मतदानोत्तर चाळण्यांचे यशापयश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 05:34 AM2019-05-21T05:34:03+5:302019-05-21T05:34:18+5:30
मतदानोत्तर चाचण्या खऱ्या ठरल्या, तर स्वत:ची पाठ थोपटून घ्यायची. चुकीच्या ठरल्या, तर शेवटी ते अंदाजच होते, म्हणून दुर्लक्ष करीत अन्य मुद्द्यांकडे चर्चा वळवायची. हा मतदानोत्तर चाचण्यांचाही एक उद्योग बनला आहे.
लोकसभेच्या सतराव्या सभागृहासाठी रविवारी सातव्या टप्प्यातील अखेरचे मतदान पार पडले. गेले अडीच महिने चालू असलेल्या या निवडणुकांचा धुरळा खाली बसला आहे. गुरुवार, २३ मे रोजी सकाळी सर्व मतदारसंघात मतमोजणीला प्रारंभ होईल आणि सायंकाळपर्यंत कोणता पक्ष राज्यसत्तेचा मुकुट परिधान करणार आहे, ते स्पष्ट होईल. दरम्यान, तत्पूर्वी निवडणूक आयोगाने घातलेल्या निर्बंधांमुळे मतदानाची शेवटची फेरी पूर्ण होताच, मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज जाहीर करण्यास परवानगी दिली गेली आहे. तत्पूर्वी या चाचण्या घेता येतात; पण त्यांचे निष्कर्ष जाहीर करता येत नाहीत. काल विविध वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या आणि संस्थांनी घेतलेल्या मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष बाहेर पडले, त्यावर घमासान चर्चा सुरू झाल्या, प्रतिक्रिया येऊ लागल्या.
आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. जणूकाही निवडणुकांचे निकालच जाहीर झालेत, अशा पद्धतीने चर्चा रंगत होत्या. वास्तविक, त्या मतदानोत्तर चाचण्या आहेत, अंदाज आहेत. प्रत्येक मतदारसंघात लाखो मतदारांचे मतदान होते आणि त्यापैकी दोन-चार हजार मतदारांचे मत घेऊन किंवा त्यांनी कोणाच्या बाजूने मतदान केले आहे, याचा अंदाज घेऊन जणू निकालच आपल्या हाती आला आहे, अशा आविर्भावात या मतदानोत्तर चाचण्यांची चाळणी चालू होती. घरोघरी बायकामाणसं धान्याची चाळणी करतात, धान्यातील घाण, दगड-धोंडे बाजूला काढून ते स्वच्छ करतात. या चाचण्यांची चाळण मतदारांचा संभ्रम वाढविणारी ठरू पाहात आहे. आपल्या देशातील मतदारांचा कौल निश्चित ठरविणे किंवा वर्तविणे अवघड आहे. विविध प्रांत, भाषा, संस्कृती, समाजरचना, जातीव्यवस्था, शहरी, ग्रामीण भेदभाव, उच्च-नीच जातींची उतरंड अशा विविधांगी समाजातील मतदारांचा कौल देण्याचा प्राधान्यक्रम फार वेगवेगळा असतो. पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, आंध्र, तेलंगणा, तामिळनाडू आदी राज्यांमध्ये प्रादेशिक अस्मितांचे राजकारण चालते. तेथे राष्टÑीय पक्षांना महत्त्वच नाही. याचा अनेक वेळा अनुभव आला आहे. आणीबाणीविरोधात कॉँग्रेसला पराभूत करण्यासाठी सारा देश विरोधी मतदान करीत असताना, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक ही दोन राज्ये नव्वद टक्के यश कॉँग्रेसला देऊन मोकळी झाली होती. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर सर्वच राज्ये कॉँग्रेसला मतदान करीत असताना, आंध्र प्रदेश या कॉँग्रेसच्या बालेकिल्ल्यात नव्याने स्थापन झालेल्या तेलुगु देसम्ला विजयी केले होते.
हा सर्व विविध राज्ये, राष्ट्रीय प्रश्न, प्रादेशिक अस्मिता, स्थानिक, तसेच राष्ट्रीय नेतृत्व आदींचा परिणाम जाणवत असतो. त्यामुळे चर्चा करण्यासाठी आणि आकडेमोड करून वेळ दवडण्यासाठी मतदानोत्तर चाचण्या ठीक आहेत. त्यामुळेच झालेल्या लाखो मतदारांच्या मतदानापैकी चिमूटभरांचे उदाहरण देत चाळण्या घेऊन खेळत बसण्याचा हा प्रकार आहे. शेवटी तो अंदाज आहे. त्यामुळे काही वेळा खरा ठरला, तर अनेक वेळा चुकीचा असल्याचेही स्पष्ट झाले आहे. हा अंदाज पाहून राजकीय उलथापालथी होणार नाहीत. प्रत्यक्षातील अधिकृत निकालच गृहित धरले जाणार आहेत. त्यासाठी २३ मेची वाट पाहावी लागेल. या चाचण्या स्वीकारून किंवा नाकारून राजकारण करण्यातही अर्थ नाही. मतदानोत्तर चाचण्या घेणाऱ्यांची ही परीक्षा आहे. त्या खºया ठरल्या, तर स्वत:ची पाठ थोपटून घ्यायची. चुकीच्या ठरल्या, तर शेवटी ते अंदाजच होते, म्हणून दुर्लक्ष करीत, नवे सरकार कोण स्थापन करणार, पंतप्रधान कोण होणार, या मुद्द्यांकडे चर्चा वळवून, जणूकाही घडलेच नाही, अशा आविर्भावात राहायचे. हा मतदानोत्तर चाचण्यांचाही एक उद्योग बनला आहे. देशभरातील २९ राज्यांत आणि ७ केंद्रशासित प्रदेशांत पसरलेल्या ५४३ मतदारसंघांत माणसं पाठवून चाचणी घेणे सोपे काम नाही, ते खर्चिक आहे. तरी ते केले जाते. त्यासाठी पैसा उभा केला जातो.
हा एकप्रकारे धंदा आहे, तो एक मनोरंजनाचा खेळही बनला आहे. प्रत्यक्षात काही कोणाचा लाभ नाही. सर्वच मतदानोत्तर चाचण्या भाजप आघाडीला बहुमत देत असतील, तर हाच निकाल समजून, मतमोजणीचा इतका मोठा उपद्व्याप कशाला करायचा? या चाचण्या नाहीत, चाळण्या घेऊन केलेला खेळच आहे.