जगाकडे ‘नजर’ असलेले ‘पाच डोळे’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2023 08:19 AM2023-10-25T08:19:35+5:302023-10-25T08:20:45+5:30
‘फाइव्ह आय’ या पाच महत्त्वाच्या देशांच्या गुप्तचर अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच कॅलिफोर्नियात झाली. चीनच्या धोकादायक कृत्यांवर यावेळी गंभीर चर्चा झाली.
- वप्पाला बालचंद्रन, माजी विशेष सचिव, कॅबिनेट सचिवालय
कॅलिफोर्नियात ‘फाइव्ह आय’ या पाच देशांच्या गुप्तचर अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर हरदीप सिंग निज्जर याच्या मृत्यूविषयी १९ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाच्या गुप्तचर संघटनेचे प्रमुख माईक बर्जेस यानी केलेल्या निवेदनामुळे कदाचित असा समज होईल की, ही शिखर बैठक भारत आणि कॅनडा यांच्यामध्ये चाललेल्या विवादावर चर्चा करण्यासाठी होती. वास्तव ते नाही. पालो आल्टो येथे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या हूवर इन्स्टिट्यूशनमध्ये एफबीआयचे संचालक क्रिस्टोफर रे यांनी १७ ऑक्टोबरपासून ही तांत्रिक स्वरूपाची अभूतपूर्व अशी बैठक भरवली होती हेच काय ते वास्तव आहे.
प्रारंभी एफबीआयने या बैठकीला ‘फाइव्ह आय समिट’ म्हटले तरी नंतर तिचे नामकरण ‘द फर्स्ट इमर्जिंग टेक्नॉलॉजी ॲण्ड सिक्युरिंग इनोवेशन सिक्युरिटी समिट’ असे करण्यात आले. यूएस नॅशनल सिक्युरिटी एजन्सी (एनएचए) ही या गुप्तचर संघटनेची महत्त्वाची सदस्य या बैठकीला नसल्यामुळे समिटला अधिकृत मानले गेले नाही.
पाच महत्त्वाच्या देशाच्या सुरक्षाप्रमुखांनी जाहीरपणे एकत्र येऊन छायाचित्रे काढली. हे पहिल्यांदाच घडल्यामुळे बैठकीला अभूतपूर्व म्हणायचे. जागतिक गुप्तचर सेवांचे प्रमुख अशारीतीने जाहीर व्यासपीठावर पहिल्यांदाच येत होते. खासगी क्षेत्रातील निवडक तंत्रज्ञ येथे जमले होते. सुरक्षेत खासगी क्षेत्राचे महत्त्व त्यामुळे अधोरेखित झाले.
१७ ऑक्टोबरला हूवर इन्स्टिट्यूटच्या संचालक कोंडोलिझा राईस यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले. त्यांनी आधी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार तसेच जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या काळात परराष्ट्र मंत्री म्हणून काम केलेले आहे. लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी अमेरिकन सरकार खासगी क्षेत्रातील उभरत्या तंत्रज्ञानाचा वापर करत नाही, अशी टीका होत असते, असे राईस यांनी त्यांच्या उद्घाटनपर भाषणात सांगितले.
१७ ऑक्टोबरला पाचही देशांचे प्रमुख नाट्यपूर्णरीत्या कोंडोलिझा राईस यांच्याबरोबर पंचमुखी वार्तालाप करण्यासाठी बसले. ऑस्ट्रेलियाच्या इंटेलिजन्स अँड सिक्युरिटीचे प्रमुख माइक बर्जेस, ब्रिटनच्या एम. आय. फाइव्हचे केन मॅकलम, कॅनेडियन सिक्युरिटी इंटेलिजन्स सर्व्हिसेसचे डेविड व्हिग्नेल्ट आणि न्यूझीलंडच्या सिक्युरिटी इंटेलिजन्स सर्व्हिसेसचे ॲन्ड्र्यू हॅम्पटन तसेच क्रिस्टोफर रे या बैठकीत सामील झाले. आपले संरक्षण करण्यासाठी या पाच देशांचे अधिकारी लोकशाहीचे कान आणि डोळे म्हणून काम करतील, असा अभिप्राय कोंडोलिझा राईस यांनी त्यांच्या आगमनप्रसंगी व्यक्त केला.
अमेरिकन उद्योगातील प्रमुख, उद्योजक, सरकारी अधिकारी तसेच या क्षेत्रातील विद्वानांना एकत्र आणण्यासाठी एफबीआयने या बैठकीसाठी पुढाकार घेतला. चीनच्या धोकादायक तंत्रज्ञानात्मक कारवायांपासून लोकांचे रक्षण तसेच आर्थिक सुरक्षा आणि अभिनवता याला निर्माण झालेल्या धोक्यावर या परिषदेत खल व्हावयाचा होता. सुमारे ४५० तंत्रज्ञांनी बैठकीला हजेरी लावली.
उपरोक्त परिषदेच्या परिघावरील विषयाबद्दल बोलताना ऑस्ट्रेलियाचे माईक बर्जेस यांनी हरदीपसिंह निज्जर याच्या मृत्यूविषयी १९ ऑक्टोबरला काही विधान केल्याची बातमी ऑस्ट्रेलियाच्या एबीसी न्यूजने दिली. पालो अल्टो शिखर बैठकीत हा विषय निघाला की नाही हे त्यांनी सांगितले नाही; परंतु, बर्जेस एवढे मात्र म्हणाले की इस्रायल आणि हमास यांच्यातील लढाईमुळे हिंसाचार उसळी घेईल, असे ऑस्ट्रेलियाला वाटते आहे.
दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या वेळी अटलांटा येथे अमेरिकेचे अध्यक्ष फ्रॅंकलिन डी रुझवेल्ट आणि ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्यात १९४१ साली झालेल्या करारातून फाइव्ह आय कराराचा जन्म झाला. कालांतराने ब्रिटिश- यूएसए कम्युनिकेशन (ब्रूसा) या १९४३ साली झालेल्या कराराच्या माध्यमातून त्याचे स्वरूप निश्चित झाले.
अमेरिकन युद्धखाते आणि ब्रिटिश कोड सायबर स्कूल यांच्यात तांत्रिक गुप्त माहितीची देव-घेव करण्याबाबत सहकार्य करणे, हा त्याचा आशय होता. लक्षवेधी गोष्ट म्हणजे वायरलेस एक्सपेरिमेंटल सेंटर दिल्लीच्या आनंद पर्वत भागात होते. नंतर तेथेच आपला इंटेलिजन्स ब्युरो सुरु झाला. ‘बृसा’मध्ये कॅनडा १९४९मध्ये सामिल झाला. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मात्र ५६ साली सदस्य झाले. २५ जून २०१० पर्यंत करार गुप्त ठेवण्यात आले होते.