अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी तरी़

By admin | Published: September 6, 2015 04:21 AM2015-09-06T04:21:20+5:302015-09-06T04:21:20+5:30

या देशातल्या पहिल्या परंपरेच्या प्राचीन फॅसिझमने आज पुन्हा उसळी घेतली आहे. तिचा मुकाबला करायचा असेल तर चार्वाकांपासून आंबेडकरांपर्यंत असलेल्या या दुसऱ्या परंपरेला

Expression for freedom | अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी तरी़

अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी तरी़

Next

- राजा शिरगुप्पे

या देशातल्या पहिल्या परंपरेच्या प्राचीन फॅसिझमने आज पुन्हा उसळी घेतली आहे. तिचा मुकाबला करायचा असेल तर चार्वाकांपासून आंबेडकरांपर्यंत असलेल्या या दुसऱ्या परंपरेला अधिक सशक्त करून इथल्या दुसऱ्या परंपरेतील स्त्री-पुरुषांच्या डोक्यावर असलेल्या पहिल्या परंपरेचे जोखड फेकून देण्यासाठी कृतिशील व्हायला हवे. आणि हे सामर्थ्य केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं आहे. म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपणे निकडीची गरज आहे. या स्वातंत्र्याचे मोल समजून ती लोकचळवळ झाली पाहिजे.

लेखन आणि भाषण ही केवळ सामाजिक नव्हे, तर अतिशय उच्च दर्जाची आणि व्यापक अशी राजकीय कृती आहे, असा ठाम विश्वास बाळगणारा मी एक लेखक आहे. कारण अभिव्यक्ती ही माझ्या अस्तित्वभानाची आत्यंतिक गरज आहे, त्यामुळेच ती मला निसर्गत: लाभलेली आहे़ म्हणजेच माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे पूर्णत: नैसर्गिक आहे. त्यावर कुठल्याही बाह्यशक्तींचा ताबा असू शकत नाही. भारतीय संविधानातदेखील प्रत्येक माणसासाठी हे मूल्य मान्य केले गेले आहे. पण अगदी इतिहासपूर्व काळापासून इतिहासाची तपासणी केली, तर या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा नेहमीच गळा घोटण्याचा प्रयत्न झालेला आहे. यातला पहिला बळी ख्रिस्तपूर्व कालीन ३९९व्या सालात सॉक्रेटिसच्या रूपाने घेतलेला दिसतो. तर अगदी ताजा बळी डॉ. एम. एम. कलबुर्गींच्या रूपाने घेतलेला दिसतो. म्हणजे अभिव्यक्त होऊ पाहणाऱ्या, जी अभिव्यक्ती एकूणच जीवमात्रांच्या स्वातंत्र्याचा उद्घोष करते, त्या जीवमात्रांचे शोषण आणि पीडन करणाऱ्या सर्व अनुचित प्रकारांचा निषेध करते, अशांना दडपून टाकण्याचा किंवा नष्ट करण्याचा प्रघात फार पूर्वीपासून संपूर्ण जगभर चालू असलेला दिसतो. अगदी टोकाची वैज्ञानिक प्रगती झालेल्या आजच्या काळातही वैज्ञानिक दृष्टी म्हणजे काय, हे स्पष्ट झालेल्या युगातही ही अश्लाघ्यता चालूच आहे. ही मोठीच क्लेशदायक आणि शोककारी गोष्ट आहे. असे या व्यवस्थेत काय आहे, की हे पाशवीपण नष्ट होऊ शकत नाही? याचा सर्व विवेकी मनांनी शोध घेण्याची आत्यंतिक गरज आहे. एकेकाळी हिंंदू हा शब्द प्रदेशवाचक होता. पण १७-१८व्या शतकापासून त्याला धर्मवाचक अर्थ चिकटला. खरेतर वैदिक धर्म आणि अवैदिक धर्म अशा धर्म या संज्ञेला प्राप्त दोनच मुख्य परंपरा या देशात बुद्धाच्या आधीपासूनच म्हणजे तीन-एक हजार वर्षांपूर्वीपासूनच अस्तित्वात असाव्यात, असे साक्षेपी इतिहासकारांच्या साक्षीने म्हणता येईल. वैदिक परंपरा ही ज्यांचा जमिनीशी, जमीन पिकवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या श्रमाशी कसलाही संबंध नव्हता. पृथ्वीवर जे आयते उपलब्ध आहे, त्याचा उपभोग घेण्याकडे त्यांचा कल होता. त्यामुळे निर्मिती त्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टाची, श्रमाची त्यांना यत्किंचितही जाणीव नसावी. त्यामुळे हा आयता उपभोग घेण्यासाठी त्या प्रकारच्या धर्मश्रद्धा, मूल्यव्यवस्था त्यांनी निर्माण केल्या. त्याच्या समर्थनार्थ आपली तत्त्वज्ञाने निर्माण केली. त्याच्या जोरावर शरीरश्रमातून जगणाऱ्या माणसाला त्यांनी जनावरांपेक्षा हीन केले. त्यांचे मेंदू आपले गुलाम राहतील आणि त्यांचे श्रम ते आपल्यासाठी वापरत राहतील, अशा प्रकारच्या श्रद्धा आणि अस्मिता तयार केल्या आणि हे सारे करणे सत्तेशिवाय शक्य नाही; म्हणून युक्ती- प्रयुक्तीने राजाश्रय मिळविला. राज्यकर्त्यांना परमेश्वराचे पृथ्वीवरले रूप म्हणून धर्मश्रद्धांच्या नावाखाली संरक्षण दिले. त्याच्या बदल्यात या राज्यकर्त्यांनी या धर्मश्रद्धा निर्माण करणाऱ्या पुरोहितांना संरक्षण आणि भौतिक संपत्तीचे लाभार्थी बनविले. पण हे खोटेपण उघडे पाडणाऱ्या, भौतिकवादी तत्त्वज्ञानाची मांडणी करणाऱ्या अनेक परंपरा या देशात होत्या. पण या परंपरांना जवळपास वैज्ञानिक सत्यावर आधारलेल्या भूमिकांना तार्किक आणि सुसंगत उत्तरे देण्याची कुवत या शोषणवादी तत्त्वज्ञानाकडे नसल्याने असा विचार मांडणाऱ्या व्यक्तींचे वा समूहांचे आवाजच बंद करणे हा उपाय अवलंबिला. बुद्धांच्या हजारो अनुयायांना यांनी कापून काढले. शरण संतांच्या कत्तली केल्या.
आजही केवळ भारतातच नव्हे, जगभर हाच हैदोस या शक्तींनी चालविला आहे. अब्राहम लिंंकनपासून मार्टीन ल्युथर किंंगपर्यंत तर भारतात महात्मा गांधींपासून अगदी डॉ. कलबुर्गींपर्यंत हे सारे त्याच परंपरेतून चालू आहे. खरेतर मुस्लीम किंंवा ख्रिश्चन देशांतून अलीकडे जे काही घडते आहे, त्यावरून त्यांना हिंंस्र आणि आक्रमक वृत्तीचे धर्म समजण्याचा गैरसमज पसरू लागला आहे. वस्तुत: इतिहास नीट तपासला तर या दोन्ही धर्मांमध्ये स्व-बलिदानाने, प्रेमाने, सेवेने मनुष्यवृत्ती बदलण्याचा प्रयत्न करण्याचा आणि तसे आदर्श आपल्या ग्रंथातून मांडल्याचे या धर्माच्या धर्मग्रंथांतून प्रामुख्याने दिसून येते.

(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत)

Web Title: Expression for freedom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.