फकिराची वेदना

By admin | Published: January 17, 2017 12:32 AM2017-01-17T00:32:47+5:302017-01-17T00:32:47+5:30

तिची ताटातूट होताना बाप म्हणून या माणसाला होणाऱ्या वेदना आपण समजून घेणार की नाही?

FAKE PAIN | फकिराची वेदना

फकिराची वेदना

Next


तिची ताटातूट होताना बाप म्हणून या माणसाला होणाऱ्या वेदना आपण समजून घेणार की नाही? कुठला बाप आपल्या मुलीला कुंटणखान्यात जाऊ देईल? ‘माझे आता वय झाले, शरीराने थकत चाललो, मी गेल्यानंतर आश्रमातील अनाथ, अपंग मुलांचे काय होईल’, शंकरबाबा सध्या अस्वस्थ असतात. परवा नागपुरातील एका कार्यक्रमात त्यांनी आपल्या मनातील वेदना साऱ्यांसमोर मांडली, तेव्हा ‘छंद’ म्हणून समाजसेवा करणारी सुटाबुटातील माणसेसुद्धा क्षणभर बेचैन झाली. माणुसकीचा गहिवर ज्यांच्या अंत:करणात आहे, त्यांना शंकरबाबा पापळकर हे नाव अपरिचित नाही.
अमरावती जिल्ह्याच्या परतवाडानजीक वझ्झर आश्रमात शंकरबाबा आपल्या अंध, अपंग, अनाथ, मतिमंद मुला-मुलींसोबत राहतात. ही मुले नालीत, रस्त्यावर, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडलेली. त्यांच्या संगोपनाची आणि पुनर्वसनाची तपश्चर्या हा वृद्ध कार्यकर्ता मांडून बसला आहे. ‘आपण गेल्यावर या मुलांचे काय होईल’, हा एकच प्रश्न त्यांना सध्या व्याकुळ करीत असतो. सरकार ऐकत नाही आणि ज्यांच्याजवळ गाऱ्हाणे मांडावे ती माणसे शंकरबाबांच्या आसऱ्याने सामाजिक प्रतिष्ठा मिळविण्यात गर्क. अशा वेळी त्याने करावे तरी काय? मग तो चिडतो, संतापतो. कुणाला शीघ्रकोपी वाटतो, काहींना तुसडा. त्याचे संतापपणे समजून घेण्यासाठी आपण त्याच्या मनाच्या तळाशी नाही पोहोचू शकत! परवा नागपुरातील कार्यक्रमात शंकरबाबा ज्यांच्यापुढे रडले त्या सुशिक्षितांचा उमाळा प्रसंगोत्पात होता. अशा प्रसंगात त्यांचा कंठ दाटून येतो आणि ते निर्मळ होतात. त्यांचे असे भावविवश होणे क्षणभंगूर असते. पुढे या वंचितांच्या वेदनेशी, त्यांच्या अश्रूंशी त्यांचे कुठलेच नाते उरत नाही.
अनाथ, अपंग, मतिमंदांचे केवळ संगोपनच नव्हे तर त्यांचे पुनर्वसन करणे आवश्यक असल्याचे शंकरबाबा सांगतात. १८ वर्षांनंतर या अनाथांना कायद्यानुसार अनाथालयात ठेवता येत नाही. मग यातील मुले वाममार्गाला वळतात. जो कायदा १८ वर्षांखालील मुलांसाठी संवेदनशील असतो तोच त्या मुला-मुलींच्या १८ वर्षांनंतर एका दिवसात एवढा निष्ठूर का होतो? आई-वडिलांनी टाकून दिलेली लक्षावधी मुले या कायद्यामुळे अनाथाश्रमाबाहेर पडतात, ती पुढे कुठे जातात, हा प्रश्न सरकारला अस्वस्थ का करीत नाही? या अनाथांसाठी सरकारने कायद्यात सुधारणा कराव्यात एवढेच शंकरबाबांचे मागणे आहे. अनाथ, अपंगांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळू नये का, ते या देशाचे नागरिक नाहीत का, असे असंख्य प्रश्न शंकरबाबा आपल्या पुढ्यात मांडतात...
आई-वडिलांनी कचरापेटीत टाकून दिलेल्या त्या मुलीचा काय दोष? सज्ञान होईपर्यंत तिला शंकरबाबा नावाचा एखादा महात्मा आई-बापाची माया देऊन मोठी करतो; पण १८ वर्षांची झाल्यानंतर कायद्यानुसार तिला आश्रमात राहता येत नाही. तिची ताटातूट होताना बाप म्हणून या माणसाला होणाऱ्या यातना आपण समजून घेणार की नाही? कुठला बाप आपल्या मुलीला कुंटणखान्यात जाऊ देईल? उद्या आपली मुलगी अशा नरकात जात असेल तर जन्मदाते म्हणून आपण तिला आनंदाने जाऊ देणार का?
आश्रमातील काही मुलींचे शंकरबाबांनी लग्न लावून दिले आहे. त्यांना सासरी धाडताना बाबा खूप रडतो आणि हसतोही. ‘पुढे ती कुठे जाईल’, या प्रश्नाने एरवी धास्तावलेला शंकरबाबा आता निश्चिंत होऊन एकटाच हसत राहतो. त्याच्या रडण्याचा, हसण्याचा आपल्याला अदमासही लागत नाही... आठ वर्षांपूर्वी आश्रमातल्या एका मुलीच्या साक्षगंधाच्या दिवशी बाबांची पत्नी मरण पावली. ही दु:खद वार्ता त्यांना सकाळीच कळली होती. पण, मुलीचे साक्षगंध होईपर्यंत त्यांनी ती कुणालाच सांगितली नाही. अनाथांचा संसार उभा करण्यासाठी या फकिराने स्वत:चा संसार असा स्वत:च्या हाताने मोडून पाडला आहे. त्यामुळे या अनाथांना पोटाशी धरताना नात्यांचे कोवळे बंध कधी आड येत नाहीत. बाबांनी सुरू केलेली ही अशी तपश्चर्या आहे, ती त्यांच्या पश्चात पुढे नाही जाऊ शकत. शंकरबाबा व्याकुळ होण्यामागे हेच कारण आहे. या मुलांच्या पुनर्वसनाचा कायदा सरकारने केला तर त्यांची परवड होणार नाही. मग कुणीही अनाथ गुन्हेगार होणार नाही, अपंग भीक मागणार नाही आणि मुलगी कुंटणखान्यात जाणार नाही. या फकिराची ही वेदना म्हणूनच आपण साऱ्यांनी समजून घ्यायला हवी.
- गजानन जानभोर

Web Title: FAKE PAIN

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.