वडिलांशी नाते खास...

By admin | Published: June 19, 2016 02:11 AM2016-06-19T02:11:07+5:302016-06-19T02:11:07+5:30

बाबा. आईनंतर प्रत्येकाच्या आयुष्यातलं अगदी महत्त्वाचं स्थान. प्रत्येक वेळी व्यक्त न होता आपल्या मुलांची प्रगती नीट चालली आहे की नाही याकडे त्यांचे अगदी बारीक लक्ष.

Father's relationship is special ... | वडिलांशी नाते खास...

वडिलांशी नाते खास...

Next

- फादर्स डे विशेष

बाबा. आईनंतर प्रत्येकाच्या आयुष्यातलं अगदी महत्त्वाचं स्थान. प्रत्येक वेळी व्यक्त न होता आपल्या मुलांची प्रगती नीट चालली आहे की नाही याकडे त्यांचे अगदी बारीक लक्ष. मुलांच्या अवघड प्रसंगातही ढालीसारखी त्यांना साथ देतात. बाबांकडेही एक हळवा कोपरा असतोच. नाही का! आज फादर्स डेच्या निमित्ताने या सेलीब्रिटींचे त्यांच्या वडिलांशी असणारे नाते उलगडायचा केलेला हा प्रयत्न.

बाबा माझे मित्र
बाबांबरोबर माझं एक वेगळचं नातं आहे. मी बाबांसारखीच दिसते. आमचा स्वभाव अगदी सेम आहे. मजा म्हणजे आमचा वाढदिवस जरी वेगळ्या महिन्यातला असला तरी त्याची तारीख मात्र सेम आहे. बाबांचं आणि माझं बॉण्डिंग आईपेक्षा जास्त आहे. मी अभिनय करण्याचा निर्णय घेतल्यावर पुण्याहून वारंवार मुंबईला आॅडिशन्सला यावं लागायचं. त्या वेळी पटकन गाडी काढून माझ्याबरोबर वणवण त्यांनाही करावी लागली आहे. आज ते जेव्हा माझी मालिका बघतात, तेव्हा त्यांना खूप अभिमान वाटतो. त्यांच्या अपेक्षा मी काही अंशी पूर्ण करतेय याचं समाधान वाटतं मला. मजा सांगायची झाली तर बाबांना आम्ही घरी 'बादली' म्हणून चिडवतो. इतके ते हळवे आहेत. माझ्या लग्नात सगळ्यात जास्त बाबा रडले. असे हे माझ्यासाठी प्रचंड हळवे असणारे माझे बाबा माझे बेस्ट फ्रेंड आहेत.
- सई रानडे-साने, अभिनेत्री

आम्ही हटके मित्र
मी आणि माझे बाबा एकमेकांचे बेस्ट फ्रेंड आहोत. ते माझे खरे हीरो आहेत. आमच्या दोघांच्या नात्यात खुलेपणा आहे. दोन मित्र एकमेकांशी ज्या मोकळेपणाने बोलतात, वागतात तसेच आम्ही नेहमी वागतो. त्यामुळेच माझ्या ‘जरा हटके’ या चित्रपटात भूमिका साकारताना मला सोपे गेले. बाबा ज्यावेळेस आॅफिसच्या कामाच्या किंवा इतर कोणत्या टेन्शनमध्ये असतात तेव्हा मी प्रसंगी त्यांचा वडीलसुद्धा होतो. असे आमचे वडील-मुलगा-मित्र असे नाते आहे.
- सिद्धार्थ मेनन, अभिनेता

पहिले समीक्षक माझे बाबाच
बाबांचं आणि माझं नातं मित्रांसारखं आहे. आम्ही अनेक विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारतो. मी लिहिलेल्या गाण्याचे, कवितांचे समीक्षक तेच असतात. कधी खूप छान लिहिलंयस म्हणून कौतुक करतात तर कधी अजून थोडं बदल म्हणूनसुद्धा सांगतात. लहानपणापासूनच त्यांनी मला वाचनाची गोडी निर्माण केली. आणि आज त्यांच्या प्रोत्साहनामुळेच माझ्यातल्या कवयित्रीला वाव मिळाला आणि अभिनेत्रीसोबतच कवयित्री म्हणूनही ओळखले जाते.
- स्पृहा जोशी, अभिनेत्री

गरज ओळखून वागायला शिकवलं
माझे बाबा माझ्यासाठी आयडॉल आहेत. खूपच वेगळं व्यक्तिमत्त्व आहे त्यांचं. त्यांची १०वीची परीक्षा झाल्यावर ते ८-९वीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेस घेत असत. त्यांनी नेहमीच आम्हाला गरजा ओळखून वागायला शिकवलं. ते कायम आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आमच्याशी मित्र म्हणून वागले. इंडस्ट्रीत काम करण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी घेतलेल्या उच्च शिक्षणाचं काय, असा प्रश्न त्यांना पडला. पण त्यांनी विरोध केला नाही. उलट मला ६ महिने दिले. 'गोष्ट तशी गमतीची' या माझ्या नाटकात ज्याप्रमाणे वडील-मुलात वाद दाखवले आहेत तसेच वाद आमच्यातही होतात. नाटकात वडिलांनी मुलाला आय लव्ह यू म्हणावे अशी मुलाची इच्छा असते. तशी माझीही होती. या नाटकाच्या पहिल्या प्रयोगा वेळी नाटक संपल्यावर बाबांनी मला घट्ट मिठी मारली आणि आय लव्ह यू म्हटले. ते आजवरचं त्यांनी दिलेलं सर्वात मोठं गिफ्ट आणि अप्रतिम आठवण होती माझ्यासाठी. ते वर्षानुवर्षं काम करत आनंदी राहावे असंच मला वाटतं.
- शशांक केतकर, अभिनेता

सतत प्रोत्साहन देणारे बाबा
माझे बाबा जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आहेत. शाळा घरापासून खूप लांब असल्यामुळे बाबा दिवसातले १२ तास घराबाहेरच असतात, त्यामुळे ते मला क्वचितच भेटतात. मात्र जेव्हा ते सोबत असतात, तेव्हा आम्ही खूप मज्जा करतो. अभिनयक्षेत्रात येण्यासाठी माझ्या बाबांकडून मला भरपूर प्रोत्साहन मिळाले. माझे बाबा खूप हळवे आहेत. मला जेव्हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्या वेळी बाबा तेथे नव्हते. पण त्यांना ही बातमी समजली तेव्हा ते खूप भावूक झाले होते. मला थोडे दुखले खुपले तरी ते काळजी करतात. 'एका शूटिंगदरम्यान मी खूप आजारी पडलो होतो. हे शूटिंग मुंबई आणि चिपळूणमध्ये होते, तर बाबा आमच्या गावी बीडमध्ये होते. मी आजारी असल्याचे कळल्यावर ते काळजी करतील, सगळे काही सोडून मला भेटायला येतील, असे मला वाटले. म्हणून मी त्यांना याबद्दल काहीच सांगितले नाही.
- हंसराज जगताप, बालकलाकार

शब्दांकन - भक्ती सोमण

Web Title: Father's relationship is special ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.