गुप्तचर संघटनांचे अपयश

By admin | Published: December 22, 2014 05:39 AM2014-12-22T05:39:58+5:302014-12-22T05:39:58+5:30

इसिससाठी टिष्ट्वटर चालविणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली ही दिलासा देणारी गोष्ट आहे.

Failure of detective organizations | गुप्तचर संघटनांचे अपयश

गुप्तचर संघटनांचे अपयश

Next

अवधेश कुमार,ज्येष्ठ पत्रकार - 

इसिससाठी टिष्ट्वटर चालविणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली ही दिलासा देणारी गोष्ट आहे. ब्रिटनच्या चॅनेल फोरने मेहदी नावाची व्यक्ती इसिससाठी भारतातून टिष्ट्वटर चालवीत असते हे उघड झाल्यावर भारतातील गुप्तचर संघटनांना धक्काच बसला. २४ वर्षे वयाचा पश्चिम बंगालमधील रहिवासी मेहदी मसरूर बिस्वास हा बंगळुरू येथे नोकरी करतो. बंगळुरूच्या पोलिसांनी त्याला अटक केल्यावर आपण इसिससाठी काम करीत असतो हे त्याने मान्य केले. इसिसच्या जागतिक दहशतवादाशी त्याचा संबंध कसा जुळला याविषयी लिहिण्यापूर्वी ज्या व्यक्तीची माहिती विदेशी चॅनेलच्या एका महिला पत्रकाराला मिळते ती माहिती भारतीय गुप्तचर संघटनेला का मिळत नाही, असा प्रश्न निर्माण होतो.
वास्तविक इसिस संघटनेच्या हालचालींविषयी भारताच्या गुप्तचर संघटनेने जागरूक असायला हवे. कारण इसिसने इस्लामिक राष्ट्रांचा जो नकाशा प्रसिद्ध केला आहे त्यात भारताचाही समावेश करण्यात आला आहे. इसिसकडून प्रशिक्षण घेतलेले युवक भारतात दहशतवादी कारवाया करीत असतात ती बाब लपून राहिलेली नाही. या संघटनेशिवाय अल् कायदाने दक्षिण आशियासाठी स्वतंत्र केंद्राची निर्मिती केली असून, या केंद्राचा प्रमुख भारतीय व्यक्ती आहे ही माहिती अमेरिका व इस्राईलच्या गुप्तचर संघटनांनी जाहीर केली आहे. सोशल नेटवर्किंग साईटचा वापर इसिस आणि अल् कायदा या संघटना करीत असतात. त्यामुळे भारताच्या गुप्तचर संघटनांनी या साईटवर लक्ष ठेवायला हवे हे कुणालाही सहज कळण्यासारखे आहे. पण गुप्तचर संघटनांना त्याची जाणीव नसावी ही गोष्ट या संघटनांचा हलगर्जीपणा दर्शविणारी आहे.
मेहदी जो टिष्ट्वटर अकाऊन्ट चालवितो त्याचे १७ हजार अनुयायी असून, २० लाख दर्शक आहेत ही एकच गोष्ट हा अकाऊन्ट किती धोकादायक आहे याची कल्पना देणारी आहे. या साईटवरून इसिसविषयी उघड उघड चर्चा होत असते. इसिस सोबत काम करून कल्याणला परत आलेला मजिद हा गुप्तचर संघटनेच्या ताब्यात आल्यावर, त्याने दिलेल्या माहितीमुळे, बंगळुरूमधून टिष्ट्वटर अकाऊन्ट चालविणाऱ्या व्यक्तीने दिलेल्या माहितीमुळे आपण इसिसच्या संपर्कात आलो ही बाब स्पष्ट झाली. यावरून मेहदीतर्फे हे काम बऱ्याच दिवसांपासून सुरू होते हे उघड झाले आहे. पोलिसांनी मेहदीला अटक करून त्याची झडती घेतल्यावर त्याच्यापाशी कोणतीही शस्त्रे आढळली नाहीत किंवा स्वत:च्या अटकेचा त्याने विरोधही केला नाही. पोलिसांनी त्याची उलटतपासणी केली असता तो भारताबाहेरही गेला नव्हता तसेच त्याने स्वत: इसिसमध्ये कुणालाही भरती केले नाही हे उघड झाले. पण तो टिष्ट्वटरवरून भारताविरुद्ध जिहाद पुकारण्याचा प्रचार करीत होता. दिवसा तो एका बहुराष्ट्रीय संस्थेत नोकरी करीत होता व रात्री अरबी भाषेतील टिष्ट्वटस्चे इंग्रजीत भाषांतर करून त्याचे पुनर्प्रसारण करीत होता. इंग्रजीतून संभाषण करू शकणाऱ्या दहशतवाद्यांच्या तो संपर्कात होता आणि मुस्लिम तरुणांना इसिससाठी काम करण्यासाठी भडकावीत होता हे त्याने मान्य केले आहे.
