ध्येयवेड्या शिक्षकाची अनोखी स्वप्नपूर्ती

By admin | Published: March 11, 2017 03:55 AM2017-03-11T03:55:02+5:302017-03-11T03:55:02+5:30

गणितज्ज्ञ, कुलगुरु म्हणून लौकिकप्राप्त शिक्षक निवृत्तीनंतर जन्मभूमीचे पांग फेडण्यासाठी गावी जाऊन शाळा सुरू करतो. प्रलोभने, आव्हाने यावर मात करीत स्वत:ची वाट धुंडाळतो.

Exotic dreamer of the goal teacher | ध्येयवेड्या शिक्षकाची अनोखी स्वप्नपूर्ती

ध्येयवेड्या शिक्षकाची अनोखी स्वप्नपूर्ती

Next

- मिलिंद कुलकर्णी

गणितज्ज्ञ, कुलगुरु म्हणून लौकिकप्राप्त शिक्षक निवृत्तीनंतर जन्मभूमीचे पांग फेडण्यासाठी गावी जाऊन शाळा सुरू करतो. प्रलोभने, आव्हाने यावर मात करीत स्वत:ची वाट धुंडाळतो.

शैक्षणिकदृष्ट्या मागास समजल्या जाणाऱ्या खान्देशात १९९० मध्ये केवळ दोन जिल्ह्यांचे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ सुरू झाले आणि रौप्यमहोत्सव साजरा करणाऱ्या या विद्यापीठाने शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन प्रयोग करीत वेगळेपण राखले. यात मोलाचा वाटा पहिले कुलगुरु डॉ. निंबा कृष्णा ठाकरे यांचा आहे. एकूण सहा वर्षांचा कालावधी लाभलेल्या डॉ. ठाकरे यांनी विद्यापीठाची मजबूत पायाभरणी केल्याने विद्यापीठ अनेक आव्हानांना तोंड देत सक्षमपणे कार्यरत आहे. नवनवीन यशोशिखरे पादाक्रांत करीत आहे.
डॉ.ठाकरे यांना कुलगुरुपदाची सलग दोनदा संधी मिळाली. जिल्हा परिषदेच्या खोलीपासून तर बांभोरीच्या ओसाड टेकड्यांवर साकारलेले देखण्या इमारतींचे विद्यापीठ असा प्रवास त्यांच्या काळात झाला. शिस्तप्रिय, कर्तव्यकठोर, परखड बाण्याच्या डॉ. ठाकरे यांनी शिक्षणक्षेत्राला शिस्त लावण्याच्या दृष्टीने कठोर निर्णय घेतले. त्यामुळे संघर्षदेखील झाले. टीका झाली. परंतु न डगमगता ते विद्यापीठाच्या भल्यासाठी कार्यरत राहिले. तेच डॉ.ठाकरे वयाची ऐंशी ओलांडल्यानंतरही जन्मगावी शाळा सुरू करून तेथे नवनवीन प्रयोग करण्यात रमलेले आहेत. धुळ्याजवळील मोराणे हे त्यांचे जन्मगाव. चौथीपर्यंत तेथेच शिक्षण झाले. शिक्षण आणि नोकरीमुळे गाव सुटले. पुणे विद्यापीठातून गणिताचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाल्यावर अनेक शिक्षणसंस्थांची आमंत्रणे नम्रपणे नाकारून गावाकडे परतले. पत्नी पुष्पल या हिंदीच्या प्राध्यापक म्हणून निवृत्त झाल्यानंतर या दोघांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा उभारण्याचे स्वप्न पाहिले. दोन्ही मुलांनीही उभारी दिली. गावातील इंग्रजी माध्यमाची शाळा बंद पडण्याच्या मार्गावर होती. अवघे २०-२२ विद्यार्थी उरले होते. ठाकरे यांनी ही शाळा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत ताब्यात घेतली आणि आई-वडिलांच्या नावे विश्वस्त संस्था स्थापन करूननव्याने शाळा सुरू केली. इंग्रजी माध्यमाच्या शाळेसाठी स्वतंत्र इमारत बांधण्यासाठी वाटेहिश्शातून आलेली ११ एकर जागा निश्चित केली. पुणे आणि धुळ्यातील घर विकून शाळेची देखणी इमारत बांधली. ठाकरे स्वत: शाळा उभारतायत म्हटल्यावर मदतीचे हात पुढे आले. मोकळी हवा आणि प्रकाश असलेल्या शाळा खोल्यांना प्राधान्य देण्यात आले. क्रीडांगण, बहुउद्देशीय सभागृह तयार झाले. कविमनाच्या ठाकरे यांनी विविध प्रकारची फुलझाडे आवर्जून लावली. ठाकरे दांपत्य पूर्णवेळ शाळेसाठी देऊ लागले. आणि बंद पडण्याच्या मार्गावर असलेली ही शाळा उभारी घेऊ लागली. नर्सरी ते दहावी या वर्गात आजमितीला ९०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. १४ वर्षात या शाळेने वेगळेपण जपले. मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी विविध उपक्रमांची नियोजनपूर्वक आखली केली गेली.
एक गणितज्ज्ञ, कुलगुरु असलेल्या ठाकरे यांनी जन्मभूमीचे पांग फेडण्यासाठी केलेला हा प्रयत्न आदर्शवत असा आहे. प्रसिद्धी, जाहीर कार्यक्रमांपासून अलिप्त राहत त्यांनी शाळा, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी अथक प्रयत्नशील राहण्यात धन्यता मानली आहे. अध्यापन आणि विद्यापीठ प्रशासनाचे काम करीत असताना कसोटीचे अनेक प्रसंग अनुभवलेल्या ठाकरे यांना निवृत्तीनंतरही अशा अनुभवातून जावे लागले. पुणे सोडून गावाकडे आल्यावरचा प्रवास अगदी सुखकर असा झाला नाही. शिक्षण आणि शेतीमध्ये लक्ष घालण्याचे ठरविले होते. पण शेतीतील प्रयोगात यशापयशाचा सामना करावा लागला. औषधी एरंडीची लागवड केली असता ७८ दिवस पाऊसच न आल्याने अपेक्षित उत्पादन झाले नाही. कापसात हाती यश आले. विक्रमी उत्पादन घेतल्याने कृषी सचिवांनी स्वत: येऊन पाहणी केली. शालेय शिक्षणात यश येत असताना कनिष्ठ महाविद्यालयाचे वर्ग सुरू केले असता ‘कॉपी’ करू दिली जात नाही, म्हणून विद्यार्थीसंख्या रोडावली आणि महाविद्यालय बंद करण्याची वेळ आली. परंतु या परिस्थितीवर मात करीत ठाकरे दांपत्य नवनव्या वाटा धुंडाळत आहेत. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग सुरू करण्याचा त्यांचा आता प्रयत्न आहे.
समाजाप्रति आपण देणे लागतो, या भावनेने उत्तरायुष्यातही अथकपणे कार्य करणारे ठाकरे हे शिक्षण क्षेत्राच्या दृष्टीने दीपस्तंभ असेच आहे.

 

Web Title: Exotic dreamer of the goal teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.