विशेष मुलाखत: आमच्यासाठी राम हा आस्थेचा विषय आहे, राजकारणाचा नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 06:42 AM2022-04-13T06:42:54+5:302022-04-13T06:43:33+5:30
मला राजकारणाचा काही अनुभव नव्हता. लाखो लोकांच्या आशा आकांक्षा तुमच्यावर खिळतात तेव्हा शिकण्याशिवाय गत्यंतर राहत नाही.
अनुप्रिया पटेल ‘अपना दल’ या प्रादेशिक पक्षाच्या अध्यक्ष. लोकमत समूहाचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी त्यांच्याशी केलेल्या संवादाचा संपादित अंश.
कमी वयात इतके काही मिळवताना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला?
मला राजकारणाचा काही अनुभव नव्हता. लाखो लोकांच्या आशा आकांक्षा तुमच्यावर खिळतात तेव्हा शिकण्याशिवाय गत्यंतर राहत नाही. पुष्कळ चुकाही झाल्या, पण ईश्वरकृपेने अजूनपर्यंत सारे ठीक चालले आहे. आज उत्तर प्रदेशात आम्ही तिसऱ्या स्थानी आहोत. अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे.
मागच्या वेळी तुम्ही ११ जागा लढवून ९ जिंकल्यात आणि यावेळी १७ लढवून १२. आपल्या यशाचे हे प्रमाण भाजपपेक्षाही चांगले कसे?
छोट्या पक्षांना अस्तित्व टिकवण्यासाठी अधिक परिश्रम घेत संघर्ष करावा लागतो. आम्ही आमचे मतदार आणि समर्थक यांच्या सतत संपर्कात राहतो.
लोकांच्या पाठिंब्याशिवाय दुसरी कोणतीही ताकद आमच्याकडे नाही. लोकांच्या जगण्यामरण्याशी निगडीत मुद्दे आम्ही मांडत आलो आणि कधी डगमगलो नाही. त्यामुळे लोकांचा आमच्यावर विश्वास आहे.
अपना दल आणि भाजपमध्ये वैचारिक समानता किती आहे?
आघाडीच्या राजकारणात भिन्न विचारधारांचे लोक एकत्र येऊन सरकार स्थापन करतात. निवडून येत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या राजकीय मुद्द्यांकडे प्रभावीपणे लक्ष वेधू शकत नाही.आम्ही कायम सामाजिक न्यायाला प्राधान्य दिले आणि देत राहू.
कांशीराम यांच्यापासून सुरू होऊन रामापर्यंत पोहोचलेला तुमचा हा प्रवास कसा झाला?
आमच्यासाठी राम हा आस्थेचा विषय आहे, राजकारणाचा नाही. पक्षाचे संस्थापक डॉ. सोनेलाल पटेल यांनी बसपात राहूनही आणि १९९५ मध्ये अपना दल स्थापन करूनही दलित, मागासवर्गीयांसाठी आवाज उठवला. आम्ही तेच करतो आहोत. भाजप आपली विचारधारा पक्की करतो आहे, आम्ही आमची.
शिवसेना असो की अकाली दल, भाजपचे बाकीचे सहयोगी पक्ष कमजोर होत चालले आहेत. तुमची स्थिती मात्र भक्कम असण्याचे कारण काय?
सुरुवातीला आम्ही एनडीएचे छोटे घटक होतो. पक्षाची मी एकमेव आमदार होते. तेव्हापासून चार निवडणुका आम्ही एकत्र लढवल्या. आता आमचे १२ आमदार आणि २ खासदार आहेत. प्रादेशिक पक्षांकडे साधनसुविधा, समर्थन सगळेच मोठ्या पक्षांच्या तुलनेत कमी असते. म्हणूनच राजकीय कौशल्य आणि धैर्य अधिक हवे. आम्ही नेहमीच अल्पकालीन लाभापेक्षा दीर्घकालीन फायद्यावर नजर ठेवली.
भाजपचा घराणेशाहीला विरोध आहे; परंतु पती आशिष पटेल यांच्यासह तुमचा पूर्ण परिवार राजकारणात आहे. यात विसंगती नाही का?
भाजपचा कार्यक्रम वेगळा, आमचा वेगळा. हा देश घडवण्यात काँग्रेस पक्षाचे काही योगदान नाही असे आम्ही मानत नाही. संस्थापक सोनेलाल पटेल हयात होते तेव्हा आमच्या कुटुंबातले कोणी राजकारणात नव्हते. त्यांच्या मृत्यूमुळे अकल्पित परिस्थिती उभी राहिली. आम्ही तर पक्ष बंद करण्याच्या विचारात होतो. पण कार्यकर्त्यांना अनाथ झाल्यासारखे वाटत होते. त्यांच्या आग्रहावरून मी पक्षाची धुरा हाती घेतली.
मंत्री म्हणून तुम्ही साध्य केलेल्या महत्त्वाच्या बाबी कोणत्या?
स्वास्थ्य मंत्री म्हणून मी आयुष्मान भारत योजना कशी चालते हे पाहिले. ५५ कोटी लोकांना याचा फायदा मिळाला. प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय उघडणे ही दुसरी मोठी कामगिरी. आज उत्तर प्रदेशच्या प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय आहे. चांगल्या उपचारासाठी आज कोणाला लखनौ किंवा दुसऱ्या मोठ्या शहरात जावे लागत नाही. गट पातळीवर पॅथॉलॉजी सेंटर उघडले आहे. उद्योग आणि व्यापार मंत्रालयात माझ्या नेतृत्वाखाली कुटीर उद्योग आणि कृषी उत्पादनांची विक्रमी निर्यात झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यातले एक उत्पादन निर्यात होईल असे उद्दिष्ट ठेवले आणि साध्य केले. ४०० महापद्म डॉलर्सचे निर्यात उद्दिष्ट आम्ही नऊ दिवस आधीच पूर्ण केले.