इंग्लंडमध्ये महाग, म्हणून इटलीत जाऊन नाश्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2024 08:20 AM2024-08-01T08:20:03+5:302024-08-01T08:20:41+5:30

मोठ्या शहरात जाऊन खरेदी करायची आणि त्याची बढायकी मारायची यातही अनेकांना गौरव वाटतो.. 

expensive in england so go to italy for breakfast | इंग्लंडमध्ये महाग, म्हणून इटलीत जाऊन नाश्ता

इंग्लंडमध्ये महाग, म्हणून इटलीत जाऊन नाश्ता

अनेकांचे अनेक रईसी शौक असतात, त्यासाठी ते काहीही करतात, कितीही पैसे खर्च करायची त्यांची तयारी असते. आपल्या या राजेशाही थाटाचा त्यांना फार अभिमान असतो. लोकांनाही बऱ्याचदा त्यांचं कौतुकही असतं. पाच रुपयांची वस्तू पाचशे रुपयांना घेणं, तसेच जी गोष्ट आपल्या गल्लीत, शेजारी मिळते, त्यासाठी मोठ्या शहरात जाऊन खरेदी करायची आणि त्याची बढायकी मारायची यातही अनेकांना गौरव वाटतो.. 

आता हेच बघा ना.. इंग्लंडच्या क्रेनफिल्ड या छोट्या शहरातील शेरॉन समर आणि डॅन पुडीफूट हे एक कपल. ब्रॅडफोर्डशायर या काउंटीपासून हे शहर जवळच आहे. आज नाश्त्याला काय करायचं आणि कुठे नाश्ता करायचा यावर सकाळी सकाळी त्यांची चर्चा चालू होती. घरीच नाश्ता करायचा की कुठे बाहेर हॉटेलात जायचं, कोणत्या ठिकाणी जायचं, काय खायचं.. असा बराच वेळ त्यांनी खल केला. मुळात आज काय खायचं?.. काहीतरी चमचमीत आणि चव जिभेवर काही काळ तरी रेंगाळत राहील, असा काहीतरी नाश्ता करूया यावर त्यांचं एकमत झालं. पहिल्या गोष्टीचा तर निकाल लागला. आता नेमकं काय खायचं यावर त्यांची चर्चा सुरू झाली. हे हवं, ते नको.. असं करता करता सँडविच खायच्या कल्पनेनं दोघांच्याही जिभेला पाणी सुटलं. 

आता पुढचा प्रश्न होता, सँडविच घरी करायचं की कुठे बाहेर जाऊन खायचं?.. घरी सँडविच करून खायचं, या कल्पनेला शेराॅननं लगेच नकारघंटा दिली. तिला घरी काही खायचं नव्हतं आणि स्वत: तर मुळीच करायचं नव्हतं. अर्थात डॅनची स्वत:ची सँडविच बनवायला काहीही हरकत नव्हती, पण त्यालाही इतक्या मस्त सकाळी किचनमध्ये जाऊन काही करायची मुळीच इच्छा नव्हती! 

हाही प्रश्न त्यांनी तातडीनं निकालात काढला. आता सँडविच खायला कुठे जायचं हाच तेवढा प्रश्न होता. आधी त्यांनी ठरवलं, आपल्याच देशात, जवळच असलेल्या लंडनला जाऊ. तिथे नाश्ता करू आणि घरी परत येऊ ! परंतु, थोड्यात वेळात त्यांनी इटलीच्या मिलान शहराची विमानाची तिकिटं बुक केली. विमानतळावर गेले. विमानात बसल्यानंतर तासाभरात मिलानला उतरले. तिथल्या चांगल्या लोकप्रिय रेस्टॉरंटमध्ये गेले. रुचकर स्टँडविचेसवर अक्षरश: ताव मारला. तुडुंब खाल्लं. त्यानंतर अख्खं मिलान शहर फिरले. तिथलं निसर्गसौंदर्य पाहिलं. इतरही अनेक स्थळांना भेटी दिल्या. जिभेची आणि मनाची तृप्ती झाल्यानंतर रात्री परत विमानानं आपल्या शहरात परत आले. 
आता कोणीही म्हणेल, घरात कुबेर पाणी भरत असलेल्या लोकांनाच असली थेरं सुचू शकतात! नाश्ता करायला, फक्त सँडविच खायला विमानानं, तेही दुसऱ्या देशात जायचं तर खिशात नानाजी पाहिजेत, आईबापानं भरपूर कमवून ठेवलेलं असलं पाहिजे, तरच अशा कल्पना डोक्यात येऊ शकतील ! सर्वसामान्य माणसांना हे कसं परवडणार?..

शेरॉन समर आणि डॅन पुडीफूट या कपलचं म्हणणं मात्र वेगळंच आहे. त्यांचं म्हणणं आहे, आम्ही काही फार श्रीमंत नाहीत, आम्हीही मध्यमवर्गीयच आहोत. त्यामुळेच देशातच लंडनला नाश्ता करण्याऐवजी आम्ही इटलीला मिलान येथे गेलो! शेरॉन आणि डॅन केवळ नाश्ता करण्यासाठी, सँडविच खाण्यासाठी दुसऱ्या देशात गेल्याचा त्यांचा व्हिडीओ थोड्याच काळात जगभरात व्हायरल झाला. अनेक लोकांनी त्याबाबत आश्चर्य व्यक्त केलं. कोणी त्यांचं कौतुक केलं, तर कोणी त्यांच्यावर टीकाही केली. 

त्यानंतर मात्र शेरॉन आणि डॅन यांनी याबाबत त्यांचं गणितच लोकांसमोर मांडलं. त्यांचं म्हणणं, आमच्या शहरापासून काही अंतरावर असलेल्या लंडनमध्ये जाऊन सँडविच खाण्यापेक्षा परदेशात जाऊन, खाऊन-पिऊन, मजा करून येणं फारचं स्वस्त होतं.. लंडनमधल्या सँडविचच्या किमतीपेक्षा इटलीला जाऊन तिथे ऐश करणं खरंच जास्त परवडणारं होतं, म्हणूनच आम्ही इटलीला गेलो. कारण क्रेनफिल्डहून विमानानं लंडनला जाण्याचं आणि येण्याचं प्रति माणशी तिकीट होतं अनुक्रमे ३५ पाऊंड आणि ५० पाऊंड. पण इटलीत मिलानला जाण्या-येण्याचं तिकीट होतं फक्त १४ पाऊंड! त्यामुळे लंडनमध्ये सँडविच खाण्यापेक्षा इटलीला जाऊन तिथे वाट्टेल तितकी ऐश करूनही आमचे पैसे वाचत होते. आता तुम्हीच सांगा, फायद्याचा सौदा कोणता होता ते !...

‘गरिबी’तील ‘रईसी’पणा!

डॅनच्या म्हणण्यानुसार शेरॉन पुढच्या महिन्यात ५० वर्षांची होणार आहे. त्यामुळे आम्ही आमच्या आवडत्या ५० गोष्टींची यादी केली आहे. शेरॉनच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या आधी या ५० गोष्टी आम्हाला पूर्ण करायच्या आहेत. त्यातली इटलीला जाण्याची आणखी एक गोष्ट पूर्ण झाली. त्यामुळे आम्ही खुश आहोत. कुठलाही ‘रईसजादापणा’ न करता आमचे पुढचेही प्लॅन आम्ही असे ‘रईसी गरिबी’तच पूर्ण करणार आहोत’!

----००००----

Web Title: expensive in england so go to italy for breakfast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.