ही आवडते मज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:14 AM2017-10-18T00:14:28+5:302017-10-18T00:14:55+5:30
‘कृतांत कटकामलध्वज जरा दिसो लागली’ अशा वृद्धापकाळ प्रवेशाच्या वेळी ‘ही आवडते मज’ असे म्हणणे म्हणजे काहीतरीच़ गवºया पुढे गेल्या आता ही भाषा तोंडी शोभते का? असे कानी पडण्याची शक्यता अधिक़ मित्रांनो!
- डॉ. गोविंद काळे
‘कृतांत कटकामलध्वज जरा दिसो लागली’ अशा वृद्धापकाळ प्रवेशाच्या वेळी ‘ही आवडते मज’ असे म्हणणे म्हणजे काहीतरीच़ गवºया पुढे गेल्या आता ही भाषा तोंडी शोभते का? असे कानी पडण्याची शक्यता अधिक़ मित्रांनो! ही म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून माझे विधान शाळेबद्दल आहे़ ज्या शाळेने मला घडविले, त्या शाळेचे नावच मुळी आदर्श मराठी शाळा होते़ इयत्ता चौथीमध्ये आचार्य अत्रेंची कविता अभ्यासाला होती़
‘ही आवडते मज मनापासुनी शाळा
लाविते लळाही जसा माऊली बाळा’
गावी जाऊन शाळेचे अस्तित्व शोधतो़ शाळेचे दुसरीकडे स्थलांतर झाले आहे़ मला उगीचच वाटून राहिले आदर्शवादाचेच स्थलांतर झाले आहे़ नावाला पूर्वी अर्थ होता़ आता नावाचे निरर्थ अर्थ काढले जातात़ माझ्या वर्गामध्ये त्या काळी पाच शिवाजी शिकत होते़ भांडण झाले तर ताठ मानेने भाग घेत असू़ ‘जादा बोलनेका काम नही’ असे दुसºया वर्गातील विद्यार्थ्यांना बजावित असू़ शिवाजी कदम, शिवाजी नवगन, शिवाजी चव्हाण, शिवाजी पाटील आणि शिवाजी गुंड़ शिवाजी गुंड म्हणायला विचित्रच वाटे पण एखाद्याच्या आडनावाला आपण काय करणार? शिवाजी गुंड फारच किरकोळ देहयष्टीचा होता़ दोन महिन्यांतून एकदा आजारी पडे़ आम्ही त्याला हिणवत असू, तुझ्यात शिवाजीचे एकही लक्षण नाही आणि आडनावातील गुंडपणा तर काहीच नाही़ बिनकामाचा शिवाजी म्हणून त्याला चिडविले जाई़ वर्गात पाच शिवाजी असले तरी आमच्या ‘अ’ वर्गावर ‘ब’ वर्गाची कुरघोडी सदैव चाले़ कारण त्यांच्या वर्गात एकच शिवाजी असला तरी त्याचे आडनाव भोसले होते़ त्याचा रुबाब मोठा होता़
आडनावातील मोठेपणा चौथी कक्षेतच लक्षात आला़ या शाळेने बालवयात खूप काही शिकविले जे पाठ्यपुस्तकात नव्हते़ आठ आणे फ ी महिन्याला भरावी लागे़ तीन महिने फी भरायची राहून गेली़ खडकीकर गुरुजी तीन महिने फी न भरलेल्या विद्यार्थ्यांची नावे वर्गात वाचत होते़ त्यात माझे नाव नव्हते़ मला आश्चर्य वाटले़ दोन दिवसांनी दीड रुपये घेऊन गुरुजींना भेटलो़ गुरुजी एवढेच म्हणाले, काळ्या! तुझी फ ी मी भरली आहे़ काळजी करू नको़ पण दंगामस्ती करण्यापेक्षा अभ्यासाकडे अधिक लक्ष पुरव़ खडकीकर गुरुजींनी किती जणांची फी भरली असेल ते देव जाणे़ माणसे न बोलता आदर्शवाद जगत होती़ अध्यात्म आणखी काय वेगळे असते़