आत्मभान जागृत करणारा ‘परिवार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 01:37 AM2017-10-21T01:37:57+5:302017-10-21T01:39:31+5:30
लक्ष्मीपूजनाला मोरवड या दीड हजार लोकसंख्येच्या गावात सातपुड्यातून शेकडो आदिवासी बांधव सहकुटुंब यंदा पुन्हा जमले. संत गुलाम महाराज यांच्या समाधीसमोर हातात लाल ध्वज आणि आरती घेऊन ‘आप की जय’ म्हणत परस्परांची आरती ओवाळली.
- मिलिंद कुलकर्णी
लक्ष्मीपूजनाला मोरवड या दीड हजार लोकसंख्येच्या गावात सातपुड्यातून शेकडो आदिवासी बांधव सहकुटुंब यंदा पुन्हा जमले. संत गुलाम महाराज यांच्या समाधीसमोर हातात लाल ध्वज आणि आरती घेऊन ‘आप की जय’ म्हणत परस्परांची आरती ओवाळली. गेली ८० वर्षे ही प्रथा सुरू आहे. आदिवासी बांधवांमधील आत्मभान जागृत करणा-या या अबोल चळवळीचे कार्य विस्मयकारी असेच आहे.
‘आप की जय’ या परिवाराचे संस्थापक असलेले संत गुलाम महाराज यांचे जीवनकार्य आणि त्यांनी स्थापन केलेला परिवार हा त्यांच्या प्रागतिक व सुधारणावादी विचारांचा अनोखा आविष्कार म्हणायला हवा. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा या तालुक्याच्या शहरापासून अवघ्या ५ कि.मी.वर मोरवड हे गाव आहे. १८९८ ते १९३८ असे अवघे ४० वर्षे आयुर्मान लाभलेले गुलाम महाराज हे निरक्षर होते. सालदारी करणाºया कुटुंबात जन्मलेल्या महाराजांनी स्वत: गुरे राखण्याचे काम केले. पंढरपूरची वारी आणि फैजपूर (जि.जळगाव) येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाला लावलेली हजेरी यातून महाराजांची आध्यात्मिक व राष्टÑीयत्वाची जाण लक्षात येते. आदिवासी बांधवांमध्ये आत्मभान जागृत करण्यासाठी या परिवाराची त्यांनी स्थापना केली. या परिवारातील सदस्यांसाठी आचारसंहिता निश्चित केली. ८० वर्षांपूर्वीचा काळ लक्षात घेता या आचारसंहितेचे महत्त्व लक्षात यावे. रोज आंघोळ करा, शौचास जाताना पाणी वापरा, गंध व कुंकू लावा, दारू पिऊ नका, भांग-गांजा घेऊ नका, मांस खाऊ नका, खरे बोला; लबाडी करू नका, फसवू नका, ‘आप’ची आरती करा, परस्परांची आरती करा ही साधी सोपी शिकवण त्यांनी आदिवासी बांधवांना दिली.
आपण सर्व परमात्म्याचे अंश आहोत, या भावनेतून त्यांनी ‘आप’ या नवीन शब्दाची योजना केली. क्रांतीचा रंग लाल असल्याने या परिवाराच्या ध्वजाचा रंग तोच निश्चित केला. दर सोमवारी मोरवड गावी एकत्र येऊन सामुदायिक आरती समारंभ त्यांनी सुरू केला. आदिवासी बांधव सहकुटुंब एकत्र येतात. सायंकाळी हातात आरती घेऊन गावातून मिरवणूक काढतात. नंतर महाराजांच्या समाधीस्थळी येऊन ‘आप’ तत्त्वास ओवाळतात. ही प्रथा सुरू करीत असताना महाराजांची काही बंधने परिवाराला घातली. स्वत:ला कधीही त्यांनी ओवाळून घेतले नाही. तसेच केवळ तेलवातीच्या आरतीशिवाय कोणतीही सामुग्री या समारंभास आणू नये, असा दंडक घातला.
विशेष म्हणजे या परिवाराची स्थापना झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यात महाराजांचे निधन झाले. गावातील चौकात त्यांची समाधी उभारण्यात आली. त्यांच्या मृत्यूनंतर पत्नी सीतामाता, बंधू रामदास महाराज आणि पुत्र शंकर महाराज यांनी या परिवाराचा विस्तार केला. रामदास महाराज यांचे पुत्र चंद्रसेन महाराज या परिवाराची सध्या धुरा सांभाळत आहेत. ८० वर्षांपूर्वीच्या शिकवणुकीत कुठेही फरक पडलेला नाही. आश्रम नाही, विश्वस्त संस्था नाही, मंदिर नाही, दुकाने नाही. महाराष्टÑ, गुजरात आणि मध्य प्रदेशात या परिवाराच्या कार्याचा विस्तार झाला आहे. वर्षातून चारवेळा सामुदायिक आरती समारंभ होतात. आता वेगवेगळ्या ठिकाणी समारंभ होऊ लागले आहेत. आदिवासी बांधवांमध्ये आत्मभान, जागृती आली आहे. शिक्षण, शेतीसह प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे.