वाजपेयीपर्वाचा अस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 05:35 AM2019-08-26T05:35:07+5:302019-08-26T05:35:46+5:30

मोदींच्या राजकीय ईर्षेला आणि धोरणांना बौद्धिक इंधन पुरविण्याचे काम जेटली यांनी केले.

Existence of vajpeyi in the form of arun jaitley | वाजपेयीपर्वाचा अस्त

वाजपेयीपर्वाचा अस्त

Next

मोदींच्या राजकीय ईर्षेला आणि धोरणांना बौद्धिक इंधन पुरविण्याचे काम जेटली यांनी केले. राजकीय व्यूह रचणे व तो तडीस नेणे, यासाठी लागणाऱ्या वाटाघाटी करण्याचे कौशल्य हाही जेटलींचा स्वभावविशेष होता.

अरुण जेटली यांच्या अकाली निधनामुळे भारतीय जनता पक्षाचा एक आधार निखळला. राजकारण यशस्वी करण्यासाठी लागणारे अनेक गुण अरुण जेटली यांच्याजवळ होते. त्याचा वापर केवळ स्वत:साठी न करता त्यांनी पक्षासाठी केला. मोदींच्या राजकीय ईर्षेला आणि धोरणांना बौद्धिक इंधन पुरविण्याचे काम जेटली यांनी केले. राजकीय व्यूह रचणे व तो तडीस नेणे, यासाठी लागणाºया वाटाघाटी करण्याचे कौशल्य हाही जेटलींचा स्वभावविशेष होता. मोदी समर्थक असूनही त्यांचा राजकीय व्यवहार संघाच्या पठडीत बसणारा नव्हता. तो अटलबिहारी वाजपेयी यांच्या चालीने चालणारा होता. तिखट वाक््चातुर्य दाखवितानाच समन्वयाचा दरवाजा उघडा ठेवण्याची कला त्यांना साधली होती. मोदींना तिटकारा असणाºया दिल्लीतील उच्चभ्रू वर्तुळात जेटलींची ऊठबस असे आणि मतभेद असूनही भरवसा ठेवावा, असा माणूस अशी दिल्लीत त्यांची ओळख होती. हा धागा वाजपेयींच्या संस्कारातून आलेला होता.

वैयक्तिक स्वार्थापेक्षा पक्षाच्या विचारधारेवरील निष्ठा बळकट असल्याने केंद्रीय मंत्रिमंडळात निर्गुंतवणूक, संरक्षण आणि अर्थ अशी खाती सांभाळूनही जेटली यांच्यावर भ्रष्टाचाराचा डाग उमटला नाही. अलीकडील काळात जेटलींचे हे वेगळेपण महत्त्वाचे ठरते. मोदींच्या क्षमता लवकर ओळखणाºया मोजक्या नेत्यांमध्ये जेटली होते. वाजपेयींचे लाडके असूनही गुजरात दंगलीनंतर मोदींची पाठराखण जेटलींनी केली. २००९च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर लोकसभेत सुषमा स्वराज, तर राज्यसभेत जेटली यांनी विरोधी पक्षांचे नेतृत्व करीत मनमोहन सिंग सरकारला कोंडीत पकडले. वाजपेयींच्या प्रभावात वाढलेल्या या दोन नेत्यांनी २०१४मधील मोदींच्या विजयाची पायाभरणी केली आणि विचित्र योगायोग असा की, या दोन्ही नेत्यांचे महिनाभरातच निधन झाले आहे. एका अर्थाने हा वाजपेयीपर्वाचा अस्त आहे. २०१३मधील पक्षाच्या अंतर्गत सत्तासंघर्षात जेटली पूर्णपणे मोदींच्या बाजूने उभे राहिले. वकिली कौशल्य आणि शब्दचापल्य यांचा उत्तम वापर करीत जेटलींनी मनमोहन सिंग सरकारला लक्ष्य केले. पॉलिसी पॅरालिसीस, वन हॉर्स रेस या जेटलींच्या शब्दप्रयोगांनी प्रचाराची दिशा पक्की झाली. दुबळ्या सरकारच्या विरोधात कणखर नेता, असे द्वंद्व उभे करण्यात जेटलींच्या भाषेचा वाटा महत्त्वाचा होता. वाटाघाटीत प्रवीण असणारा बुद्धिमान नेता ही जेटलींची भाजपमधील ओळख होती.

मनमोहन सिंग, चिदंबरम यांच्याशी तुलना करता अर्थमंत्री म्हणून जेटलींचा प्रभाव, जीएसटीचा अपवाद वगळता दिसणार नाही. अर्थव्यवस्थेला नवे वळण ते देऊ शकले नाहीत; मात्र लहान तरी महत्त्वाचे बदल करण्यावर त्यांनी भर दिला. मोदींच्या समाजवादी धर्तीच्या आर्थिक विचारांपेक्षा त्यांचे विचार वेगळे होते. खासगी क्षेत्राला प्राधान्य देण्याकडे त्यांचा कल होता; मात्र संघर्षाची वाट त्यांनी धरली नाही. अर्थात, जेटलींची योग्यता मोदी जाणून होते आणि आर्थिक क्षेत्राप्रमाणे बालाकोट हल्ला किंवा नोटाबंदीसारखे राजकीय निर्णय घेतानाही जेटलींना विश्वासात घेतले जाई. मोदींशी बरोबरीच्या नात्याने चर्चा करणाºया मोजक्या नेत्यांमध्ये जेटली होते. ३७०वे कलम रद्द करण्याच्या निर्णयाची साधकबाधक चर्चा जेटलींबरोबर फार आधी झाली होती. जीएसटी लागू करताना जेटलींचे वाटाघाटींचे कौशल्य कसाला लागले. कडवा विरोध असूनही जीएसटीमधील प्रत्येक निर्णय एकमताने होईल, असा अवघड आग्रह धरून जेटलींनी तो तडीस नेला. भारताच्या आर्थिक इतिहासात कायम उल्लेख होईल, असे हे काम आहे. संघ संस्कारातील कडवेपणा जेटलींच्या कारभारात नसल्यामुळे हे साध्य झाले. यामुळेच विविध राजकीय प्रवाह आणि भाजप यांच्यामधील सेतू म्हणून ते काम करीत.

भाजपच्या राजकीय डावपेचांना बौद्धिक बळकटी देताना ते डावपेच यशस्वी करण्यासाठी आवश्यक असणाºया वाटाघाटी जेटली करू शकत. वाजपेयी यांच्या काळात प्रमोद महाजन व ब्रजेश मिश्रा जे काम करीत, तेच मोदींसाठी जेटली करीत होते. मिश्रा यांच्याप्रमाणे सरकारी धोरणे ठरविण्यात आणि महाजन यांच्याप्रमाणे राजकीय डावपेच आखण्यात जेटली कुशल होते. असे काम करणारी अन्य व्यक्ती सध्या मोदींच्या वर्तुळात नाही. भाजपसाठी हे नुकसान मोठे आहे.

Web Title: Existence of vajpeyi in the form of arun jaitley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.