शिक्षणाच्या वारीतून प्रयोगांची अनुभूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 05:37 AM2018-12-31T05:37:32+5:302018-12-31T05:37:45+5:30

वर्गात शिक्षकाऐवजी अलेक्सा रोबोट विद्यार्थ्यांना शिकवतोय. हसत खेळत गणित शिकविले जातेय.

 The experience of experiments from the curriculum of learning | शिक्षणाच्या वारीतून प्रयोगांची अनुभूती

शिक्षणाच्या वारीतून प्रयोगांची अनुभूती

Next

- अनिल बोरनारे ( शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्ते)

वर्गात शिक्षकाऐवजी अलेक्सा रोबोट विद्यार्थ्यांना शिकवतोय. हसत खेळत गणित शिकविले जातेय. झीरो बजेटमधून प्रयोगशाळा, जलदगतीने अध्यापन कसे करावे?, मेंदूची व्यायामशाळा, डिजिटल शाळा, रचनावाद, गणित प्रयोगशाळा कशी बनवावी? यासह ५० स्टॉलधारक शिक्षक सध्या ‘शिक्षणाची वारी’ या शालेय शिक्षण विभागाच्या बहुचर्चित उपक्रमांमधून राज्यभरातील शिक्षकांना अपडेट करीत आहेत.
यंदाच्या शिक्षणाच्या वारीची दमदार सुरुवात राज्याच्या राजधानीत मुंबईत वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे झाली. आंतरराष्ट्रीय प्रदर्शने आयोजित होत असलेल्या बीकेसीमध्ये शिक्षण विभागाचे बहुदा हे पहिलेच प्रदर्शन होते. मुंबईतील सुमारे १० हजारांहून अधिक शिक्षकांनी व अनेक मान्यवरांनी या प्रदर्शनाला हजेरी लावली. मुंबईनंतर शिक्षणाच्या वारीचे कोल्हापूर, वर्धा, नांदेड व जळगाव येथे आयोजन होणार आहे. तर यापूर्वी पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, नाशिक येथे आयोजित करण्यात आले होते.
सामाजिक शास्त्र, गणित व भाषा वाचन विकास, अध्यापनात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, पाठ्यपुस्तकांची बदलती भूमिका, मूल्यवर्धन, कला व कार्यानुभव, क्रीडा, किशोरवयीन आरोग्य शिक्षण, दिव्यांग मुलांसाठीचे शिक्षण, कृतीयुक्त विज्ञान तसेच विद्यार्थी व शाळेच्या गुणवत्तापूर्ण विकासासाठी शाळा व्यवस्थापन समिती व शाळा व्यवस्थापन विकास समितीमार्फत राबविण्यात आलेले विविध उपक्रम या शिक्षणाच्या वारीतून शिक्षकांना पाहता येणार आहेत.
या शिक्षणाच्या वारीत अमेरिकन शास्त्रज्ञ डॉक्टर सीमान यांनी विकसित केलेली ब्रेन जिम म्हणजेच मेंदूच्या व्यायामशाळेच्या धर्तीवर नांदेडच्या जिल्हा परिषद मल्टिपर्पज हायस्कूलमधील बाळासाहेब कच्छवे यांनी मेंदूची व्यायामशाळा उपक्रम नांदेड जिल्ह्यात राबविला आहे, त्याची माहिती ते स्टॉलवर देतात. प्रत्येक मुलाची बुद्धी सारखीच असते, परंतु बौद्धिक क्षमता विकसित करण्यासाठी मेंदूला योग्य व्यायाम देणे आवश्यक असल्याचे सांगून विविध खेळांतून ते शक्य असल्याचे सांगतात. मुंबईतील केव्हीके सार्वजनिक शाळेच्या इमारतीत मुले आनंददायी शिक्षण घेत असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक जगदीश इंदलकर सांगतात. मुंबईतील जवाहर विद्यामंदिर शाळेच्या शिक्षिका स्वराली लिंबकर व इतर अनेक शाळांमधील शिक्षक शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अविरत प्रयत्न करीत आहेत, याची माहिती देणाऱ्या स्टॉलसह अनेक स्टॉलवरून शिक्षकांना नवप्रेरणा मिळते आहे.
शिक्षणाच्या वारीला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता विभागस्तरावर असलेली शिक्षणाची वारी आता जिल्हा व तालुकास्तरापर्यंत न्यायला हवी. शिक्षक आधुनिक तंत्रज्ञानाचा अध्ययन अध्यापनामध्ये प्रभावी वापर करीत आहेत. पाठ्यपुस्तकातील क्यूआर कोडमुळे संदर्भ शोधणे सोपे झाले आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे अनेक इंग्रजी माध्यमांकडे वळलेल्या पालक व विद्यार्थ्यांची पावले पुन्हा मराठी माध्यमाच्या शाळांकडे वळली आहेत. देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने शालेय शिक्षण विभागाने आंतरराष्ट्रीय शाळा सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे यामध्ये ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांचा समावेश आहे. नव्याने शाळा सुरू न करता आहे त्याच शाळांमधील मुलांना जागतिक स्पर्धेला तोंड देता यावे, यासाठी घेतलेला हा निर्णय नक्कीच कौतुकास्पद आहे. शिक्षण क्षेत्रातील हे बदल देशाच्या विकासात मदत करतील.

Web Title:  The experience of experiments from the curriculum of learning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.