युनोने लपवलेले तापमानवाढीचे स्फोटक सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 05:54 AM2018-10-16T05:54:21+5:302018-10-16T05:55:21+5:30
तंत्रज्ञान आणि पैशांचा वापर करून यातून मार्ग काढला जाईल, या समजुतीमुळे मानवजात आपल्या कुंभकर्णी निद्रेतून जागे व्हायला तयार नाही.
युनोच्या, वातावरण बदलाचा अभ्यास करणाऱ्या गटाने (आयपीसीसी) दक्षिण कोरियातील परिषदेत, सन २०३० मध्ये उद्योगपूर्व काळाच्या तुलनेत १.५ अंश सेल्सिअसने पृथ्वीच्या सरासरी तापमानात वाढ होणार असून, हा मानवजात वाचण्यासाठी शेवटचा इशारा असल्याचे म्हटले आहे. तापमानातील २ अंशाची वाढ पुढील काही दशकांत होईल व भयंकर स्थिती निर्माण होईल, असे आयपीसीसी म्हणते. प्रसारमाध्यमांनी हे वृत्त दिल्यावर थोडी खळबळ माजली. परंतु तंत्रज्ञान आणि पैशांचा वापर करून यातून मार्ग काढला जाईल, या समजुतीमुळे मानवजात आपल्या कुंभकर्णी निद्रेतून जागे व्हायला तयार नाही.
मुळात या अहवालात दिलेल्या माहितीतून गांभीर्य स्पष्ट होत नाही. विशेषत: गेल्या तीन वर्षांतील नासा-अमेरिका, जागतिक हवामान संघटना - युनो, वातावरण व महासागराचे राष्ट्रीय प्रशासन-अमेरिका, हवाई विद्यापीठ-युनो या पृथ्वीचा अभ्यास करणाºया मूळ विज्ञान संस्थांच्या अहवालांनुसार चालू वर्षी म्हणजे सन २०१८ मध्येच सन १७५० च्या तुलनेत पृथ्वीच्या सरासरी तापमानात १.५ अंशाची धोकादायक वाढ झाली आहे. पॅरिस करारात उल्लेख केलेली, मानवजात नष्ट होण्याकडे वाटचाल सुरू करणारी २ अंशाची वाढ फक्त पुढील ३ ते ५ वर्षांत, फार फार तर ८ वर्षांत होईल.
वरील सध्याचा द. कोरियातील अहवाल म्हणतो की, आतापर्यंत १ अंशाची वाढ झाली होती. मात्र हे चूक आहे. १ अंशाची वाढ तर गेल्या शतकाच्या शेवटी म्हणजे सन २००० च्या दरम्यान झाली होती. त्यानंतर वाढ स्फोटक बनली. २०१५ पासून तर महाविस्फोटक वाढ सुरू झाली. म्हणूनच डिसेंबर २०१५ ला सर्व १९६ देशांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत ‘पॅरिस करार’ केला गेला. या शतकातील सर्व वर्षे पृथ्वीवरील सर्वाधिक उष्ण वर्षे ठरणे व इतर अनेक निरिक्षणांतून आयपीसीसीच्या अहवालांपेक्षा खूप जास्त भीतीदायक बाब समोर येते.
जर्मनीत ‘बॉन’ येथे नोव्हेंबर २०१७ मध्ये युनोची महत्त्वाची परिषद झाली. तेथे जागतिक हवामान संघटनेने जाहीर केले की, विशिष्ट मर्यादेपलीकडे वातावरणातील कार्बन झाल्याने आता तापमान न थांबता वाढतच राहणार आहे. हा कल किमान ५० वर्षे नक्की टिकेल, कदाचित शेकडो वर्षे. याचा अर्थ तापमानवाढ अपरिवर्तनीय झाली आहे. ज्याची भीती होती ते घडले आहे. बुद्धीचा तोरा मिरवणाऱ्या एका महामूर्ख प्राण्यामुळे जीवनाचा अपूर्व आविष्कार बाळगणारा हा एकमेव ग्रह आता निर्जीव होणार आहे. तरी शिक्षित मनुष्य एखादा चित्रपट पाहावा वा एखादी विज्ञानरंजक कथा कादंबरी वाचावी त्याप्रमाणे अलिप्त आहे. तंत्र व अर्थसंमोहनामुळे त्याचा रोबोट झाला आहे. त्याने माणूसपण गमावले आहे.
