ग्रंथव्यवहारातही सीमोल्लंघन अपेक्षित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 05:57 AM2018-10-18T05:57:39+5:302018-10-18T05:57:42+5:30
- संजय जोशी (लेखक, कार्पोरेट व्यवस्थापक) थोडा खोलवरचा विचार केला तर समजेल, मनाने घातलेल्या मर्यादा ओलांडणे शरीराला कठीण जाते, ...
- संजय जोशी (लेखक, कार्पोरेट व्यवस्थापक)
थोडा खोलवरचा विचार केला तर समजेल, मनाने घातलेल्या मर्यादा ओलांडणे शरीराला कठीण जाते, पण शरीराच्या मर्यादा मन सहजीच ओलांडते. सकारात्मक अर्थाने पाहायचे, तर सीमोल्लंघन ही मानसिक घटना आहे. एकदा मनाने उभारी घेऊन प्रत्यक्ष आणि काल्पनिक बंधनांच्या सीमा ओलांडल्या की, शरीर आपसूक साथ देतेच. मराठी ग्रंथव्यवहाराला मोठीच्या मोठी उड्डाणे घेऊन कोपऱ्याकोपºयावर उन्नत वाचनसंस्कृतीचे झेंडे उभारायचे असतील, तर लेखक, प्रकाशक, विक्रे ते, आणि वाचक या सर्वांनीच मानसिक सीमोल्लंघनाची तयारी केली पाहिजे. यंदाच्या दसºयाच्या निमित्ताने हाच संकल्प करू या.
ग्रंथव्यवहारातील या विविध घटकांनी सीमोल्लंघन करायचे म्हणजे नेमके काय करायचे? लेखकांनी स्वत:ला आणि वाचकांना परिचित (आणि प्रिय) विषय आणि अभिव्यक्तीच्या पलीकडे जाऊन समकालाला कवेत घेणाºया आशयाकडे झेपावले पाहिजे. वाचकानुनयाचे सोपे मार्ग टाळून आत्मनिष्ठेने आणि आत्मविश्वासाने नव्या दिशांचा शोध घेऊन अभ्यासासह व्यक्त झाले पाहिजे. त्यात अर्थातच जोखीम असेल, पण ती तर सीमोल्लंघनाची पूर्वअटच असते ना. प्रकाशकांनी अर्थातच यात नव्या लेखकांचे आणि नव्या विषयांचे धाडसाने स्वागत करायला हवे. संख्यात्मक वाढीपेक्षा गुणात्मक वाढीकडे लक्ष देणे अधिक अगत्याचे आहे.
सांगायचा मुद्दा खरे सीमोल्लंघन मानसिक असते. मराठी माणसाने आपल्यावर लादलेली काल्पनिक आणि भ्रामक बंधने झुगारून क्षितिजाचीदेखील तमा न बाळगता विशाल अवकाशात भरारी घ्यायला हवी. बाबा आमटे म्हणतातच, पंखांना क्षितिज नसते, त्यांना फक्त झेपेच्या कवेत मावणारे आकाश असते. सर्वात शेवटी वाचकांबद्दल बोलायला हवे. मर्ढेकर, केशवसूत, बालकवी आणि त्याचबरोबर फडके, खांडेकर, अत्रे, पुलं, गंगाधर गाडगीळ वगैरे सारे लेखक अत्यंत महान होते, हे मान्य करून त्यांना सादर वंदन करून आता नव्या लेखकांकडे वळायला हवे. समीक्षकांनी यात मोलाची भूमिका बजावायला हवी. कारण भूतकाळाच्या वेशीवर रेंगाळणारा समाज नवसर्जनाच्या वाटा रोखतो आणि भोवºयात सापडतो, असा इतिहास आहे. वाचकांनी हे शतकाचे सीमोल्लंघन करून एकवीसाव्या शतकातील साहित्याकडे कुतूहलाने पाहायला हवे. सोसायटीसमोरच्या वेल मेंटेन्ड लॉनच्या पलीकडे निबिडातदेखील अनुपम रानगंध असलेली फुले आणि तुमच्या साहसाला आव्हान देणाºया रानवाटा आहेत, याची जाण ठेवून वाचकांनी परिचित साहित्याच्या पलीकडे जाऊन हे धाडसी सीमोल्लंघन करायला हवे.
मित्रहो, मुख्य मुद्दा असा आहे की, हे सारे शक्य आहे. बंधने पैशाची किंवा भौतिक नाहीतच. सीमा आणि मर्यादा आहेत, त्या आपल्या मानिसकतेलाच. नव्या काळात येणारी ईबुक्स, आॅडिओबुक्स वगैरे गोष्टी ग्रंथव्यवसायावर बंधने घालणार नाहीयेत, तर एकूण ग्रंथव्यवहाराचा पसारा वाढविणार आहेत. या नव्या तंत्रज्ञानाने ग्रंथसाक्षरता वाढणार आहे. तुंबाड सिनेमा पाहून आमच्या दुकानात लोक ‘तुंबाडचे खोत’ मागत आहेत, ही केवळ गंमत नाहीये, तर त्या दोन कलाकृतींचा संबंध नसूनही लोक अखेर पुस्तकाकडेच वळतात, याचा तो पुरावा आहे. एक पुस्तकप्रेमी म्हणून सीमोल्लंघनाचा मला उमजलेला अर्थ हा असा आहे!