या सत्तेला सत्य चालत नाही, 'भक्त' लागतात!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 01:51 AM2019-02-12T01:51:20+5:302019-02-12T14:53:23+5:30

‘माझे जीवन हाच माझा संदेश आहे’ असे ते म्हणाले. ही लढाई एकट्याची असो वा समाजाची त्यात सहभागी होणे आणि देशाने परिश्रमाने मिळविलेले स्वातंत्र्य कायम राखणे, ही आपली जबाबदारी आहे. ती आपण शिरावर घ्यायची की नाही, हा आपला प्रश्न आहे.

Famous actor Amol Palekar's Satyavadan | या सत्तेला सत्य चालत नाही, 'भक्त' लागतात!

या सत्तेला सत्य चालत नाही, 'भक्त' लागतात!

नयनतारा सहगल या जागतिक कीर्तीच्या पत्रकार महिलेला भाषणाचे निमंत्रण देऊन नंतर ‘तुम्ही येऊ नका’ हे सांगण्याचा हुच्चपणा यवतमाळ येथे भरलेल्या साहित्य संमेलनात अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या अर्धवट विद्वानांनी केल्यानंतर मुंबईच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये प्रसिद्ध अभिनेते, चित्रकार व साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक अमोल पालेकर यांना भाषणासाठी बोलावून तेथील बहुगुणी संचालकांनी त्यांचे भाषण अर्ध्यावर बंद करायला भाग पाडणे ही एक असभ्य, असांस्कृतिक पण नवीन परंपरा आहे. सत्तेला सत्य चालत नाही, तिला नेहमी सोय हवी असते, हे वास्तव आपल्याकडील अनेकांना अजून समजायचे आहे. दिल्लीत संघाचे राज्य आल्यापासून ती सुरू झाली आहे. या परंपरेत अमर्त्य सेन बसत नाहीत, मनमोहन सिंग तिला चालत नाहीत, रघुराम राजन आणि ऊर्जित पटेल तिला नको असतात. तिला अनुपम खेर, स्मृती इराणी आणि संबित पात्रा अशी मोदीभक्तांची मालिका चालत असते.

सरकारच्या चुकीच्या धोरणांवरही टीका करू नका, ती कशीही असली तरी तिची तारीफ करा. नपेक्षा तिच्याकडे दुर्लक्ष करा, असा या नवआयोजकांचा आदेश आहे. त्यांना संशोधक, समीक्षक, अभ्यासक व ज्ञानी माणसे नकोत. तिला संघाच्या तालमीत तयार झालेली, शक्यतो त्यांचा तृतीय शिक्षा वर्ग पास केलेली संपृक्त वृत्तीची आणि मागास मनोवृत्तीची माणसे हवी असतात. नवी संशोधने नकोत, त्यापेक्षा रामाचे विमान शोधायचे, कृष्णाचे चक्र आणि अर्जुनाचे गांडीव पाहायचे यात त्यांना अधिक रस आहे. मग त्यांना नयनतारा सहगल चालत नाहीत, पालेकर ओळखता येत नाहीत आणि अमर्त्य सेनही नको असतात. देशाचे ज्ञान व विज्ञान आधुनिकतेच्या व सांस्कृतिक वैविध्याच्या दिशेने होणारी वाटचाल थांबवून त्याला १६-१७ व्या शतकाच्या व इ.स. पूर्वीच्या वातावरणात न्यायची शिकस्त करणारी ही माणसे आहेत. मग यांना पालेकर लागतात कशाला? ते विनोद तावडे आहेत ना? हो शिक्षणमंत्री आहेत आणि प्रियंका गांधींमध्ये शूर्पणखा पाहण्याचा डोळा त्यांना लाभला आहे. जे इतरांना दिसत नाही ते त्यांना दिसते याला काय म्हणावे? या माणसाने सगळ्या सुशिक्षित महाराष्ट्रालाच त्याची मान खाली घालायला लावली आहे. पण त्यांच्या मागेही एक परंपरा आहे. ‘अलेक्झांडरचा पराभव बिहारी लोकांनी केला’ असे म्हणणारे पंतप्रधान असोत वा नेहरू कधी भगतसिंगांना वा चंद्रशेखर आझादांना भेटलेच नाहीत, असे म्हणणारे मोदी अशी ती लांबच लांब परंपरा आहे. या परंपरेचेच देशावर राज्य आहे. या राज्यात स्मृती इराणी या अमर्त्य सेन यांच्याहून वरिष्ठ आहेत आणि अरुण शौरींच्या शब्दात ज्याला तीन ओळीही लिहिता येत नाहीत असा इसम डॉ. राधाकृष्णन यांच्या जागेवर विराजमान आहे. त्यांच्यावर खटले लादायचे आणि तरीही आवरत नसेल तर त्यांचे खून पाडायचे. हे धोरण विद्वानांनाही विचार करायला लावणारे आहे. अशी निमंत्रणे घ्यायची की नाही? आपण भाषण स्वातंत्र्य मागून घ्यायचे की नाही, हे त्यांनाही ठरवावे लागेल. जवाहरलाल नेहरू एकदा श्रीप्रकाशांना म्हणाले, श्रीप्रकाश, आपल्यापुढे मोठी आव्हाने आहेत. त्यांना सामोरे जायचे दोन मार्ग आपल्यापुढे उपलब्ध आहेत. एक त्यांना शरण जाण्याचा व दुसरा त्यांच्याशी लढून त्यावर मात करण्याचा. श्रीप्रकाशांना या प्रश्नाचे नेहरूंचे उत्तर ठाऊक होते. नेहरू शरण जाणारे नव्हते आणि त्यांनी सगळ्या अडचणींवर मातही केली. आताचे संकट सर्वंकष आहे आणि ते सांस्कृतिक आहे. या क्षेत्रातील किती जण पुढे येतात हे देशाला पाहायचे आहे. कारण देश पुढे त्याच्या मार्गाने जाणारा आहे.

राजकारण काही काळ फसवे असू शकते. संस्कृतीच्या मागे श्वाश्वत आहे, त्या मार्गाने जाणे समाजाला हवे आहे. म्हणून प्रश्न आहे तो पालेकरांसोबत राहायचा की बहुलकरांसोबत जायचा? नयनताराचे अभिनंदन करायचे की, महामंडळाच्या अर्धवटपणाचे कौतुक करायचे? देश अशा आपत्तीत असताना आपण काय करायचे ते गांधींनी सांगितले आहे. ‘माझे जीवन हाच माझा संदेश आहे’ असे ते म्हणाले. ही लढाई एकट्याची असो वा समाजाची त्यात सहभागी होणे आणि देशाने परिश्रमाने मिळविलेले स्वातंत्र्य कायम राखणे, ही आपली जबाबदारी आहे. ती आपण शिरावर घ्यायची की नाही, हा आपला प्रश्न आहे.

Web Title: Famous actor Amol Palekar's Satyavadan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.