घवघवीत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 05:19 AM2018-03-31T05:19:10+5:302018-03-31T05:19:10+5:30
राज ठाकरे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला तेव्हा ते उद्धव ठाकरे यांच्यावर मात करतील, असा शिवसेनेतील आणि मीडियातील ‘राजप्रेमीं’चा दांडगा विश्वास होता
राज ठाकरे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला तेव्हा ते उद्धव ठाकरे यांच्यावर मात करतील, असा शिवसेनेतील आणि मीडियातील ‘राजप्रेमीं’चा दांडगा विश्वास होता. करिष्मा, तिखट वक्तृत्व, राजकीय अनुभव अशा काही बाबींमध्ये राज हे उद्धव यांच्यापेक्षा सरस असूनही ‘ससा आणि कासव’ यांच्या शर्यतीप्रमाणे उद्धव यांनी बाजी मारली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्यासारखा बलदंड प्रतिस्पर्धी समोर असतानाही शिवसेनेने लक्षणीय यश प्राप्त केले. उद्धव यांच्याच तालमीत तयार झालेले त्यांचे सुपुत्र आदित्य यांनी मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेच्या (सिनेट) निवडणुकीत सर्वच्या सर्व १० जागा जिंकून युवावर्गात आपले नेतृत्व प्रस्थापित केले. मागील निवडणुकीत शिवसेनेने आठ जागांवर विजय मिळवला होता. भाजपाप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि मनसेप्रणीत मनविसे यांना भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे मित्रपक्ष भाजपाचे नाक कापल्याने आणि काकांना धोबीपछाड दिल्याने आदित्य यांना आनंद झाला नसता तरच नवल. शिक्षण विभाग विनोद तावडे यांच्याकडे असून अभाविपची सदस्य नोंदणी होत नसल्याने दोन वर्षे सतत मागणी होऊनही ही निवडणूक घेण्यात आली नव्हती. मनविसेने तर निवडणूक घेण्याकरिता राजभवनाचा दरवाजा ठोठावला होता. मात्र, युवासेनेचे कार्यकर्ते शिवसैनिकांच्या हातात हात घालून सदस्य नोंदणी करत होते. सर्वाधिक सदस्य नोंदणी युवासेनेने केली होती आणि त्या तपश्चर्येचे फळ त्यांना मिळाले. सत्ता आल्यावर पक्ष कार्यकर्त्यांमध्ये मांद्य व मस्ती येते. तसे ते सध्या भाजपाच्या स्वयंसेवकांत आले आहे. त्यातच महामंडळांपासून अनेक समित्यांच्या नियुक्त्या न झाल्याने प्रचंड नाराजी असल्याने असेल, पण अभाविपला सदस्य नोंदणी करता आली नाही आणि सत्तेतील पक्षाने त्यांना त्याकरिता सहकार्य केले नाही. त्याचा फटका त्यांना मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत बसला. राज्यातील अन्य विद्यापीठांत अभाविपने चांगले यश संपादन केले. मुंबई, ठाणे, कोकण परिसरातील पदवीधर तरुण सोशल मीडियावर ऊठसूट व्यक्त होत असतात. पण सिनेट निवडणुकीत नोंदणी केलेल्या ६२ हजार मतदारांपैकी ६० टक्के पदवीधरांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडले नाही, हे दुर्दैव आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना घसघशीत मते पडली, पण खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना मोजकेच मतदान झाले. गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे सक्रिय झाले असतानाही त्यांच्या मनविसेच्या पदाधिकाऱ्यांनी ही निवडणूक गांभीर्याने न घेणे, याचा अर्थ पक्षातील मरगळ झटकण्यात राज यांना अजून पुरेसे यश आलेले नाही. अर्थात, घवघवीत यशानंतर लागलीच विधानसभेच्या दुप्पट जागा निवडून आणण्याची आदित्य यांनी केलेली घोषणा ही विजयोत्सवातील जोशातून केली आहे, हे दुर्लक्षून चालणार नाही.