या ग्रंथात नासाच्या, गोडार्ड इन्स्टिट्यूट आॅफ स्पेस सायन्सेसचे माजी संचालक डॉ. जेम्स हॅनसेन यांनी मुखपृष्ठावर ठळक अक्षरात छापले आहे, ‘येणाºया वातावरण महाविस्फोटाबाबतचे सत्य आणि मानवजात वाचवण्यासाठी आपणास असलेली शेवटची संधी.’ ही संधी चालू दशकात आपण गमावत आहोत.
आयपीसीसीचा अहवाल म्हणतो की, या चालू २१व्या शतकाच्या शेवटी सागरपातळीत १० सेंटीमीटर म्हणजे ४ इंच वाढ होईल. हे हास्यास्पद आहे. कारण, पृथ्वीवरील ध्रुवीय व पर्वतांवरील बर्फाचे साठे वेगाने वितळत आहेत. चिंतेची बाब ही की, अंटार्क्टिकाचा व ग्रीनलँडचा बर्फाळ विभाग पृथ्वीच्या सरासरीपेक्षा दुप्पट वेगाने तापत आहे. अतिवेगाने वितळत आहे. स्टॉर्म्स आॅफ माय ग्रँडचिल्ड्रनमध्ये पान १३ वर दिलेल्या नासाच्या अभ्यासाप्रमाणे, ‘२ अंशाची मर्यादा ओलांडल्यावर पृथ्वी, इतिहासातील ३० लाख वर्षांपूर्वीच्या प्लायोसीन कालखंडातील स्थितीत जाईल. तेव्हा सागराची पातळी आतापेक्षा ८० फूट वर होती.’ ही सरासरी तापमानातील २ अंशाची वाढ फक्त पुढील ५ ते १० वर्षांत होईल. ८० फूट बुडण्याची सुरुवात होईल. काही दशकांत ते घडेल. आयपीसीसी म्हणते तसे या शतकाच्या शेवटी ४ इंच नव्हे. आयपीसीसी सत्य सांगणे टाळत आहे.
आयपीसीसी फार उशिरा, फार थोडे सांगत आली. याला एक कारण असे की, हे शास्त्रज्ञ सरकारांनी नेमले आहेत. विज्ञानाचा उगमच सत्तेशी लढून झाला. त्यागातून झाला. पण या संस्थेला सत्तेशी जुळवून घ्यायचे आहे असे दिसते. पण अंतिम सत्ता पृथ्वीची, निसर्गाची, त्या सर्वव्यापक तत्त्वाची, सत्याची आहे याचा आयपीसीसीला विसर पडला आहे. त्यांच्या, सन २००७च्या वातावरण बदलावर शिक्कामोर्तब करणाºया अहवालातही सन २०१५ पर्यंत खनिज इंधनांना कळस गाठू देण्याची भाषा आहे. आजही २०१८ मध्ये खनिज इंधनांचा चढता वापर आहे. आयपीसीसी हा वापर तत्काळ थांबवा, असे स्पष्ट सांगत नाही. हा मानवजातीशी केलेला द्रोह आहे.
तापमानवाढ मानवजातीचे पृथ्वीवरून उच्चाटन घडवेल हे माहीत असताना तिला जबाबदार असलेल्या अर्थव्यवस्थेची भलावण करणे, ही प्रगतीचे पांघरूण घेतलेल्या भोगलोलुपतेमुळे आलेली विकृती आहे. मानवजातीने अधिक शब्दच्छल न करता ताबडतोब यंत्रपूर्व ऊर्जाविरहित जीवनपद्धतीकडे परत फिरणे ही काळाची गरज आहे.
-अॅड. गिरीश राऊत
निमंत्रक, भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळ