निस्पृह, निडर आणि स्वतंत्र माध्यमे हा सशक्त लोकशाहीचा प्राणवायूच!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 12:30 PM2023-06-02T12:30:00+5:302023-06-02T12:30:00+5:30
दि. ३० मे रोजी ‘लोकमत मीडिया’चे अध्यक्ष डॉ. विजय दर्डा यांच्या ‘रिंगसाइड-अप, क्लोज अँड पर्सनल ऑन इंडिया अँड बियॉण्ड’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
दि. ३० मे रोजी नवी दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियामध्ये झालेल्या विशेष समारंभात ‘लोकमत मीडिया’चे अध्यक्ष डॉ. विजय दर्डा यांच्या ‘रिंगसाइड-अप, क्लोज अँड पर्सनल ऑन इंडिया अँड बियॉण्ड’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्याप्रसंगी केलेल्या भाषणाचे संपादित शब्दांकन.
भारतीय राजकारणात संक्षिप्त, सखोल आणि पूर्वग्रहाने प्रभावित न झालेल्या प्रमुख मुद्द्यांना अधोरेखित करणारा आवाज शोधणे हे अतिशय दुर्मीळ आहे. लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व माजी राज्यसभा सदस्य डॉ. विजय दर्डा हे त्यापैकी एक! चौथ्या स्तंभाचे प्रमुख नेते म्हणून डॉ. दर्डा यांच्या प्रभावी कामगिरीची तसेच राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवर अनुभवी संसदपटू म्हणून त्यांनी दिलेल्या योगदानाची मला जाणीव आहे.
डॉ. दर्डा यांचे दिवंगत पिता आणि ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या नेतृत्वाखाली १९७१ साली ‘लोकमत’चा प्रवास सुरू झाला होता. तिथून भारतातील सर्वात मोठ्या प्रादेशिक वृत्तपत्रांपैकी एक असा लौकिक आज ‘लोकमत’ने संपादन केला आहे. निःपक्ष वार्तांकन, अचूक आणि नैतिकतापूर्ण पत्रकारितेची जबाबदारी ‘लोकमत’ने सदैव निभावली. प्रादेशिक, भाषिक वर्तमानपत्रांचा उल्लेख करताना ‘व्हर्नाक्युलर’ असा शब्द वापरला जातो. देशातल्या प्रादेशिक माध्यमांच्या प्रतिष्ठेला बट्टा लावणारी ही संज्ञा आहे. ‘व्हर्नाक्युलर’ या शब्दासाठी गुगलवर अभद्र, सामान्य, साधारण अशा अर्थाचे पर्यायी शब्द उपलब्ध आहेत. देशातील जनतेचे हृदय, मन आणि आत्मा जाणणारी कुणीही विवेकी व्यक्ती हे पर्याय फेटाळूनच लावेल.
समकालीन भारतापुढे असलेली वैशिष्ट्यपूर्ण आव्हाने आणि संधींचे अतिशय वाचनीय आणि माहितीपूर्ण चित्र ‘रिंगसाइड’ या पुस्तकात रंगविण्यात आले आहे. भारतातील माध्यमे आणि राजकीय वर्ग यांच्यातील संबंधांवर भाष्य करणारा लेख विशेष उल्लेखनीय आहे. राजकीय नेत्यांमध्ये टीका सहन करण्याच्या संयमाचा टप्प्याटप्प्याने ऱ्हास होत आहे, असे डॉ. दर्डा म्हणतात. त्यांनी भारतीय राजकारण्यांची तीन वर्गांमध्ये विभागणी केली आहे.
पहिली श्रेणी सर्किट राजकारण्यांची आहे. ते सर्किट हाउसमध्ये कायमस्वरूपी मुक्कामाला असतात. त्यांच्या हातात पुष्पहार असतात. कुणीही नेता आला की त्याचे हार घालून स्वागत करणे, त्याच्या खानपानाचे पाहणे हे त्यांचे प्रमुख काम! कालांतराने ते स्वतःही राजकारणी होतात. दुसरी श्रेणी आहे ती सप्लिमेंटवाली. या श्रेणीतील पक्ष कार्यकर्ते आपल्या नेत्यांसोबत स्वतःची छायाचित्रे प्रसिद्ध करतात आणि स्वतःही नेते बनतात. तिसऱ्या श्रेणीमध्ये खरोखरच जनाधार आणि नेतृत्वगुण असलेल्या नेत्यांचा समावेश होतो. आता सर्किट आणि सप्लिमेंटच्या मार्गांचा अवलंब करून नेते बनलेल्यांकडून सौजन्यपूर्ण आणि परिपक्व वर्तनाची कशी अपेक्षा करणार, असा सवाल डॉ. दर्डा करतात.
भारतातील चौथा स्तंभ एकाचवेळी साक्षीदार, सरकारी वकील, न्यायाधीश आणि शिक्षेची अंमलबजावणी करणाऱ्याची भूमिका बजावत असतो. प्राचीन काळात लोकांची आणि राजकीय नेत्यांची अग्निपरीक्षा व्हायची. आज मीडिया ट्रायल होते. स्वतंत्र माध्यमे ही लोकशाहीची जीवनदायिनी आहे. कारण जबाबदार माध्यमेच देशावर कोणाची सत्ता यावी, याचा योग्य निर्णय घेण्यासाठी नागरिकांना माहिती उपलब्ध करून देतात आणि जे सत्तेत येतील त्यांचे उत्तरदायित्वही निश्चित करतात. सरकारवर सतत टीका करण्यापेक्षा, विरोधकांचा समाचार घेण्याचा सुरक्षित मार्ग पत्करण्यापेक्षा निर्वाचित सरकारची कृतिशीलता किंवा निष्क्रियतेचे मूल्यमापन करण्याचे काम माध्यमांचे असते. मात्र, उथळपणा आणि सनसनाटी निर्माण करण्याच्या नव-माध्यमी वृत्तीमुळे देशातील अनेक महत्त्वाच्या विषयांचे गांभीर्य संपुष्टात येते. परिणामी लोकशाहीत वॉचडॉग असण्याची जबाबदारी निभावण्याच्या माध्यमांची क्षमता आणि शक्यतांवर मर्यादा येतात.
स्वतंत्र आणि सत्शील पत्रकारिता ही भारतीय लोकशाहीसाठी नेहमीच हिताची असेल. सरकार प्रामाणिक आणि कार्यक्षम राहावे, यासाठी मुक्त आणि व्यावसायिक माध्यमांची आवश्यकता आहे. सामाजिक न्याय, आर्थिक सक्षमीकरण, बहुलतावाद आणि सर्वसमावेशकतेच्या मूळ मुद्द्यांवर भारताच्या वर्तमान यशाचा डोलारा उभा आहे, हे विसरता येणार नाही. या देशाची विजययात्रा अशीच अखंड चालू राहायला हवी असेल तर सशक्त लोकशाहीबरोबरच निडर, स्वतंत्र माध्यमेही गरजेचीच आहेत!
डॉ. शशी थरूर,
खासदार आणि ख्यातनाम लेखक