‘अपेक्षां’मागोमाग ‘विकास’... आणि आता ‘विश्वास’!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 06:02 AM2020-09-17T06:02:39+5:302020-09-17T06:03:18+5:30
राष्ट्र प्रथम, पक्ष त्यानंतर, स्व शेवटी... हा प्राधान्यक्रम कायम जपत आलेल्या एका गौरवशाली परंपरेला पुढे नेण्याची कसरत या नेतृत्वाला साधायची असते.
- देवेंद्र फडणवीस
(विरोधी पक्षनेते, विधानसभा)
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्तरावा वाढदिवस, त्यानिमित्ताने...
२०१४ मध्ये देशातील राजकीय परिस्थिती आपल्यापैकी बहुतेकांना आठवत असेल. भ्रष्टाचार, घोटाळे, महागाई, अनागोंदी यातून जनमानस प्रचंड खचले-ग्रासले होते. २०१३च्या सुमारास नरेंद्र मोदी या व्यक्तिमत्त्वाचा, गुजरातच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा देशाच्या राजकीय क्षितिजावर पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून उदय झाला होता. पक्षाची सर्वोच्च परंपरा हाती घेणे, ही जशी गौरवाची बाब असते, तशी ती एक अवघड इंद्रधनुष्य हाती आल्याच्या जबाबदारीची जाणीवसुद्धा करून देणारी असते. राष्ट्र प्रथम, पक्ष त्यानंतर, स्व शेवटी... हा प्राधान्यक्रम कायम जपत आलेल्या एका गौरवशाली परंपरेला पुढे नेण्याची कसरत या नेतृत्वाला साधायची असते.
२०१४ साली देशाच्या इतिहासात प्रथमच भारतीय जनता पार्टीला लोकसभेत पूर्ण बहुमत प्राप्त झाले आणि येथेच ‘मोदीत्त्वा’चा खरा अर्थ दडला होता. कणखरता, प्रसंगी कठीण निर्णय घेण्याची ताकद, संकटे अंगावर घेण्याची जोखीम आणि प्रचंड प्रतिकूलतेतही पराकोटीचा संयम ही गुणवैशिष्ट्य संपूर्ण देशाने त्यांच्यात पाहिली होती. त्यामुळे हे सरकार आले तेव्हा जनमानसाच्या प्रचंड अपेक्षांचे ओझे त्यांच्या खांद्यावर होते. अपेक्षांचे ओझे प्रचंड असते, तेव्हा त्या भाराखाली दबण्याची भीती मोठी असते. अनेक राजकीय पंडितांनी हेच भाकीत वर्तवले होते. पण वास्तवात मोदीजींची क्षमता त्यांनी ओळखली नव्हती.
२०१४ ते २०१९ हा संपूर्ण कालखंड एका अनोख्या विकास पर्वाचा होता. सर्वांसाठी घरे, उज्ज्वला, उजाला, जनधन, घरांना वीज, शेतकऱ्यांची उत्पन्नवाढ, वाढीव हमीभाव अशा कितीतरी गरीब कल्याण योजनांमधून एक नवे विकासपर्व सुरू झाले. कुणाच्याही मध्यस्थीविना, सरकारी कार्यालयात न जाता लाभार्थींना थेट खात्यात पैसे मिळू लागले. देशातील ३३ कोटींहून अधिक नागरिकांना काही ना काही प्रत्यक्ष लाभ मोदीजींच्या योजनांमधून मिळाला होता. त्याचवेळी एक मजबूत राष्ट्र म्हणून भारताची जगभरात प्रतिमा तयार होत होती. ही प्रतिमा जशी वृद्धिंगत होत गेली, तेव्हा विकासाकडून विश्वासाचा प्रवास सुरू झाला.
२०१६मध्ये उरीचा हल्ला झाला तेव्हा अवघ्या ११ दिवसांत भारताने सर्जिकल स्ट्राइकने उत्तर दिले. २०१९च्या प्रारंभी पाकिस्तानने पुलवामामध्ये पुन्हा आगळीक केली. त्याला बालाकोटच्या हवाई हल्ल्यांनी उत्तर दिले गेले. पाकिस्तानच्या हद्दीत घुसून हवाई हल्ले करीत दहशतवाद्यांचे तळ नष्ट करण्यात आले. या दोन घटनांनी भारताच्या संरक्षणविषयक धोरणाच्या दिशा स्पष्ट केल्या. नवा भारत कसा असेल, हे मोदीजींनी संपूर्ण जगाला ठणकावून सांगितले. हे भारताचे ‘न्यू नॉर्मल’ होते. येथूनच भारताने एक नवे वळण घेतले...‘राष्ट्र प्रथम’ची उदाहरणे कितीतरी देता येतील. अपेक्षांचे ओझे कितीही वाढत असले तरी विश्वासही तितकाच वाढत गेला.
