डर के आगे क्या है? जीत? या मौत?...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2023 08:04 AM2023-08-15T08:04:12+5:302023-08-15T08:04:34+5:30

अलीकडच्या काळात अतिशय जोखमीच्या, प्राण संकटात टाकू शकणाऱ्या ठिकाणी जाण्याची लोकांना ओढ लागली आहे.

extreme tourism in the world | डर के आगे क्या है? जीत? या मौत?...

डर के आगे क्या है? जीत? या मौत?...

googlenewsNext

११० वर्षांपूर्वी टायटॅनिक बुडाली; पण त्याचं गारुड अजूनही सुरू आहे आणि लोकांच्या मनावरील त्याचा महिमा कमी झालेला नाही. आजही अनेक जण समुद्राच्या तळाशी असलेल्या या जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी मोहिमा आखत असतात. हेच अवशेष पाहण्यासाठी अलीकडेच पाच अब्जाधीशांची टीम टायटन पाणबुडीतून गेली होती. पण, दुर्दैवानं टायटॅनिकप्रमाणेच या टायटन बोटीलाही जलसमाधी मिळाली आणि या पाचही अब्जाधीशांचा त्यात अंत झाला.

या पाणबुडीत कोण-कोण होतं? पाकिस्तानी वंशाचे अब्जाधीश उद्योजक शहजादा दाऊद, त्यांचा मुलगा सुलेमान दाऊद, अब्जाधीश व्यावसायिक हॅमिश हार्डिंग, फ्रेंच डायव्हर पॉल- हेन्री नार्गोलेट आणि या दूरचं व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीचे प्रमुख, ओशनगेटचे सीईओ स्टॉकन रश यांचा त्यात समावेश होता.

हा झाला एक प्रसंग. पण, अलीकडच्या काळात अतिशय जोखमीच्या, प्राण संकटात टाकू शकणाऱ्या ठिकाणी जाण्याची लोकांना ओढ लागली आहे. अशा कुठल्यातरी ठिकाणी आपण जायचं, जिथे आजवर कोणीच गेलेलं नाही, जिथे जाण्यात थ्रिल आहे, रोमांच आहे, जोखीम आहे, भीती आहे, आपण पुन्हा जीवंत परत येऊ याची शक्यता कमी आहे. तरीही अशा ठिकाणी जाण्याची उर्मी लोकांना स्वस्थ बसू देत नाहीए.

अर्थातच ही सर्वसामान्य माणसं नाहीत. ज्यांच्याकडे पैशांची ददात नाही. ज्यांच्या घरी कुबेर पाणी भरतो. अशी ही सारी लोकं आहेत. कुणाला समुद्राच्या तळाशी जायचंय, कुणाला अवकाशात जिथे प्राणवायूही नाही, अशा ठिकाणी पोहोचायचंय, तर कुणाला जगाच्या अशा ठिकाणी आपल्या नावाचा झेंडा रोवायचाय, जिथे आजवर कुणीही गेलेलं नाही. आपल्या प्राणावर हे लोक एवढे उदार का झालेत? यातल्या काहींना खरोखरच थ्रिल हवंय, काहीतरी हटके, जगावेगळं करायचंय, जे केवळ पैशानं विकत घेता येऊ शकत नाही. अर्थात पैसा आहे, म्हणूनच ते हे धाडस करू शकतात. कारण ज्या ठिकाणी त्यांना जायचंय, तिथे जाण्यासाठीच हजारो डॉलर्सचा खर्च येतो. कोणत्याही सर्वसामान्य माणसाचं ते काम नाही. त्यामुळे मिळणारी प्रसिद्धी, जगात होणारं नाव. हा दुसरा एक घटकही त्याला कारणीभूत असावा; पण, जगातले अनेक अब्जाधीश असं जगावेगळं धाडस करण्यासाठी उद्युक्त होताहेत, जणूकाही त्यांच्यात याबाबतची स्पर्धाच लागली आहे.

या प्रकाराला म्हटलं जातं 'एक्स्ट्रीम टुरिझम' कारण या टुरिझमसाठी त्यांनी खरोखरच टोकाचं पाऊल उचललेलं असतं. खतरों के खिलाड़ी बनून डर के आगे जीत है या मौत.. हे त्यांना पाहायचं आहे. एक्स्ट्रीम टुरिझम हा प्रकार तसा जुना असला तरी या मोहिमा अगोदर मुख्यतः वैयक्तिक पातळीवर आखल्या जायच्या. ज्याला अशा धाडसी मोहिमांवर जायचं असेल, तो स्वतःच त्याची बरीचशी तजवीज करायचा. आता लोकांना अशा मोहिमांवर घेऊन जाण्यासाठी नवनव्या संस्थाही उदयाला येताहेत. कारण यात पैसा आहे, प्रसिद्धी आहे आणि एक अनोखं आकर्षणही आहे. कोणी अशा मोहिमांवर जात असलं किंवा जाऊन आलं की लोकांचेही त्याच्याकडे कान टवकारतात. माध्यमंही अशा गोष्टींना वारेमाप प्रसिद्धी देतात. त्यामुळे या मोहिमांकडे आता साऱ्याच धनिकांचं लक्ष लागलं आहे. हे क्षेत्र २०३०पर्यंत तब्बल साडेसहा टक्क्यांनी वाढेल,

पाण्याखाली की आकाशाच्या पलीकडे?

एक्स्ट्रीम टुरिझमचे हे काही प्रकार पाहा.. डीप सी टुरिझम- टायटॅनिकच्या अवशेषांना भेट, पोल टुरिझम- अंटार्क्टिकाची मोहीम, अॅटॉमिक दुरिझम चेर्नोबिल दुर्घटना जिथे एका रात्रीतून संपूर्ण शहराची स्मशानभूमी झाली होती.. व्होल्कॅनो टुरिझम ज्वालामुखीच्या स्थळांना भेट.. अंडरवॉटर केव्ह पाण्याखालच्या गुहा.. अशा ठिकाणी जायचं तर प्रचंड मोठा खर्च येतो. पण, त्याहीपेक्षा जाणकारांची चिंता वेगळीच आहे. अशा पर्यटनामुळे दुर्घटनांची संख्या वाढते आहे आणि पर्यावरणाचाही हास होतो आहे.

असा जाणकारांचा अंदाज आहे. त्यानंतर या क्षेत्राला आणखीच बरकत येईल. वेगवेगळ्या धाडसी मोहिमा सध्या आखल्या जात असल्या, तरीही अब्जाधीशांची सर्वाधिक पसंती आहे ती अंतरीक्ष पर्यटनाला अणुबॉम्बनं जी स्थळं प्रत्यक्ष उद्ध्वस्त करण्यात आली, अशा ठिकाणी जाणं, दक्षिण किंवा उत्तर ध्रुवावर जिथे सजीव सृष्टीच फार दुर्मीळ आहे अशा ठिकाणांना भेट देणं, जिथून कोणीच परत येत नाही अशी कुख्याती आहे, अशा ठिकाणांना धडक देणं, ज्या ठिकाणांना "भुता-खेतांनी, पिशाच्चांनी' पछाडलेलं आहे, ज्या जागा अतिशय गूढ, भयानक, भीतीदायक आहेत अशा ठिकाणी जाऊन परत येण्याचा' अनुभव घेणं अशा अनेक गोष्टी या क्षेत्रात मोडतात.


 

Web Title: extreme tourism in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.