‘आविष्कार’ची प्रायोगिकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2016 01:50 AM2016-06-06T01:50:26+5:302016-06-06T01:50:26+5:30
मराठी रंगभूमीवरील प्रायोगिक चळवळीत आविष्कार या संस्थेचे नाव नेहमीच अग्रभागी तळपत राहिले आणि ही कामगिरी सुलभा देशपांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या परिश्रमाने पार पाडली.
मराठी रंगभूमीवरील प्रायोगिक चळवळीत आविष्कार या संस्थेचे नाव नेहमीच अग्रभागी तळपत राहिले आणि ही कामगिरी सुलभा देशपांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या परिश्रमाने पार पाडली. विजया मेहता, विजय तेंडुलकर व सुलभा देशपांडे यांची रंगायन नाट्यसंस्था फुटल्यावर रंगकर्मी अरविंद देशपांडे आणि अरुण काकडे यांच्यासमवेत सुलभा देशपांडे यांनी आविष्कारचा करिष्मा उभा केला. या संस्थेतून त्यांनी प्रायोगिक रंगभूमीवर समृद्धतेचे शिंपण केले. नवनव्या कलाकारांना आविष्कारने छत्रछायेखाली घेतले आणि नावारूपालाही आणले. आज मराठी रंगभूमीवरील अनेक कलावंत हे आविष्कारचीच देणगी आहे. पण सुलभा देशपांडे केवळ प्रायोगिकतेची कास धरून थांबल्या नाहीत, तर बालरंगभूमीसाठी चळवळ उभारण्याच्या दृष्टीने त्या जोमाने कामाला लागल्या आणि आविष्कारचीच एक शाखा म्हणून चंद्रशालाचा उदय झाला. आविष्कार आणि चंद्रशाला या एकाच वृक्षाच्या फांद्या आहेत आणि त्यांना जोडून ठेवणारा आधारस्तंभ हा सुलभा देशपांडे नामक व्रतस्थ रंगकर्मीचा होता. या संस्थांसाठी त्या शेवटपर्यंत काम करत राहिल्या. त्यांचे पती अरविंद देशपांडे यांच्या निधनानंतरही त्या खचल्या नाहीत, तर त्यांनी ही नाट्य चळवळ नव्या दमाच्या कलाकारांना हाताशी घेत पुढे सुरू ठेवली. या दोन्ही संस्थांवर त्यांनी पोटच्या मुलांसारखी माया केली. या संस्थांमध्ये नाटकाचे धडे गिरवणाऱ्या कलाकारांनीही त्यांच्या मायेचा कायम आदर केला आणि सुलभा देशपांडे त्यांच्या सुलभामावशी कधी झाल्या हे त्यांनाही कळले नाही. आविष्कार आणि छबिलदास शाळा यांचे नाते जुळल्यावर काही काळातच तिथे प्रायोगिकतेचा दबदबा निर्माण झाला. काही वर्षांतच सुलभा देशपांडे यांची ही प्रायोगिक नाट्य चळवळ छबिलदास चळवळ म्हणून नावारूपाला आली. छबिलदासच्या व्यासपीठावर प्रयोग करायला मिळणे यात धन्यता मानणारे अनेकजण होते. किंबहुना, छबिलदासचा टिळा माथ्यावर लागावा म्हणून धडपडणारे अधिक होते. काही वर्षांपूर्वी छबिलदासमधून आविष्कारला बाहेर पडावे लागले आणि या संस्थेचे बस्तान माहीम येथील महानगरपालिकेच्या शाळेत आले. या घडामोडीनंतरही सुलभा देशपांडे डगमगल्या नाहीत, तर त्यांनी नव्याने कंबर कसली आणि आविष्कारची नौका माहीमच्या शाळेतूनही पैलतीराची वाट कापू लागली. आविष्कारसारख्या संस्थांचे टिकून राहणे ही प्रायोगिक रंगभूमीवरील काळाची गरज आहे. सुलभा देशपांडे यांचा शिष्यवर्ग ही गरज कायम पूर्ण करत राहील यात शंका नाही. मध्यंतरी माहीमच्या यशवंत नाट्यसंकुलात प्रायोगिक रंगभूमीसाठी जागा मिळावी म्हणून सुलभा देशपांडे यांनी प्रयत्न केले होते. निदान आता त्यांच्या पश्चात तरी त्यांची ही इच्छा पूर्ण होईल का, याकडे समस्त प्रायोगिक चळवळीचे लक्ष लागून राहिले आहे.