वेदनेच्या रंगात न्हालेला प्रयोगशील प्रतिभावंत!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 02:53 AM2020-04-28T02:53:13+5:302020-04-28T02:54:21+5:30
५२ पुस्तकांचे लेखन करणारे उत्तम तुपे कथा, कादंबरीसह नाट्य वाङ्मय प्रकारातही सुचर्चित लेखक म्हणून यशस्वी ठरले. त्यांच्या ‘काट्यावरची पोटं’ आत्मचरित्राने दया पवारांच्या ‘बलुतं’ची परंपरा समृद्ध केली.
- श्रीपाल सबनीस
शिक्षणाच्या इयत्ता कमीत कमी शिकूनही अव्वल दर्जाचे साहित्य लिहिणारे उत्तम बंडू तुपे हे प्रतिभावंत मराठी वाङ्मय विश्वातील उपेक्षित लेखक आहेत. त्यांच्या निधनाचा चटका कोणत्याही संवेदनशील मानवी काळजाला बसणारच! अण्णा भाऊ साठे यांच्याप्रमाणेच तुपे यांचा जन्मसंदर्भ मातंग जातीचा असल्याने सर्वार्थाने उपेक्षेचे जीवन त्यांच्या वाट्याला आले. खटाव ते पुणे हा भौगोलिक प्रवास पूर्ण करताना त्यांची आत्या, मानलेली बहीण मीनाताई व वामनराव देशपांडे यांचे सहकार्य व सद्भावना त्यांना साहित्यविश्वात सन्मानित करण्यास कारणीभूत ठरले. साहित्य अकादमीच्या पुरस्कारासह राज्य सरकारच्या सन्मानाचेही ते मानकरी ठरले. ५२ पुस्तकांचे लेखन करणारे उत्तम तुपे कथा, कादंबरीसह नाट्य वाङ्मय प्रकारातही सुचर्चित लेखक म्हणून यशस्वी ठरले. त्यांच्या ‘काट्यावरची पोटं’ आत्मचरित्राने दया पवारांच्या ‘बलुतं’ची परंपरा समृद्ध केली.
तरीही दलित साहित्यप्रवाहात समीक्षकांनी जो न्याय ‘बलुतं’ला दिला, तो ‘काट्यावरची पोटं’ला मिळाल्याचे दिसत नाही. राज्य शासनाचा पुरस्कार मात्र त्यांना मिळाला. जोगतिणींची वेदना कलात्मक पातळीवर अभिव्यक्त करण्यासाठी तुपे यांनी हे अनुभवविश्व जवळून अनुभवलेच, म्हणूनच स्त्रीची वेदना आणि परंपरेचा गुंता अंधश्रद्धेवर ‘झुलवा’ कांदबरीत त्यांना उलगडता आला. माझ्या दृष्टीने तुपे यांची ही सर्वश्रेष्ठ कलाकृती आहे. त्याच कादंबरीवर आधारित ‘झुलवा’ नाटकाने मराठी रंगभूमी गाजवली. ही एकच कलाकृती त्यांनी निर्माण केली असती तरी त्यांचे श्रेष्ठत्व अबाधितच राहिले असते. अर्थात, वामन केंद्रे, सयाजी शिंदे, सुकन्या कुलकर्णी आणि सर्व अभिनेत्यांचे ‘झुलवा’मधील कलात्मक योगदान गौरवास्पद आहे. साहित्य अकादमीने केलेली तुपे यांची ‘भस्म’ ही कादंबरी मानवी जीवनाच्या गाभ्याला आकळून सामाजिक-सांस्कृतिक अनुबंध उलगडते.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक मंडळाच्या सदस्यपदी निवड झालेला हा लेखक आयुष्याच्या पूर्वार्धात मोलमजुरी करून जगत होता, हा वास्तव इतिहास आहे. सामाजिक जाणिवेतून संवेदनशील व्यक्ती व संस्थांनी त्यांना म्हातारपणात घर बांधून द्यावे व त्याचा उपभोगही फार काळ घेता येऊ नये, असे दुर्दैव त्यांच्या वाट्याला आले. शाहीर अण्णा भाऊ साठेंच्याच वैचारिक भूमिकेचा व वेदनेचा वारसा तुपे यांच्या वाट्याला आला. मसनजोग्याच्या अंगाला राख लावून जगण्यावर आधारित ‘भस्म’ कलाकृती दुसऱ्या अर्थाने तुपे यांच्याच खासगी जीवनाचे प्रतिनिधित्व करते. म्हणून तर ‘भस्म’वर आधारित ‘भसम्या’ चित्रपट लक्षात राहतो. शेतकऱ्यांच्या मरणयात्रांची स्पंदने या लेखकाने मालकीची शेती नसताना शेतकरी आत्महत्यापर्वापूर्वीच कादंबरीतून मांडली आणि ‘इजाळं’ कलाकृतीचा जन्म झाला.
