दूरदृष्टी असलेले प्रभावी भाषण

By admin | Published: September 29, 2014 06:23 AM2014-09-29T06:23:01+5:302014-09-29T06:23:01+5:30

काही लोक सोडले, तर देशातील आणि बाहेरचे भारतवंशी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाने रोमांचित झाले असतील

Farsighted effective speech | दूरदृष्टी असलेले प्रभावी भाषण

दूरदृष्टी असलेले प्रभावी भाषण

Next

काही लोक सोडले, तर देशातील आणि बाहेरचे भारतवंशी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाने रोमांचित झाले असतील. वैचारिक मतभेद आपल्या जागी आहेत आणि असले पाहिजेत. पण, जागतिक व्यासपीठावर आमच्या पंतप्रधानाने मांडलेल्या गोष्टी अस्सल आमच्या भारताच्या आहेत. अलीकडल्या काळात जागतिक मंचावर आमच्या एखाद्या नेत्याने भारताची महान संस्कृती, विचारमूल्ये एकाच दणक्यात जगापुढे ठेवली, असे फारसे घडले नाही. पण, जगाला आज ज्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे, त्याबाबत आमच्या संस्कृतीने विचार केला होता, हे मोदींनी जगापुढे ठेवले. एका ओळीत सांगायचे, तर प्रत्येक अंगाने हे भाषण एक असामान्य, ऐतिहासिक आणि स्वप्नदर्शक होते. आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास करणाऱ्यांनाही कल्पना, विचार, व्यवहार, सूचना आणि भविष्याची दिशा देणारे असले भाषण बहुधा पहिल्यांदाच ऐकायला मिळाले असावे. मोदींकडून देशवासीयांना असलेल्या अपेक्षांची पूर्तता तर त्यांंनी केलीच; पण ते त्याही पुढे निघून गेले. हिंदीतील आपल्या भाषणात मोदी म्हणाले, ‘‘ प्रत्येक राष्ट्र की एक फिलॉसॉफी यानी दर्शन होता है, देश इस फिलॉसॉफी की प्रेरणा से आगे बढता है...’’ प्रतिस्पर्ध्याशीही आम्ही संवाद साधू इच्छितो, कारण हा आमच्या जीवनाचा एक हिस्सा आहे. साऱ्या जगाला आम्ही ‘वसुधैव कुटुंबकम्’ म्हणजे एका कुटुंबाच्या रूपात पाहतो. भारत केवळ स्वत:साठी नव्हे, तर सर्वांच्या न्याय, प्रतिष्ठा आणि हक्कासाठी आवाज उठवत आला आहे, असे मोदींनी ठासून सांगितले. कित्येक वर्षांनंतर कुणी भारताची एवढी नेमकी व्याख्या जगापुढे मांडली.
खोलात जाऊन विचार कराल, तर भारताची हीच भूमिका महात्मा गांधी, महर्षी अरविंद, स्वामी विवेकानंद, सुभाषचंद्र बोस, राजेंद्र प्रसाद... आदींनी या अगोदर मांडली. या सर्वांनी हेच सांगितले, की इतरांवर सत्ता गाजवण्यासाठी भारताला शक्तिशाली बनायचे नाही. जगाला मार्ग दाखवायचा आहे. हा भारताचा मूळ विचार स्वातंत्र्यानंतर प्रथमच कुणी व्यवस्थित मांडला. हा आमच्या अभिमानाचा विषय झाला पाहिजे. दुर्दैवाने भारत तो संस्कार आणि ते टार्गेट विसरला आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भाषणानंतर मोदींचे भाषण झाले. शरीफ यांना मोदी काय उत्तर देतात, हा उत्सुकतेचा विषय होता. मोदी हे शरीफ यांच्यामागे फरफटत गेले नाहीत. भारताची विचार करण्याची दिशा व्यापक आहे, हे दाखवून देताना मोदींनी पाकिस्तानची सारी रणनीतीच उधळून लावली. काश्मीरचा