शेतकरी आंदोलन यशस्वी झाले, कारण ते ‘घरी’ गेले!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 08:20 AM2021-12-24T08:20:28+5:302021-12-24T08:21:24+5:30

आंदोलक शेतकऱ्यांची लढाई चार पिढ्यांची होती. शेतातूनच आंदोलनात सहभागी होते, त्या शेतकऱ्यांचे मुलगे, बाप, चुलते आणि आजेही प्रत्यक्ष आंदोलनात होते!

farmers protest was successful because they went door to door in country | शेतकरी आंदोलन यशस्वी झाले, कारण ते ‘घरी’ गेले!

शेतकरी आंदोलन यशस्वी झाले, कारण ते ‘घरी’ गेले!

Next

प्रशांत गावंडे

२०२० च्या उत्तरार्धात सुरू झालेल्या शेतकरी आंदोलनाने  २०२१ हे संपूर्ण वर्ष व्यापून टाकले. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात लोकलज्जेसाठी सरकारने चर्चेचे सोंग केले व चर्चेच्या दोन अंकी फेऱ्या कर्मकांडासारख्या पूर्ण केल्या. चर्चेदरम्यान शेतकरी आंदोलनाच्या प्रतिनिधींनी सरकारचे अन्न- पाणी व चहास नकार देऊन सरकारला एक प्रकारे आपल्या वज्र निर्धाराची झलक  दाखविली. ‘कानून वापसी नहीं तो घर वापसी नहीं’ या  हेतूनेच शेतकरी वर्गप्रतिनिधी चर्चेत सहभागी व सामील होत होते. सरकारचे समर्थक आंदोलनास बदनाम करण्याकरिता शर्थीचे प्रयत्न करीत होते. 

आंदोलक मात्र अत्यंत धैर्याने व संयमाने आपली पातळी व तोल ढळू न देता आंदोलन पुढे नेत होते. आंदोलन राजकीय असले तरीही आंदोलनात राजकारणाचा शिरकाव न होऊ देता ठामपणे आपली भूमिका स्पष्टपणे सर्वांसमोर मांडत होते. ट्रॅक्टरपासून सुरू झालेले आंदोलन ट्विटरवर नेल्याशिवाय गत्यंतर नाही याची जाणीव शेतकऱ्यांचा जागर करणाऱ्यांना होती. नेहमीप्रमाणे सरकारी व्यवस्थेने आंदोलनात फूट पाडण्याचे आतोनात प्रयत्न केले व सरकारी यंत्रणा त्यात यशस्वी होताना दिसत असतानाच आंदोलनाने पुन्हा एकदा प्रचंड उसळी घेतली. राकेश टिकैत यांच्या डोळ्यातील अश्रुधारांनी पुन्हा एकदा सिद्ध केले की, भारताच्या ग्रामीण भागात अजूनही अश्रूंची फुले करण्याची किमया जिवंत आहे. जाट, शीख, पश्चिमी उत्तर प्रदेश, पंजाब, हरयाणा यांच्या सीमा ओलांडून शेतकरी आंदोलनाने देशाच्या कानाकोपऱ्यातील सामान्य शेतकऱ्यांच्या घरात प्रवेश केला. सरकारच्या हेतूबद्दल मनामनांत प्रश्नचिन्हे निर्माण होत गेली. 

आंदोलनाकडे दुर्लक्ष करून व आंदोलकांना थकवून  आंदोलनाची धार कमी करणे व शेवटच्या टप्प्यात क्षीण झालेले आंदोलन बळाचा वापर करून मोडून काढणे याच धोरणांचा अवलंब करून सरकारला विजय साजरा करायचा होता; परंतु सामान्य माणसाच्या सहानुभूतीची ऊब आंदोलन अधिकाधिक तीव्र करीत होती. 

