घण आघात आणि किणकिणाट!
By admin | Published: January 6, 2017 11:30 PM2017-01-06T23:30:26+5:302017-01-06T23:30:26+5:30
ते योग्य की अयोग्य, रास्त की अरास्त, व्यवहार्य की अव्यहार्य यावर निश्चितच वाद होऊ शकतो.
ते योग्य की अयोग्य, रास्त की अरास्त, व्यवहार्य की अव्यवहार्य यावर निश्चितच वाद होऊ शकतो. पण एक बरीक खरं की मराठी मानसाला स्वीकारण्यापेक्षा नाकारण्याचे, पदरात पाडून घेण्यापेक्षा पदर झटकून टाकण्याचे आणि होकारण्याऐवजी झिडकारण्याचे मोठे कौतुक आणि अप्रूप वाटत असते. म्हणूनच की काय, त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेपेक्षा त्यांनी महाराष्ट्रासाठी केंद्रातले मंत्रिपद झटकून टाकले यासाठीच चिंतामणराव देशमुख मराठी मनाला थोर वाटत असतात. दिल्लीचे तख्त फोडून ते लाथाडून लावण्यात वगैरे मराठी मानसिकतेस खरे शौर्य दिसत असते. रिमोट कन्ट्रोल, घटनाबाह्य सत्ताकेंद्र, जबाबदारीविण सत्ता अशी एक ना अनेक शेलकी दूषणे माध्यमांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबतीत वापरली, पण मराठी मनात बाळासाहेबांचे स्थान कायम राहिले ते त्यागमूर्ती म्हणूनच! सत्ता पायाशी लोळण घेत असताना त्यांनी तिला तशीच पायाखाली लोळू दिली, तिला डोक्यावर आणि डोक्यात शिरु दिले नाही म्हणून बाळासाहेब थोर ही मराठी मनाच्या शिवसैनिकांची भावना. ती रास्त की अरास्त हा भाग आणखीनच वेगळा. पण त्यांच्यातला हा त्यागभाव ना त्यांच्या पुत्रात उतरलेला दिसतो, ना पुतण्यात. त्यांच्यातला एक गुण मात्र दोहोंनी थोडाथोडा घेतलेला दिसतो आणि तो म्हणजे बेधडक बोलत राहाण्याचा. स्वाभाविकच उद्धव किंवा राज ठाकरे काही बोलले रे बोलले की त्यांचे बोलणे साधेसुधे नाही तर तो घणाघातच ठरवायचा असा शिरस्ता जणू माध्यमांनी अंगी बाणवून घेतलेला दिसतो. यातील घण म्हणजे काय, ते नेमके कोणाचे अवजार, त्याचा उपयोग काय आणि त्याचा आघात कशावर होतो व कशासाठी होतो हे जाणून घेण्याची मग गरजच उरत नाही. ठाकरे बोलले ना, मग तो घणाघातच! तर मूळ मुद्दा त्यागाचा. प्रसंगवशात छोट्या पातीच्या उभय ठाकरेंनी महाराष्ट्राची सत्ता हाती आली तर ती राबवायला आवडेल असे कधी खुलेपणाने तर कधी आडपडद्याने सांगूनही टाकले आहे व तिथेच ज्येष्ठ आणि कनिष्ठ ठाकरे यांच्यातील दुभंग उघडा पडतो. पण अलीकडच्या काळात दोहोंमध्ये व विशेषत: त्यांच्या भाषेमध्येही फरक पडत चाललेला दिसतो. दादू उर्फ उद्धव यांचा घणाघात दिवसेंदिवस अधिकाधिक केविलवाणा होत चालला आहे तो मुळात त्यांच्या बोलण्यात अजिबातच न डोकावणाऱ्या पण मराठी मनाला प्रचंड मोहविणाऱ्या झिडकारण्याच्या वृत्तीच्या अभावापायी. ज्या सत्तेचा खेळ उभय ठाकरे आज कराती आहेत तो खेळ सिसॉसारखा असतो. केन्द्रात असलेल्या वाजपेयींच्या नेतृत्वाखालील सरकारचे होते नव्हते, तेवढे सारे हात दगडांखाली सापडले होते. तेव्हां शिवसेनेसह साऱ्यांनी त्या सरकारला वाकवता येईल तेवढे वाकवून घेतले होते. सत्ता टिकवणे ही वाजपेयी-महाजनांची तेव्हांची गरज असल्याने त्यांनीदेखील स्वत:ला वाकवून घेतले होते. आज भाजपासमोर ही समस्या अजिबातच नाही. सत्ता तशीही टिकणारच आहे, सेनेसह वा सेनेशिवाय. जुने हिशेब चुकते करण्याची यापरती नामी संधी कोणती असू शकते? त्याची सुरुवात अगदी प्रथमपासूनच झाली. केन्द्रात सरकार स्थापन करताना सेनेला नाकारले गेले नाही. उपकारकर्त्याची भूमिका अदा केली आणि ती करताना सेनेला मनाजोगते खाते मात्र दिले नाही. कुरकुर, आदळआपट सारे करुन झाले. पण लाभ काहीही झाला नाही. शाळेत जाताना मुलाला आई डब्यात भाजी-पोळी देते, मुलाला तूपसाखर-पोळी हवी असते, आई म्हणते जे दिले आहे ते मुकाट्याने गीळ नाही तर राहा तशाच उपाशी! तसेच काहीसे झाले. उपासमार टाळली गेली. इकडे महाराष्ट्रात काय वेगळे झाले आणि वेगळे होते आहे? भाजपा हा शेटजींचा म्हणजे व्यापाऱ्यांचा पक्ष हे तर सेनेचे लाडके मत. व्यापारी सहसा हुशारच (की लबाड?) असतो. गिऱ्हाईकाच्या नकळत तराजूला दांडी मारण्यात तो वाकबगार असतो. महाराष्ट्रात आजवर अशा अनेक दांड्या मारुन झाल्या. रुसवेफुगवे, आदळआपट नाही तर आपला घणाघात! हिंमत असेल तर समोरासमोर येऊन लढा! कशाला समोरासमोर यायचे? बसल्या जागी ठुसकुल्या आणि फुसकुल्या सोडून, उपेक्षा करुन समोरचा रक्तबंबाळ होत असेल तर करायचं काय समोरासमोर उभं राहून. इत्यर्थ, आता हे कथित घणाघाती हल्ले हास्यास्पद होत चालले आहेत. सैनिकांवरही त्यांचा परिणाम होईनासा झाला आहे. कारण मौखिक युद्धात नव्हे तर शारीरिक युद्धात त्यांना स्वारस्य असते, कारण त्यांना बाळकडूच तसे मिळालेले असते. तेव्हां ‘एक धक्का मार दो, युती तोड दो’! या तुलनेत पुतण्या पार्टी तर दिवसेंदिवस अधिकच केविलवाणी होत चालली आहे. घणाघाताची जागा जणू किणकिणाटाने घेतली आहे. ‘पाहा बुवा, मी इतकं सारं तुमच्यासाठी करुन ठेवलं, आता तुम्हीच ठरवा, मला पुन्हा संधी द्यायची की नाही आणि जे मला सोडून गेले त्यांना नंतर पश्चात्ताप होईल’ (तूर्तास त्यांचे तळपट होईल?) अशी अठाकरी भाषा सुरु झाली आहे. त्यागाशिवाय काही खरं नाही, हेच खरं!