनी याचे रोखठोक उत्तर देण्याची भाषा वाचायला मिळते आहे. लगेचच पाकने अफगाणिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राइक केल्याचेदेखील प्रसारमाध्यमे सांगू लागली आहेत. सेहेवानला लालशहाबाज कलंदर यांच्या सुफी दर्ग्याचा उरुस सुरू आहे. त्या उरुसात अनेक कलावंत आपली सेवा लालशहाबाज यांच्यासमोर पेश करीत असतात. या हल्ल्यामुळे त्यात काहीसे विघ्न आले; पण तीन दिवसांमध्ये स्थिती पूर्वपदावर आल्याचे तेथील वृत्तपत्रांमध्ये वाचायला मिळते आहे. विशेषत: त्या कार्यक्रमांमध्ये शिमा खेरवानी या बंडखोर महिला आणि पुरोगामी विचाराच्या पाकिस्तानी कलाकाराने नृत्य आणि संगीताचे सादरीकरण करीत इतर महिला कलाकारांनीही तेथे येऊन कला सादर करण्याचे आवाहन केले आहे. पारंपरिक कट्टरतावादींनी महिलांवर बंधने आणण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे. त्यातूनच महिलांचे शिक्षण आणि त्यांच्या इतर सामाजिक व्यवहारांवर अनेक जाचक निर्बंध आणले जातात. अशावेळी शिमा खेरवानी यांचे हे धाडस महत्त्वाचे आहे. पाकच्या इंग्रजी भाषिक प्रसारमाध्यमांनी त्याची ठळक दखल घेतली आहे असे दिसते. देशावरचे रक्ताचे हे डाग आपण लवकरच पुसून टाकू अशी गजर्ना पाकचे लष्करप्रमुख बाजवा यांनी केली होती. त्यावर हे डाग असे लवकर धुतले जाणार नाहीत असे सांगत ह्या स्थितीचे जे विश्लेषण तिथल्या एक्स्प्रेस ट्रिब्युनमध्ये हाफसाह सर्फराज यांनी केलेले आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये पाकमध्ये झालेला हा दहावा अतिरेकी हल्ला आहे असे सांगत त्या म्हणतात की, आयसीसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे. तसेच लाहोर आणि पेशावरमधल्या हल्ल्यांची जबाबदारी तेहरिक-ए-तालिबानने घेतली आहे. जवळपास एक दशक पाकचे तालिबानबरोबरचे हे युद्ध सुरू आहे. तरी दररोज अतिरेकी हल्लेखोरांच्या कारवाया होतच आहेत. याचे उत्तर शोधलेच पाहिजे. अतिरेक्यांशी चर्चा आणि सर्जिकल स्ट्राइक्सची चर्चा करणे सोपे आहे; पण ते प्रत्यक्षात घडवणे फारसे सोपे नाही. आयसिस किंवा तालिबान यांच्याशी लढाई हे अंतिम उत्तर नाही. आपल्या समाजातले खोलवर मुरलेले अतिरेकी आणि जहाल गट शोधून काढणे आणि त्यांना आपल्या देशातून संपवणे हेदेखील तितकेच आवश्यक आहे. सेहेवानच्या लालशहाबाज कलंदर यांच्या सुफी दर्ग्यावरचा हल्ला ताजा असतानाच खैबर पख्तुनीस्तानच्या भागातल्या चार्साड्डा इथल्या न्यायालयावर अतिरेक्यांनी हल्ला केलेला आहे. पाकमधल्या अतिरेकी कारवायांवर आणि हिंसाचारावर चर्चा करताना अनेकदा पाकमधल्या विचारवंतांनी पाकच्या चुकीच्या धोरणांना जबाबदार धरलेले आहे ही आपल्या दृष्टीने जमेची गोष्ट म्हणावी लागेल.
डॉनने याबद्दल एक व्यंगचित्र प्रकाशित केलेले आहे त्यात सरकार अतिरेकी शक्तींवर बुलडोझर फिरवत आहेत; पण ती कारवाई कशी निरर्थक ठरते आहे याचे मोठे बोलके चित्रण पहायला मिळते.
प्रा. दिलीप फडके
(ज्येष्ठ विश्लेषक)