खर्चिक कॉरिडोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 12:53 AM2017-09-04T00:53:02+5:302017-09-04T00:53:25+5:30
रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान, असे आजवर म्हटले जात असले तरी बदलत्या काळात आणखी एक दान श्रेष्ठ ठरू शकते, ते म्हणजे अवयवदान!
रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान, असे आजवर म्हटले जात असले तरी बदलत्या काळात आणखी एक दान श्रेष्ठ ठरू शकते, ते म्हणजे अवयवदान! काही वर्षांपासून महाराष्ट्रातील मोजक्याच जिल्ह्यांमध्ये यकृत, मूत्रपिंड, हृदय आदी अवयव प्रत्यारोपणासाठी ग्रीन कॉरिडोर केले जात असून, त्या माध्यमातून अनेकांना जीवनदान मिळाले आहे. अवयवदान हे अनेकांचे जीव वाचवण्यासाठी उपयुक्त ठरू शकत असले तरी मुळात त्याविषयी लोकांमध्ये जागृतीच नसल्याचे दिसते. राज्यात मूत्रपिंड विकाराने त्रस्त १२ हजार रुग्ण दात्याच्या प्रतीक्षेत असून, यकृताची गरज असलेले २६०० रुग्ण आजमितीस नोंदविले गेलेले आहेत. साहजिकच अवयवदानासाठी प्रबोधन करण्याबरोबरच प्रोत्साहनाची गरज आहे. त्यादृष्टीने काही सेवाभावी संस्था प्रयत्न करीत असतानाच आता राज्य सरकारदेखील त्यात सहभागी झाले आहे. विशेषत: वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.
अवयवदानासाठी नाशिक ते नागपूर दरम्यान पदयात्रा काढणारे नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते सुनील देशपांडे यांनी अवयवदानाच्या संकल्पासाठी तयार केलेली प्रतिज्ञा राज्य सरकारने स्वीकृत केल्याने यापुढील काळात जनजागरणासाठी तिचा मोठा उपयोग होऊ शकेल. रुग्णशय्येवर असणाºया रुग्णापेक्षा त्याच्या कुटुंबीयांची अवयवदानासाठी मानसिकता तयार झाली पाहिजे, ही बाब लक्षात घेऊन अवयवदात्यांच्या कुटुंबीयांवर मोफत उपचार करण्याची तयारी शासनाने दर्शविली आहे. परंतु त्याचबरोबर आणखी काही बाबींकडे राज्य शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. अवयवदानासाठी दाते किंवा त्यांचे कुटुंबीय तयार होत असताना सदर अवयव सहजगत्या दुसºया जिल्ह्यात असलेल्या गरजवंतापर्यंत पोहोचवणे सोपे नसते. हृदय किंवा अन्य महत्त्वाचे अवयव विशिष्ट कालावधीत संबंधित गरजवंतापर्यंत पोहोचविले गेले तरच त्याचे रोपण करता येणे शक्य असते. परंतु त्यासाठी ग्रीन कॉरिडोर करणे आणि त्यानंतर अवयव रोपण करणे हे अत्यंत खर्चिक ठरत असते. त्यामुळे यासाठीचे दर कसे कमी होतील, याचा शासकीय स्तरावर विचार होणे गरजेचे आहे. सध्या मुंबई, पुणे, नाशिक यासारख्या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर असल्याने अवयव रोपणाच्या शस्त्रक्रिया होत असल्या तरी त्या खर्चिक असल्याने सरकारी रुग्णालयांमध्ये तशी व्यवस्था व त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध होणे गरजेचे आहे.