रासायनिक खतांचे घातक परिणाम
By Admin | Published: November 20, 2014 12:07 AM2014-11-20T00:07:32+5:302014-11-20T00:07:32+5:30
भारतामध्ये शाकाहार हा सर्वोत्तम आहार असे मानले जाते. शाकाहार आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे.
लक्ष्मण वाघ
(सामाजिक विषयांचे अभ्यासक)
भारतामध्ये शाकाहार हा सर्वोत्तम आहार असे मानले जाते. शाकाहार आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. शाकाहारातून मानवी शरीराला प्रोटिन, व्हिटॅमिन, कार्बोहायड्रेट, मिनरल्स, फायबर, कर्बोदके ही जीवनसत्त्वे मिळतात. शाकाहार हा पर्यावरणस्नेही असतो. उच्च मानवी मूल्यांच्या संवर्धनासाठी शाकाहारास प्राधान्य द्यावे, असे आपल्या पूर्वजांनी म्हटले आहे. शाकाहारी भोजन केल्यानंतर मनाला तृप्ती व शांती मिळते आणि बुद्धीची वृद्धी होते. शाकाहार सेवन केल्यामुळे मानवाची प्रकृती उत्तम राहते. त्यामुळे अनेक आजारांना प्रतिबंध करता येतो. ताज्या भाज्या, फळे आणि दूध हा आहार तुलनेने स्वस्त असतो आणि पचायला सुलभ असतो, म्हणून शाकाहारीच असावे, असा पारंपरिक समज सर्वत्र आहे. तथापि हा विविध गुणधर्मांनी समृद्ध, संपन्न असलेला शाकाहारी आहार रासायनिक खतांच्या वापरामुळे अपायकारक झाला आहे, असे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एनएबीएलच्या (नॅशनल अॅक्रिडेशन बोर्ड आॅफ टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबरोटरीज) अहवालामध्ये नमूद केले आहे.
गेल्या काही वर्षांपासून कृषी उत्पादनामध्ये अधिक वृद्धी व्हावी. यासाठी कृत्रिम रासायनिक खतांचा वापर अधिकाधिक होत आहे, असे आढळून आले आहे. पुण्यातील व इतर काही शहरांतील विविध भागांतील विक्रेत्यांकडील भाजीचे नमुने तपासण्यात आले. त्यांपैकी कारली, वांगी, सिमला मिरची, कोबी, फ्लॉवर, काकडी, टोमॅटो यांमध्ये मोठ्या प्रमाणात कीटकनाशके सापडली. पोटाचे विकार, हार्मोनमधील बदल, मेंदूची कार्यक्षमता कमी होणे, लीव्हर-किडनीच्या कार्यामध्ये व्यत्त्यय येणे, जनुकांमधल्या बदलामुळे कॅन्सरचा प्रादुर्भाव होणे, असे अनेक घातक परिणामही भाज्यांमधील व अन्नधान्यांमधील कीटकनाशके मानवी शरीरावर करू शकतात. आपण जे शाकाहारी अन्न सेवन करतो, त्यातून किती घातक रसायने आपल्या पोटात जातात याची कल्पनाही आपल्याला नसते.
हॉटेल असो वा घर, आपण सेवन करीत असलेले शाकाहारी अन्न संपूर्ण शुद्ध असल्याचा विश्वास कुणीच देऊ शकत नाही. केळी हे सर्वत्र सदाकाळ उपलब्ध असणारे फळ आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी ते सकस फळ आहे. शेतकरी केळीचे घड कच्चेच कापून ते कार्बाईडच्या पाण्यात टाकतात. आठ-दहा तासांत पूर्ण कच्च्या केळीची साल पिवळी होऊन ती पिकल्याचा आभास निर्माण होतो. तथापि ती आतमध्ये कच्चीच असतात. ग्राहक ती केळी पिकलेली आहेत, असे समजून विकत घेतात आणि ती सेवन करतात. प्रस्तुत केळीवर कार्बाईडची रासायनिक प्रक्रिया होऊन कॅन्सर कारणाचा (कारसिनोजेनिक) प्रादुर्भाव निर्माण होतो.
सफरचंद आपल्या आहारातील एक सकस असे फळ आहे. हे सफरचंद लालबुंद, आकर्षक, चकचकीत दिसावे, म्हणून व्यापारी सफरचंदाला खाण्यास अयोग्य असलेले लाल रंगाचे मेण लावतात. मोसंबी, संत्री वगैरे फळांना अखाद्य पिवळ्या रंगाचे मेण लावतात. अशा कृत्रिम व रंग लावलेल्या मेणामुळे ही फळे खाल्ल्याने मळमळणे, थकवा, जडत्व, अस्वस्थ वाटणे असे प्रकार संभवतात.
गार्इंनी व म्हशींनी जास्त दूध द्यावे, यासाठी आॅक्सिटॉनिक नावाचे औषध त्यांना दिले जाते. या औषधाला शासनाची बंदी असूनही त्याचा सर्रास वापर होत आहे. हे औषध त्या प्राण्यांसाठी नव्हे, तर दूध सेवन करणाऱ्या मानवासाठी अपायकारक आहे, असा निष्कर्ष पेरा या संस्थेने सर्वेक्षणातून व्यक्त केला आहे. दुधामध्ये साखर, युरिया, कॉस्टिक सोडा, चुना धुण्याच्या साबणाची पावडर, स्टार्च, पांढऱ्या रंगाची अनेक रासायनिक द्रव्ये मिसळली जातात. भाज्या, फळे आणि दुधाची व्याख्या र’ङ्म६ ढङ्म२्रङ्मल्ल म्हणून केल्यास अतिशयोक्ती वाटू नये. जनतेला स्वच्छ सकस भेसळमुक्त अन्न उपलब्ध करून देण्याबाबत शासन निष्क्रिय व उदासीन आहे.
भाज्या आणि फळांमध्ये कीटकनाशके सापडली, म्हणून अस्वस्थ होऊ नये, तर भाज्या, फळे चांगली धुऊन, स्वच्छ करून सेवन करणे हा पर्याय आहे. भाज्या आणि फळे कीटकनाशकमुक्त स्वच्छ शुद्ध स्वरूपात उपलब्ध होणे, हा प्रत्येक भारतीयाचा हक्क आहे आणि त्यासाठी सर्वांनी आग्रही असणे अनिवार्य आहे.
यासाठी अन्न व औषध प्रशासनाने अधिक सक्रिय होणे गरजेचे आहे. प्रशासनाने फळांच्या व भाज्यांच्या ठोक बाजारातून काही नमुने जागच्याजागी तपासण्याची व्यवस्था केल्यास अपायकारक फळे व भाज्या ग्राहकापर्यंत पोहोचण्यापासून रोखता येतील. विशेषत: केळी जागोजाग उपलब्ध असतात, शिवाय ते सर्वांत स्वस्त आणि सर्वांना आवडणारे फळ आहे. पण तेच नेमके मोठ्या प्रमाणात रासायनिक प्रक्रियेमुळे अपायकारक बनत आहे. देशात अनेक ठिकाणी आता आॅरगॅनिक शेती मूळ धरू लागली आहे. पण आॅरगॅनिक शेतीतून तयार होणारा माल रासायनिक शेतीतून तयार होणाऱ्या मालापेक्षा महाग असतो. त्यामुळे सरकारने आॅरगॅनिक शेतीतील मालाला करसवलत देणे व रासायनिक शेतीच्या मालावर अधिक कर लादणे, असे उपाय केल्यास रासायनिक खतांचा अतिवापर कमी होईल आणि लोकांना आरोग्यदायी आहार मिळू शकेल.