China Drought: दुष्काळ चीनमध्ये; पण चटके अख्ख्या जगाला !
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 06:49 AM2022-08-30T06:49:49+5:302022-08-30T06:50:31+5:30
China Drought 2022: उष्णतेच्या भयावह लाटा आणि कमी पाऊस यामुळे चीन सध्या होरपळतो आहे. ही परिस्थिती अशीच राहिली, तर जगभरातील अनेक देश अडचणीत येतील!
- राही भिडे
(ज्येष्ठ पत्रकार)
जागतिक तापमानवाढीच्या विळख्यात चीन सापडला असून, कडाक्याची उष्णता आणि कमी पाऊस यामुळे तेथे दुष्काळाचे इशारे सातत्याने दिले जात आहेत. जागतिक स्तरावर अत्यंत आक्रमक असलेल्या चीनला आता दुष्काळामुळे संकटाला तोंड द्यावे लागते आहे. जगाचा पुरवठादार असलेल्या चीनमधील दुष्काळामुळे जगातील अन्य देश महागाईत ढकलले जाण्याची शक्यता आहे.
चीनवर जगातील बहुतांश देश या ना-त्या कारणाने अवलंबून आहेत. गहू आणि तांदूळ उत्पादनात चीन हा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश आहे. त्याचबरोबर मका उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. चीनमधील उत्पादन कमी झाले, तर अनेक लहान आणि गरीब देशांवरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. अमेरिकेच्या कृषी विभागाने २०२० - २१ साठीचा चीनच्या भुईमूग उत्पादनाचा अंदाज १७.७ दशलक्ष मेट्रिक टन वर्तविला आहे. मात्र, दुष्काळामुळे पेरणी व काढणीवर विपरीत परिणाम होणार आहे. त्याचे परिणाम भारतालाही भोगावे लागतील. इथली महागाई अधिक वाढण्याची शक्यता आहे. येत्या हंगामात गुजरात आणि भारतात खाद्यतेल आणि विशेषतः शेंगदाणा तेलाच्या किमती वाढतील.
चीनमध्ये ६१ वर्षांतील सर्वात भीषण उष्मा आणि दुष्काळामुळे विजेचे संकट निर्माण झाले आहे. अनेक शहरे अंधारात बुडाली आहेत. उष्णतेसोबतच पावसाअभावी चीनच्या अडचणीत भर पडली आहे. जुलैमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत ४० टक्के कमी पाऊस पडला आहे. चीनच्या सिचुआन, हुबेई, हुनान, जिआंग्शी, अनहुई आणि चोंगकिंग प्रांतातील २.४६ दशलक्ष लोक आणि २.२ दशलक्ष हेक्टर शेतजमीन दुष्काळाने प्रभावित झाली आहे. दुष्काळामुळे ७.८० लाखांहून अधिक लोकांना सरकारकडून थेट मदतीची गरज आहे. यांगत्झी नदी चीनमधील ४०० दशलक्ष लोकांना पिण्याचे पाणी पुरवते. परंतु तिच्या पाण्याचा प्रवाह गेल्या पाच वर्षांच्या सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. दुष्काळ आणि उष्णतेमुळे चीनच्या मध्यवर्ती आणि यांगत्से नदीच्या खोऱ्यातील भात आणि मक्याचे उत्पादन प्रभावित होईल. पोयांग हे सरोवर चीनमधील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. त्यात अवघे २५ टक्के पाणी आहे. स्थानिक भागात पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची समस्या निर्माण झाली आहे. भाज्यांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत.
चीनमधील वीज संकटामुळे अनेक मोठे कारखाने बंद झाले आहेत. चीन आपल्या गरजेच्या १५ टक्के वीज पाण्यापासून - म्हणजेच जलविद्युत - निर्माण करतो. कमी पावसामुळे त्याच्या जलविद्युत क्षमतेवरही विपरीत परिणाम झाला आहे. ८४ दशलक्ष लोकसंख्या असलेल्या सिचुआन प्रांताने २०२१मध्ये ८० टक्के विजेची गरज जलविद्युतमधून भागविली होती. यावर्षी ऑगस्टमध्ये, सिचुआन प्रांतात जलविद्युतसाठी आवश्यक असलेल्या पाण्याची उपलब्धता ५० टक्के कमी झाली आहे, तर कडक उन्हाळ्यामुळे विजेची मागणी २५ टक्के वाढली आहे. वाढत्या उष्णतेमुळे चीनमध्ये एसीच्या मागणीत मोठी वाढ झाली असून, त्यामुळे पॉवर ग्रीडवर अतिरिक्त भार टाकला जात आहे. फोक्सवॅगन आणि ॲपलसारख्या कंपन्यांनी काम बंद केले आहे.
चीनमधील अनेक शहरांतील कारखान्यांना आठवडाभर काम थांबवण्याचे किंवा उत्पादन कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर्मन कार कंपनी फोक्सवॅगनने म्हटले आहे की, सिचुआनची राजधानी चेंगडू येथील कारखाना वीज खंडित झाल्यामुळे बंद आहे. ॲपलचा पुरवठादार फॉक्सकॉनने सिचुआनमधील आपला प्लांटही सध्या बंद केला आहे. टोयोटाच्या प्लांटमधील कामही बंद आहे. सिचुआन आणि चेंगकिंगमध्ये, इलेक्ट्रिक वाहनांच्या मालकांनी रिचार्जिंग स्टेशन बंद झाल्याबद्दल तक्रार केली आहे. यामुळे चीनवर अवलंबून असलेल्या देशांनाही मोठी किंमत मोजावी लागते आहे. भारत हा मोठा आयातदार देश आहे. चीनमधील दुष्काळाचा अन्य देशांसह भारतावरही परिणाम संभवतो.