माफ करा, पण तुम्ही आत्ता कशासाठी कोणता शब्द वापरलात?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 08:30 AM2023-09-01T08:30:17+5:302023-09-01T08:30:31+5:30

तुम्ही वापरता ते शब्द बदलले, तर त्यातून विचार बदलण्याच्या प्रक्रियेला वेग येईल आणि सामाजिक बदलांना हातभार लागेल, हे खरेच आहे!

Excuse me, but what word do you use for what now? | माफ करा, पण तुम्ही आत्ता कशासाठी कोणता शब्द वापरलात?

माफ करा, पण तुम्ही आत्ता कशासाठी कोणता शब्द वापरलात?

googlenewsNext

- ॲड. कोमल कंधारकर
(मुंबई उच्च न्यायालय)

न्यायालयात ज्येष्ठ पुरुष वकिलासमोर युक्तिवाद करताना स्त्री वकिलाने इतके ठाम आणि आग्रही असणे बरे दिसते का?”- अलीकडेच  उच्च न्यायालयात अर्धा तास चाललेला युक्तिवाद संपवून मी खाली बसले, तेव्हा ही कुजबुज माझ्या कानी पडली. केवळ परिश्रम आणि स्वबळावर मुंबईतल्या वकिली व्यवसायात महत्त्वाचे स्थान मिळवलेल्या माझ्यासारख्या स्त्री वकिलाला उद्देशून ही शेरेबाजी चालली होती. पुरुषांचे पारंपरिक वर्चस्व असलेल्या व्यवसायात स्त्रियांनी पाय रोवल्याचे वास्तव अजूनही आपल्याकडे पुरेशा स्वागतशीलतेने स्वीकारले जात नाही, हे तर उघडच आहे. अर्थात, मुंबईसारख्या महानगरांमध्ये आपली व्यावसायिक क्षमता पूर्णपणे सिध्द करण्याची संधी आणि शक्यता देशाच्या अन्य भागांपेक्षा कितीतरी उजवी आहे ! तरीही त्यात सुधारणेला भरपूर वाव आहे. कोणत्याही व्यक्तीच्या व्यवसायाशी ती स्त्री आहे की, पुरुष हा निकष जोडला जाता कामा नये.

माझे स्त्री असणे, माझ्या व्यावसायिक आकांक्षांच्या आड आल्याचा  अनुभव एवढेच सांगतो, की स्त्रिया आणि मुलींनी आपल्या क्षमतांवर आणि स्वप्नांवर जरा जास्तच विश्वास ठेवायला हवा. सर्वोच्च न्यायालयाने लैंगिक रूढीवादाचा सामना करण्यासाठी प्रकाशित केलेल्या मार्गदर्शनपर पुस्तिकेचे महिलांनी स्वागत केले, हे मला फार महत्त्वाचे वाटते.
स्त्रियांकडे “वस्तू” म्हणून पाहण्याचा पुरुषसत्ताक दृष्टिकोन बदलण्यासाठीचे महत्त्वाचे पाऊल म्हणून सर्वोच्च न्यायालयाने काही शब्दांच्या वापराबद्दल सजग केले आहे. आपले विचार आणि भावना भाषेतूनच प्रकट होतात. त्यातूनच रूढीपरंपरा, समजुती, समाजाचा दृष्टिकोन तयार होतो. म्हणून सार्वजनिक संभाषणात वापरल्या जाणाऱ्या शब्दांचे महत्व मोठे आहे.  भाषा भावना आणि विचारांना चालना देते, त्यातून संवाद साधला जातो. शब्द, वाक्प्रचार आणि लैंगिक रूढी, समजुतीनुसार आपण जे काही बोलतो, त्याचे परिणाम काय होतात, याकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. 

करिअर वुमन, ड्युटीफुल वाइफ, फोर्सिबल रेप, मॅरेजेबल एज, प्रोव्हायडर / ब्रेड विनर, अनवेड मदर अशांसारख्या अनेक शब्दांना सर्वोच्च न्यायालयाच्या या मार्गदर्शनपर पुस्तिकेत पर्यायी शब्द सुचवण्यात आले आहेत. नोकरी - व्यवसायात असलेल्या स्त्रीला केवळ महिला म्हणावे, करिअर हा शब्द तिच्या मागे लावू नये, असे ही पुस्तिका सांगते.   कोर्टाच्या कामकाजात वापरला जाणारा “ड्युटीफुल वाइफ” हा शब्द कुटुंबात स्त्रीने केवळ आज्ञा पाळावयाच्या असतात, असा जुनाट, पुरुषसत्ताक मानसिकतेचा अर्थ व्यक्त करतो. प्रोव्हायडर / ब्रेड विनर, सेक्स चेंज, अनवेड मदर  या शब्दांच्या जागीसुद्धा अर्निंग, सेक्स रि असाइनमेंट किंवा जेंडर ट्रान्ज़िशन, वुमन असे शब्द वापरावेत, असे न्यायालयाने सुचविले आहे.

न्यायालयीन निकालपत्रात काही लिंग / रुढीवादी शब्द हटकून येतात; आता असे पर्याय शोधून एका नव्या बदलाचे सुतोवाच केले आहे.   २०१७ मध्ये केरळ उच्च न्यायालयाने एका निकालपत्रात २४ वर्षांच्या मुलीला “दुर्बल, स्खलनशील आणि अनेक प्रकारे जिचे शोषण करता येईल अशी स्त्री” असे म्हटले होते. हे वर्णन स्त्रीला एका ठरावीक साच्यात बसवण्यास सरावलेल्या मानसिकतेतूनच आलेले आहे. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील दुर्दैवी घटना  ही एकूणच स्त्री पुरुषांच्या बाबतीत ठरावीक समज करून देणारा मापदंड कसा होऊ शकेल? कायद्यासमोर आपली घटना लिंग, जात, वर्गनिरपेक्ष अशी समानता मिळण्याची हमी देते. न्यायदानाच्या क्षेत्रात काम करणारे न्यायाधीश आणि वकिलांचा समाज उभारणीमध्येही त्यांचा सहभाग असतो.

हे लक्षात घेता या मार्गदर्शक पुस्तिकेतील शब्दांचा वापर करणे, ही एक चांगली सुरुवात होय! पुरुषावर होणारा शाब्दिक हल्लासुद्धा आई, बहीण, मुलगी यांच्या चारित्र्याकडे बोट दाखवूनच होतो. खरेतर  कोणत्याही महिलेला तिच्या चारित्र्यावर होणाऱ्या शाब्दिक हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी धडपडण्याची वेळ येता कामा नये; त्यासाठी  भाषा आणि शब्दांचा वापर यात सुधारणा अपरिहार्य आहे. या मार्गदर्शक पुस्तिकेत समलैंगिक समुदायातील लोकांशी संबंधित काही शब्दांचाही परामर्श घेतला आहे; हे विशेष होय! एखादी गोष्ट घडावी, असे वाटत असेल तर ती तशी घडणार आहे, यावर विश्वास ठेवा; त्या विश्वासातून तुमचा विचार बदलेल, वापरातले शब्द बदलतील आणि ती गोष्ट प्रत्यक्षात यायला मदत होईल, म्हणतात, ते खोटे नव्हे!

Web Title: Excuse me, but what word do you use for what now?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.