अशा अनेक कथा-कादंबरी, कलाकृतींनी मराठी साहित्यविश्व प्रभावित आहे. तरीही मराठी समीक्षकांनी तुपे यांच्या साहित्याविषयी उदासीनता का बाळगली? संघाच्या प्रभावातून त्यांची वाटचाल झाली आणि नाशिकच्या समरसता मंचप्रणीत साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले, म्हणून तर त्यांच्या वाट्याला उपेक्षा आली नसावी? निदान उजव्या साहित्यप्रवाहातील विद्वानांनी तरी त्यांच्या साहित्याला ग्रांथिक न्याय द्यायला हवा होता. ‘दलित’ ही परिभाषा तुपे यांना अमान्य होती; पण साहित्यप्रवाहातील दलित-सवर्ण व दलितांमधील जातव्यवस्था या कुरूप वास्तवतेचा परिणाम यासंदर्भात कारण ठरल्याची शक्यता आहे. स्पष्ट व परखड बोलणारे तुपे अस्मितेचे जीवन जगले; पण आर्थिक व सामाजिक पर्यावरणाचा अन्यायभोग त्यांच्या वाट्याला सदैव राहिला. अगोदर त्यांच्या पत्नीवरचा अर्धांगवायूचा घाला आणि नंतर स्वत:वरील संकट कोणत्याही प्रतिभावंताला सोसणे कठीणच! तरीही अनेक अस्सल कलाकृतींचा श्रेष्ठ खजिना मराठी वाचकांसाठी कायम ठेवून त्यांनी जगाचा निरोप घेतला.
लाल तत्त्वज्ञानाचे अण्णा भाऊ व भगव्याच्या प्रेमातील उत्तम तुपे रंग वजा करून मला आपले वाटतात. त्यांच्या साहित्यविश्वाला कोणत्याही खास रंगात बुडवून पाहता येणार नाही. कारण, ते वेदनामुक्तीच्या धोरणाने प्रेरित लेखक होते व वेदनेला कोणताही रंग नसतो. जात, धर्म नसतील म्हणूनच त्यांचे वाङ्मय मानवाच्या अस्तित्वाला नवे परिमाण देते. ‘आंदण’, ‘कोबरा’, ‘पिंड’सारखे कथासंग्रह व ‘चिपाड’, ‘झापळ’, ‘शेवंती’, ‘संतू’सारख्या कादंबºया तुपे यांच्या व्यामिश्र भूमिकेचा व अव्वल प्रतिभेचा गंध मिरविताना दिसतात. तेच खरे साहित्य असल्याची साक्ष देणारे हे वाङ्मयीन संचित केवळ तुपे यांचेच नव्हे, तर मराठी संस्कृतीचे वैभव आहे. मृत्यूनंतरच्या गौरवापेक्षा जिवंतपणीच सरकार व समाजाने प्रतिभावंताला योग्य तो सन्मान देणे सुसंस्कृतीचे लक्षण ठरते. त्यांच्या जिवंतपणी आपण सर्वजण कर्तव्यात कमी पडलो. निदान मृत्यूनंतर तरी संवेदना जपणे आवश्यक असा प्रसार कोणत्याही लेखक-कलावंतांबाबत घडू नये, हीच उत्तम तुपे यांना विनम्र श्रद्धांजली!
( ज्येष्ठ साहित्यिक, पुणे)