विशेष मुलाखत : गेल्या ५० वर्षांत २८० भारतीय भाषा डोळ्यांदेखत मेल्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 10:13 AM2022-07-13T10:13:23+5:302022-07-13T10:13:50+5:30

भारतातील प्रख्यात भाषा वैज्ञानिक गणेश नारायण देवी यांच्याशी लोकमत समूहाचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेल्या संवादाचा संपादित अंश.

Exclusive Interview 280 Indian languages have died in the last 50 years | विशेष मुलाखत : गेल्या ५० वर्षांत २८० भारतीय भाषा डोळ्यांदेखत मेल्या!

विशेष मुलाखत : गेल्या ५० वर्षांत २८० भारतीय भाषा डोळ्यांदेखत मेल्या!

Next

गणेश देवी,
भाषा वैज्ञानिक

भारतीय भाषा मरणपंथाला लागल्या आहेत हे आपल्या कसे लक्षात आले? 
१९७०च्या दशकात मी एक संशोधक  विद्यार्थी होतो. १९७१ सालच्या जनगणनेत १०९ भाषांचा उल्लेख आला, त्यात १०८ भाषा होत्या आणि १०९ या आकड्यासमोर लिहिले होते उर्वरित सर्व. हे जरा विचित्र वाटले. मग मी १९६१च्या जनगणनेचे निष्कर्ष पाहिले. त्यात १,६५२ भाषांची नावे दिलेली होती. लहानपणापासूनच मी गावकरी, आदिवासी, मजूर, भटक्या जाती यांच्या भाषा, बोली आणि लोकगीते ऐकत आलो. त्यामुळे मला वाटले की, या भाषा गेल्या कुठे? १९८०मध्ये बडोदा विद्यापीठात प्राध्यापक झाल्यानंतर महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेवर आदिवासींमध्ये भटकून त्यांच्या भाषा शोधण्याचा प्रयत्न करू लागलो. १९९६ साली मी प्राध्यापक पद सोडले आणि ‘भाषा शोध संस्थे’ची स्थापना करून भाषा सर्वेक्षण सुरू केले.

या देशात भाषांचे सर्वेक्षण कोणीच केले नव्हते? 
केले होते. १८८६ साली जॉर्ज अब्राहम ग्रियर्सन या इंग्रजी अधिकाऱ्याने भाषा सर्वेक्षणाचा प्रस्ताव मांडला होता. त्याच्याच अथक प्रयत्नांनी १८९१मध्ये तो स्वीकारला गेला. ३० वर्ष हे सर्वेक्षण चालले. १९२८ साली अहवाल आला. त्यानंतर २००६-०७मध्ये तत्कालीन सरकारने २.८ अब्ज रुपये खर्चाच्या भाषा सर्वेक्षणाची जबाबदारी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजेस या म्हैसूरच्या संस्थेवर सोपविली. परंतु, २००८ साली हा प्रकल्प रद्द झाला. मग २०१०मध्ये आम्ही वडोदऱ्यातील भाषा शोध संस्थेतर्फे ‘लोकभाषा सर्वेक्षण’ या नावाने सर्वेक्षण केले. त्याचा अहवाल बहात्तर खंडांत प्रकाशित झाला अजून, वीस खंड येणे बाकी आहेत.

भारतात भाषेची किती विविधता आहे? 
आमच्या सर्वेक्षणानुसार, आज देशात १,३६९ मातृभाषा असून, प्रत्येक दहा कोसांवर भाषा बदलते अशी म्हण तर आहेच. हिंदी भाषेच्याही शेकडो बोली आहेत. मराठी, तमिळ, तेलगू सर्व भाषांची अनेक रूपे प्रचलित आहेत. ती सगळी एकत्र केली तर १६ हजारांपेक्षा जास्त संख्या होते. 

भाषा लुप्त का होत आहेत? 
स्थलांतर हे भाषा लोप पावण्याचे मोठे कारण आहे. एखादा बिहारी माणूस जर आसाम किंवा केरळमध्ये काम करत असेल आणि तिथेच स्थायिक होत असेल तर तो आणि त्याच्या पिढ्या आपल्या मातृभाषेपासून तुटत जातात. माणसाला आपल्या घराच्या, गावाच्या जवळ काम मिळाले तर तो आपली मातृभाषा जिवंत ठेवतो. तंत्रज्ञान हे दुसरे मोठे कारण. संगणक आणि मोबाईल आल्यानंतर जर मातृभाषेमध्ये कळफलक नसेल तर लोक इंग्रजी किंवा रोमन लिपीत लिहितात. यातूनही भाषेची क्षती होते.

आत्तापर्यंत किती भाषा लोप पावल्या आहेत? 
१९६१चे सर्वेक्षण पाहिले तर तेव्हापासून २०१०पर्यंत २८० भाषांची नावे गायब झालेली दिसतात. किती बोली गायब झाल्या, याची तर गणतीच नाही. आदिवासींचे वेगाने आधुनिकीकरण होत असून, ते त्यांची संस्कृती आणि भाषेपासून तुटत चालले आहेत. पुढच्या तीस वर्षांत उरलेल्या भाषांतील बहुतेक संपून जातील. 

 संपुष्टात आलेली शेवटची भारतीय भाषा कोणती?
अंदमानात बोलल्या जाणाऱ्या बोआ भाषेला शेवटची मृत भाषा मानले जाते. तसेच सिक्कीमची मांझी भाषा गेल्या दहा वर्षांत संपुष्टात आली.

इंग्रजीचा वाढता प्रभाव याला कारणीभूत आहे काय? 
नक्कीच. जी भाषा डिजिटल जगात पोहोचलेली नाही, तिचे भवितव्य संकटात आले आहे. आपण चीन, रशिया, कोरिया, जर्मनी किंवा इस्रायलप्रमाणे आपल्या भाषांचे संरक्षण केले नाही. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.

ही क्षती कशी थांबवता  येईल? 
लोकांना त्यांच्या भाषेतच काम द्यावे लागेल. तेव्हाच भाषा, संस्कृती वाचू शकेल. कमीत कमी प्राथमिक शिक्षण तरी मातृभाषेतून घेणे बंधनकारक केले तरी आपल्या भाषेबद्दल प्रेम जागवले जाऊ शकते. परंतु, जोवर काम आपल्या भाषेत नसेल तोवर तिला वाचविणे कठीण आहे. 

Web Title: Exclusive Interview 280 Indian languages have died in the last 50 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.