२०१४च्या तुलनेत आणखी जागा घेऊन दुसºया मोदीपर्वाचा प्रारंभ झाला. संपूर्ण देश ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता, तो क्षण ५ आॅगस्ट २०१९ला उजाडला. कलम ३७० रद्द करण्यात आले आणि भारत आपल्या सीमांप्रति किती जागरूक आहे, हा संदेश जगाला दिला गेला. जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती हा या भागातील दहशतवाद आणि भय संपविण्यासाठीचा धाडसी निर्णय होता. पाकिस्तानच्या छुप्या युद्धाला दिलेले हे चोख उत्तर होते.
संकटाला संधीत परावर्तित करण्याचे कसब शिकावे तर ते मोदीजींकडूनच ! आज निरनिराळे प्रश्न आणि समस्या समोर असताना चीनचे संकटसुद्धा घोंगावते आहे. पण, संपूर्ण देश आश्वस्त आहे, तो केवळ मोदीजींवरील विश्वासामुळेच ! २०१७ मध्ये डोकलामच्या संघर्षात तर भारतीय सैन्याने भारताच्या सीमेबाहेर चीनला थोपविण्याचे काम केले. हा केवळ ‘चर्चा करणारा भारत’ नाही, तर ‘घुसणारा भारत’ आहे, ही प्रतिमा जगभरात निर्माण झाली. मोदीजी हे धक्कातंत्रासाठी ओळखले जातात. म्हणूनच ते अचानक एके सकाळी थेट लडाखमध्ये दाखल होतात आणि तेथे सैन्यासोबत संवाद साधतात. तेव्हा ते सैन्याचे मनोबल उंचावणारे तर असतेच, शिवाय संपूर्ण देशवासीयांनासुद्धा आश्वस्त करणारे असते.
... आता भारताचे नेतृत्व समर्थ हातांमध्ये आहे, ते मागे वळून पाहणारे, प्रश्न लांबणीवर टाकणारे नाही, याची प्रचिती जगाने घेतली आहे. भारताच्या आक्रमकतेमुळेच चीन आता ‘डिसएन्गेजमेंट’ची भाषा करू लागला आहे. उरी, बालाकोट, डोकलाम, गलवान अशा प्रत्येक वेळी एका समर्थ भारताची प्रचिती देशाने घेतली आहे.
कोरोनाकाळात आर्थिक गतिविधी ठप्प झालेले असताना राज्यांना संपूर्ण मदत करण्याचे धोरण केंद्राने पाळले आहे. जीएसटीचे पैसे राज्यांना दिले जात आहेत. महाराष्ट्राला सर्वाधिक १९,२०० कोटी रुपये केंद्राने दिले आहेत. व्हेंटिलेटर्स, एन-९५ मास्क, पीपीई किट अशी आरोग्य सामुग्री राज्यांना दिली जाते आहे. पीएम केअर्समधूनसुद्धा मोठी मदत दिली जाते आहे.
२०१४ ते २०२० या सहा वर्षांचा प्रवास प्रचंड अपेक्षांपासून ते अगाध विश्वास व्हाया विकास असा आहे. राष्ट्राचा आपला एक स्वभाव असतो. त्यातून संस्कृतीचे दर्शन होते. नेतृत्व धाडसी असेल तर त्यातून कृतीचे दर्शन होते. म्हणूनच पाकिस्तान असो वा चीन; भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाºया प्रत्येक कृतीला भारताचे काय उत्तर असेल, हे सांगायला आजतरी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही; कारण ते प्रत्येक भारतीयाला ठाऊक आहे. भारताच्या या सक्षम, समर्थ आणि कर्तृत्ववान नेत्याचा आज वाढदिवस. मोदीजींना मी संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने शुभेच्छा देतो, दीर्घायुरारोग्य चिंतितो!