सरकारातल्या संरक्षक वकिलांमुळे चोरांचे भाग्य थोर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 04:29 AM2018-10-27T04:29:58+5:302018-10-27T04:30:13+5:30
मेहूल चोक्सीही या देशाला शेकडो कोटींनी बुडवून पळाला आहे आणि त्याच्यामागे पोलीस व तपासयंत्रणांची माणसे धावत आहेत. गंमत ही की त्याची चौकशी जेथे करायची तेथे ती न करता ती माणसे त्याचा शोध आकाशात आणि जगाच्या अन्य भागात घेत आहेत.
देशभरच्या पोलिसांनी अन् तपास यंत्रणांनी एका चोराचा शोध साऱ्या जगात घ्यायचा आणि त्याच वेळी त्या चोराच्या संरक्षक वकिलांनी सरकारातल्या मोठ्या पदावर बसलेले दिसायचे, एवढा मोठा दैवदुर्विलास दुसरा नाही. आपली किंगफिशर विमान कंपनी जमीनदोस्त करून व देशाला हजारो कोटींनी गंडवून इंग्लंडला पसार झालेला विजय मल्ल्या जाण्यापूर्वी देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी अर्धा तास संसदेच्या संयुक्त सभागृहात बोलत होता. त्यांच्या तशा चर्चेची चित्रफीतच आता उपलब्ध आहे. त्याला भारतात परत पाठविण्याच्या भारत सरकारच्या विनंत्या इंग्रज सरकारने अमान्य केल्या. तेथील न्यायालयांनीही ‘तुम्ही त्याला चांगलेच वागवाल,’ याचे पुरावे त्यांच्या छायाचित्रांसह आमच्याकडे पाठवा, असे म्हटले. परिणामी, मल्ल्या हातून गेला व आता तो सापडण्याची शक्यताही नाही. मध्यंतरी तो इंग्लंडच्या राणीचे यजमान ड्यूक आॅफ एडिंबरो यांच्यासोबत गोल्फ खेळत असलेला देशाला दिसला. त्या आधी ललित मोदी देश व क्रिकेट यांना जमेल तेवढे बुडवून पळाला. पळण्याआधी त्याने देशाच्या परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांची रीतसर परवानगी मिळविली. ‘पत्नी आजारी आहे’ हे नित्याचे कारण सांगून त्याने ती मागितली व दयाळू मनाच्या स्वराजबार्इंनी ती दिली. पुढे तो इंग्लंडला गेला व तेथून तो जगभर फिरत राहिला. त्यालाही परत आणण्याचे आश्वासन सरकारने संसदेला दिले. त्यासाठी अन्य देशांशी झालेल्या संबंधित करारांचा वापर करून झाला. न्यायालयाचे दरवाजे व सरकारांच्या याचना करून झाल्या, पण तो येत नाही आणि सरकारलाही काही करता येत नाही. नंतर नीरव मोदी हा ३८ हजार कोटी रुपये घेऊन पळाला. परवा तो द. कोरियात दिसल्याचे प्रकाशित झाले. त्याला कसेही करून परत आणूच, अशी प्रतिज्ञा सरकारने केली. लोकांनाही ती खरी वाटली. दरम्यान, हा नीरव मोदी एका देशातून दुसºया देशात जाताना व त्यासाठी लागणारे पासपोर्ट व अन्य परवाने सोबतच घेतलेला आढळला. तसेही बँकांचे आठ लक्ष कोटींचे कर्ज ज्या महाभागांनी बुडविले, त्यांना माफ करण्याचे औदार्य मोदी सरकारने या आधी दाखविलेही आहे. आताचे ताजे प्रकरण मेहुल चोक्सीचे आहे. हा चोक्सीही देशाला शेकडो कोटींना बुडवून पळाला आहे आणि त्याच्यामागे पोलीस व तपासयंत्रणांची माणसे धावत आहे. गंमत ही की, त्याची चौकशी जेथे करायची, तेथे ती न करता, ती माणसे त्याचा शोध आकाशात आणि जगाच्या अन्य भागांत घेत आहेत. प्रत्यक्ष देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली हे चालवीत असलेली त्यांची चार्टर्ड अकाउंटंट कंपनीच या मेहुल चोक्सीची सल्लागार कंपनी आहे. तिचा सल्ला घ्यायला व तिला कायमचे बांधून ठेवायला, या चोक्सीने तिला वेळोवेळी लाखो रुपयांच्या रकमा दिल्या आहेत. या रकमांचा अखेरचा हप्ता २४ लक्ष रुपयांचा आहे. चोक्सीची चर्चा देशात सुरू होऊन कित्येक महिने झाले, तपास यंत्रणा थकल्या, माध्यमांनीही त्याचे नाव छापण्याचा कंटाळा केला. मात्र, एवढे होऊनही आपण, आपली फर्म वा आपली कन्या आणि जावई हेच या चोक्सीचे आर्थिक सल्लागार व संरक्षक आहोत, ही गोष्ट अरुण जेटलींनी कुणाला कळू दिली नाही. पोलिसांनाही त्यांच्याकडे तशी विचारणाही करावीशी वाटली नाही. चोक्सीचे सल्लागार कोण, या एका प्रश्नानेच पोलिसांना जेटलीपर्यंत पोचविले असते, पण एक तर त्यांनी ते विचारले नाही किंवा त्यांनी ते विचारू नये, असे आदेशच त्यांना दिले गेले असावे. तात्पर्य, चोरांचे सल्लागार व संरक्षक सरकारमध्येच बसले असतील, तर त्यांना पोलीस कसे पकडणार आणि तपास यंत्रणा तरी त्यांना कसे हात लावणार? आता आपल्या फर्मचे नाव उघड झाल्यानंतर, आपण चोक्सीचे २४ लाख रुपये परत केले, असा खुलासा अरुण जेटलींनी केला आहे. मात्र, त्या आधी घेतलेल्या व रिटेनर म्हणून ठेवलेल्या रकमेसंबंधी ते बोलले नाहीत आणि बोलणारही नाहीत, असो. जेटलींसारखे संरक्षक व सल्लागार ज्या चोराला सापडतात, त्याचे भाग्य काय वर्णावे? खरे तर भारताच्या राष्ट्रपतींनी या जेटलींना मल्ल्या व चोक्सी प्रकरणात दोन आणि सुषमा स्वराज यांना ललित मोदी प्रकरणात एक मोठे पारितोषिक देऊन त्यांचा गौरवच करायचा. तो तसा केला जाण्याची आता आपण वाट पाहू या.