आमने-सामने: राजकारणातील घराणेशाही संपणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 05:55 AM2022-08-21T05:55:37+5:302022-08-21T05:56:08+5:30

राजकारणात घराणेशाही संपणार का, यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. 

Face to face will dynasties end in politics | आमने-सामने: राजकारणातील घराणेशाही संपणार का?

आमने-सामने: राजकारणातील घराणेशाही संपणार का?

Next

शब्दांकन : दीपक भातुसे

पंतप्रधानांनी घराणेशाहीचा उल्लेख करताना अप्रत्यक्षपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा पक्षांवर टीका केलेली आहे. नरेंद्र मोदी यांना माझा साधा प्रश्न आहे. भाजपमध्ये जे संरक्षणमंत्री आहेत राजनाथसिंह त्यांचा मुलगा पंकज सिंह हा नोएडातून भाजपचा आमदार आहे. हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री पी. के. धुमल यांचा मुलगा अनुराग ठाकूर हे मंत्री आहेत. उत्तर प्रदेशचे दिवंगत माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचा मुलगा राजवीर सिंह भाजपचा खासदार हाेता. कल्याण सिंह यांचा नातू संदीप सिंह उत्तर प्रदेशमध्ये मंत्री आहे. मनेका गांधी यांचा मुलगा वरुण गांधी सुलतानपूरमधून भाजपचा खासदार आहे. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा मुलगा दुष्यंत झालावाडमधून भाजपचा खासदार आहे, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांचा मुलगा अभिषेक सिंह राजकारणात आहे. ही महाराष्ट्रबाहेरची उदाहरणे झाली. महाराष्ट्रात सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू शोभाताई फडणवीस मंत्री होत्या, त्यांचे वडील गंगाधर फडणवीस आमदार होते. कदाचित भविष्यात त्यांची मुलगी पण राजकारणात येईल. गोपीनाथ मुंडे यांच्या दोन्ही मुली राजकारणात आहेत. दिवंगत प्रमोद महाजन यांची मुलगी खासदार आहे. म्हणजे राजकारणात जर एखाद्या व्यक्तीचा मुलगा चांगले काम करत असेल आणि जनतेने त्याला स्वीकारले तर ही घराणेशाही असू शकत नाही. 
अमोल मिटकरी, आमदार, राष्ट्रवादी 

मुळात भाजपमध्ये अंतर्गत घराणेशाही कुठे आहे? मुद्दा काय आहे, घराणेशाहीवरच जे पक्ष चालत आहेत त्याबाबतचा. मुलायमसिंह यादव त्यांचा मुलगा अखिलेश यादव, नेहरूंची मुलगी, त्यांचा मुलगा, मग राजीव गांधींचा मुलगा हा घराणेशाहीचा मुद्दा आहे. याचा अर्थ असा नव्हे, की एखादा व्यक्ती राजकारणात असेल तर त्याच्या मुलीने किंवा मुलाने राजकारणात यायचेच नाही. त्यावर बंदी नसते. त्यामुळे भाजप नरेंद्र मोदी यांच्यानंतर त्यांचे कोण नातेवाईक पक्ष चालवणार, असा पक्ष चालत नाही. मेरिटवर, कर्तृत्वावर, चारित्र्यावर माणसाचे मोठेपण मोजले जाते आणि त्याला त्या उच्च पदावर जाता येते. काँग्रेसमध्ये असे आहे का?, आज. आदित्य ठाकरे पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर पहिल्या रांगेत बसतो, हे कसे काय? भाजपमध्ये असे नाही. एखाद्या नेत्याचा मुलगा आमदार झाला तर तो पहिल्या दिवशी पहिल्या रांगेत बसत नाही. अगदी महाराष्ट्राचे उदाहरण घ्यायचे म्हटले तर २०१४ साली रावसाहेब दानवेंचा मुलगा आमदार झाला, पण त्याला आम्ही पहिल्या रांगेत नाही बसवले, तो मागच्या रांगेतच बसला. जे लोक पहिल्यांदा आमदार झाले होते, त्यांना मागच्या रांगेतच बसवले होते, नंतर जशी ज्येष्ठता वाढत गेली तसे त्यांना पुढच्या रांगेत आणले. घराणेशाहीची कल्पना घराणेशाहीच्या आधारावर पक्ष चालतात त्याला घराणेशाही म्हटले जाते. 
अतुल भातखळकर, आमदार, भाजप

Web Title: Face to face will dynasties end in politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.