जगभरातून फक्त समर्थनच मिळाले नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर दबावसुद्धा निर्माण झाला.  वेगवेगळ्या सीमांवर ७०० पेक्षा अधिक शेतकरी शहीद झाले; परंतु आंदोलकांची हिंमत वाढत होती. दिवसागणिक सरकारच्या पायाखालची वाळू घसरू लागली व सरकारचा चिरेबंदी वाडा खिळखिळा होताना दिसत होता. 

लखीमपूर खिरी येथे जे घडले त्यामुळे आंदोलनास निर्णायक वळण मिळाले. देशभरातून आंदोलनास सहानुभूती मिळाली व सरकारच्या इच्छाशक्तीवर व सद्हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.  आंदोलक शेतकऱ्यांसंदर्भात सहानुभूतीची जागा विश्वासाने घेतली. सरकारच्या मुजोरशाहीमुळे आंदोलन घराघरांत, मनामनांत, गावागावांत पोहोचले.

स्वातंत्र्यानंतरचे सर्वसामान्यांच्या नेतृत्वात व सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी झालेले एकमेव आंदोलन हे या आंदोलनाचे वैशिष्ट्य आहे. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे  जगभरात विखुरलेल्या भारतीय वंशाच्या लोकांचा पाठिंबा आणि सात वर्षांच्या अंगदसिंगपासून ८१ वर्षांच्या मोहिंदरकौरपर्यंतच्या चारही पिढ्यांचा सहभाग. या वेळची लढाई चार पिढ्यांची होती याचा सरकारला विसर पडला. एका पिढीच्या लढ्यात इतर पिढ्या म्हणजे आधीची व नंतरची सोबत असतीलच असे नसते. शेतकरी आंदोलनात वेगळे चित्र दिसले. शेतातला शेतकरी शेतातूनच आंदोलनात सहभागी होता, तर प्रत्यक्ष आंदोलनात त्याचाच बाप, चुलता, आजा होता आणि आभासी दुनियेत सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातील समतावादी तरुणाई सर्व भाषांमध्ये अविरत संघर्ष करीत होती.

अंगदसिंगसारखे अगदी लहानगे आपल्या आज्याला सीमेवर भेटायला येऊन आंदोलनकर्त्यांची सकारात्मक ऊर्जा वाढवीत होते. शेतकऱ्यांनी शांतपणे पण आपल्याच आवेशात आंदोलन घराघरांत पोहोचविले. घरी जाणारे आंदोलन हाताळणे व संपविणे अत्यंत कठीण किंवा अशक्यप्राय असते. जगभरातील घरांत गेलेले आंदोलन तेथील व्यवस्थेस कधीच संपविता आले नाही. दक्षिण आफ्रिकेतील रंगभेदाविरुद्धचे आंदोलन, क्युबाच्या तरुणाईचे १९६० च्या दशकातील भांडवलशाही अमेरिकन व्यवस्थेविरुद्धचा उठवलेला आवाज, पूर्व - पश्चिम जर्मनीच्या नागरिकांची एकत्रीकरणासाठी दिलेली आर्त हाक, साम्राज्यवादाविरुद्ध व्हिएतनामी लोकांचा संघर्ष व विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील मिठाचा सत्याग्रह (गांधींची दांडी यात्रा) ही सर्व आंदोलने अति सामान्य माणसाच्या मनात जागा करून गेली व त्यामुळेच तेथील बलाढ्य व्यवस्थेस काहीच करता आले नाही. 

स्वतंत्र भारतातील पहिले घरी गेलेले आंदोलन म्हणजे शेतकरी विरोधी  काळ्या कायद्यांच्या विरोधातील आंदोलन. जे आंदोलन घरातील प्रत्येक सदस्यासोबत वेगवेगळे संबंध प्रस्थापित करीत असते तेच व्यवस्थेस प्रभावहीन करू शकते. आंदोलक घरी जाण्यापूर्वीच आंदोलन घरात स्थिर झाले होते व हेच शेतकरी आंदोलनाचे यश आहे. 
 

Web Title: farmers protest was successful because they went door to door in country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.