मेहदी हा किती गंभीर गोष्टीत गुंतलेला होता याची कल्पना त्याच्या वक्तव्यावरून येते. मेहदी हा माहिती तंत्रज्ञानाचा तज्ज्ञ होता आणि ज्या विदेशी कंपनीत तो काम करीत होता ती कंपनी त्याला वार्षिक ५३ लाख रुपयाचे पॅकेज देत होती. यावरून तो आपल्या कामात किती कुशल असावा याची कल्पना येते. आपले टिष्ट्वटर अकाऊन्ट वापरण्यासाठी त्याने ६० जी.बी.चे कनेक्शन उपयोगात आणले होते. यावरून तो दहशतवाद्यांना किती परिणामकारकपणे मदत करीत होता याची कल्पना येते. आपले खरे स्वरूप उघड होऊ नये याची त्याने पुरेपूर काळजी घेतली होती. पण ब्रिटनच्या चॅनेल फोरची एक महिला पत्रकार या अकाऊन्टच्या माध्यमातून मेहदीच्या संपर्कात आली. तिने त्याच्याशी मैत्री वाढवली. त्याचा विश्वास संपादन केला. त्यामुळे मेहदीने तिला स्वत:ची ओळख तर दिलीच पण स्वत:चा मोबाईल क्रमांकही संपर्कासाठी दिला. त्यामुळे त्याच्या कारवायांची माहिती या महिला पत्रकाराला मिळाली व त्यातूनच त्याला अटक करणे भारतीय पोलिसांना शक्य झाले.
‘शमी विटनेस’ या टोपणनावाने तो हे टिष्ट्वटर अकाऊन्ट ११ वर्षांपासून चालवीत होता, त्यावरून त्याने किती मुस्लिम तरुणांना दहशतवादी कृत्ये करण्यासाठी प्रेरित केले असावे याची कल्पना येते. इसिस किंवा अल् कायदा या संघटनेचे काम करण्यासाठी त्या संघटनात सामील होण्याची गरज नसते. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक युवक स्वतंत्रपणे दहशतवादी कारवाया करीत असतात. मेहदीदेखील इसिसच्या प्रचारयुद्धात महत्त्वाची भूमिका पार पाडीत होता. त्याने स्वत: कोणतेही वाईट कृत्य केलेले नाही वा कुणाला नुकसान पोचवले नाही, असे जे त्याने म्हटले त्यात तथ्य जरूर आहे. पण त्याच्या प्रेरणेने अनेक युवक इसिसमध्ये सामील झाले, हेही मान्य करायला हवे. स्वत: दहशतवादी कृत्ये करण्यापेक्षा इतरांना त्यासाठी प्रेरित करणे हे अधिक धोकादायक असते हे त्याला समजायला हवे होते. आपण स्वत: भारताविरुद्ध युद्ध पुकारले नव्हते तसेच इसिस संघटनेत सामील होण्याची इच्छा नव्हती, हे त्याने कबूल केले आहे. इसिसमध्ये सामील होण्याची संधी मिळाली असती तर आपण त्यात नक्की सामील झालो असतो, पण आपले कुटुंब आपल्या उत्पन्नावर अवलंबून असल्यामुळे आपण तसा विचार केला नाही असे त्याने एका प्रश्नाच्या उत्तरात म्हटले आहे. त्याच्या घरच्यांनाही तो दहशतवादी कृत्यात सहभागी झाला नव्हता, त्यामुळे तो निर्दोष आहे असे वाटते. एकूणच तो पडद्यामागे राहून सूत्रे हलवीत होता आणि इसिसचा प्रचार करण्यात आपण काही चूक केली नाही अशी त्याची धारणा आहे. भारतासाठी महत्त्वाची बाब ही आहे की एखादी व्यक्ती सतत ११ वर्षे जिहादचे समर्थन करीत राहते. इस्लामचा प्रचार करते आणि आपल्या गुप्तचर संघटनांना त्याची माहितीही मिळत नाही, हे गुप्तचर संघटनांचे मोठेच अपयश आहे. गुप्तचर संघटनांनी गाफील राहता कामा नये असा बोध मेहदी प्रकरणाने या संघटनांनी घेतला तरी ते पुरेसे आहे.

Web Title: Failure of detective organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.