विषय संयुक्त राष्ट्रसंघात आणून सुटू शकत नाही. दोन देशांनी आपसात बसूनच तो सोडवावा लागेल आणि दहशतवादाच्या सावटाशिवाय ही बोलणी करावी लागतील. हे वातावरण निर्माण करण्यासाठी पाकिस्तानने पुढे यावे; पण आज आवश्यकता आहे, ती काश्मिरातील पूरग्रस्तांना मदतीची, असे सांगून मोदींनी पाकिस्तानलाही पूरग्रस्तांना मदतीच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. पाकिस्तानला यापेक्षा चांगले उत्तर कुठले असू शकते?
जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत कशा पद्धतीने विचार करतो, ते मोदींनी सोप्या शब्दांत उलगडून सांगितले. ‘संयुक्त राष्ट्रसंघ कुठे निघाला होता आणि आज कुठे पोहोचला?’, ‘जी-८, जी-२० असल्या संकल्पना टाकून जी-आॅल म्हणजे जगातल्या साऱ्या देशांचा समूह, असा विचार का होऊ नये?’ हे प्रश्न मोदींनी समोर आणले, तेव्हा जगातल्या महाशक्तीही हैराण झाल्या असतील, की आज आम्ही कुठल्या भारताचे भाषण ऐकत आहोत! आज लगेच नाही, पण भविष्यामध्ये भारताच्या या बोलण्याचा नक्कीच फायदा होईल. नेपाळ, भूतानच्या आम्ही केलेल्या प्रशंसेचा नक्कीच भारताला लाभ होऊ शकतो. आमच्याशिवाय या दोन देशांचे नाव कोण घेतं? पश्चिम आशियातील ताणतणाव, टुनिशियापासून आफ्रिकेपर्यंतच्या देशांच्या प्रगतीचा विषय इतर कुणी काढला नाही. भारताने काढला. जगातील सर्व विषय त्यांनी मांडले आणि त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा मंत्रही दिला. जगापुढील धोकेही त्यांनी लक्षात आणून दिले. दहशतवादाचा विषय आधीही चर्चिला जायचा; पण मोदींचे या प्रश्नावरचे विश्लेषण आणि उपाय एकदम वेगळे होते. दहशतवाद खणून काढण्याची कुणाला मनापासून इच्छा नाही. अनेक देश दहशतवाद्यांना मदत करीत आहेत, याकडे मोदींनी लक्ष वेधले. एक प्रकारे त्यांनी अमेरिका आणि पाकिस्तानला पिंजऱ्यात उभे केले.
संयुक्त राष्ट्रसंघाला पुढील वर्षी ७० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने या संस्थेने आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला मोदींनी दिला. मोदी म्हणाले, ‘आम्ही कुठून निघालो, का निघालो, काय कारण होते? रस्ता कुठला होता, कुठे पोहोचलो, कुठे पोहचायचे आहे... आज आम्ही परस्परावलंबी जगाची कल्पना करतो. पण, बाहेर निघताच संकुचित हिताच्या गोष्टीत अडकून जातो. बदलत्या काळानुरूप संयुक्त राष्ट्रसंघालाही बदलावे लागेल.’ त्यासाठीचा मार्गही त्यांनी सांगितला. कोणताही विषय मोदींनी सोडला नाही. अगदी योगासारखा विषयही ते बोलले. जगाच्या आरोग्यासाठी एक आंतरराष्ट्रीय योग दिवस पाळावा, असे आवाहन त्यांनी केले. जगाला दिशा आणि परस्पर सहकार्यातून विकास आणि त्यासाठी पुढे येण्याची मोदींनी दाखवलेली तयारी इतिहासाचे चक्र नव्या दिशेने फिरवणारी ठरू शकते. जगातील अनेक देशांचा आवाज बनून भारत पुढे येऊ शकतो आणि मोदी त्यांचे नेते असतील.

Web Title: Farsighted effective speech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.