दृष्टिकोन: पूरग्रस्त गावांतील लोकांच्या मनात भीतीचे काहूर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 02:20 AM2020-06-10T02:20:03+5:302020-06-10T02:20:38+5:30

स्थानिक पातळीवर ही मदत मिळाली असतानाच ‘लोकमत’मधील बातम्या वाचून सारा महाराष्ट्र मदतीसाठी धावला.

Fear gripped the minds of the people in the flood-hit villages | दृष्टिकोन: पूरग्रस्त गावांतील लोकांच्या मनात भीतीचे काहूर

दृष्टिकोन: पूरग्रस्त गावांतील लोकांच्या मनात भीतीचे काहूर

Next

विश्वास पाटील

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील गतवर्षीच्या महापुरात राज्यभरातून लोक मदतीला धावून आले. त्यामुळे संकटाचे ओझे सहजतेने पेलता आले; परंतु यंदा कोरोनाचे संकट असल्याने कोण मदतीला येणार नाही आणि आपल्याच गावांतील लोकही कुणाला घरात घेणार नाहीत, या भीतीने पूरग्रस्त गावांतील लोकांच्या मनात भीतीचे काहूर उठले आहे. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील १२३० पैकी ३४५ गावे महापुरामुळे बाधित झाली. त्यातील २७ गावांचे शंभर टक्के स्थलांतर झाले होते. ४१ गावे अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे बाधित झाली. सांगली जिल्ह्यातील पूरबाधित गावांची संख्याही १०४ होती. त्यांतील काही पूर्णत:, तर काही अर्धी स्थलांतरित झाली. महापुराचा महाराष्ट्रात सर्वाधिक फटका या दोन जिल्ह्यांना गतवर्षी बसला. पुराचे पाणी वाढू लागल्यावर ५ आॅगस्टला मध्यरात्रीपासून गावे रिकामी होऊ लागली. दि. ५ पासून १५ आॅगस्ट २०१९ पर्यंत महापुराचा वेढा होता. पूर वाढू लागल्यावर हाताला लागेल ते साहित्य डोक्यावर घेऊन व हातात जनावरांचा कासरा धरून लोक माळरानावरील शाळा, मंदिर, समाजमंदिर, नातलग, भावकी अशा कुणाच्या घरी सोय होईल तिथे स्थलांतरित झाले. लोकांनीही खुल्या मनाने दार उघडून त्यांना आपल्या घरात घेतले. संकटाच्या काळात माणुसकी धावून आल्याचे एक चांगले चित्र त्यावेळी गावोगावी पाहायला मिळाले. ज्या गावांमध्ये पुराचे पाणी घुसले, त्या गावांशेजारील गावे पूरबाधित गावांच्या मदतीसाठी धावून आली. रोज सकाळी माहेरवाशिणीला शिदोरी द्यावी तशा दुरड्या भरून लोकांनी जेवण करून आणून वाढले. या लोकांना जेवण आणून वाढण्याची जणू स्पर्धाच लागली. नुसते जेवणच दिले नाही, तर जनावरांना चाराही आणून दिला.

स्थानिक पातळीवर ही मदत मिळाली असतानाच ‘लोकमत’मधील बातम्या वाचून सारा महाराष्ट्र मदतीसाठी धावला. अगदी यवतमाळ, परभणीपासून ते मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर असे अनेक जिल्हे व मुंबई, ठाणे, पुण्यातूनही तसेच आपेगाव, दापोली, फोंडा अशा मोठ्या गावांतूनही प्रचंड मदत ट्रकमधून आली. एका-एका गावासाठी तब्बल २५-२५ ट्रक मदत आली. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील आरेसारख्या गावाने ‘आम्हाला आता मदत नको’ अशी जाहीर भूमिका घेतली. काहींनी कडबाकुट्टीचे ट्रक पाठविले. काहींनी गायी घेऊन दिल्या. उत्तम प्रतीच्या धान्यापासून ते कपडे, औषधे ते टूथपेस्टपर्यंत लोकांनी सोय केली. स्थलांतरित जागी लोकांना डासांचा त्रास होईल म्हणून मच्छर अगरबत्तीही दिल्या. एवढी काळजी समाजाने समाजाची घेतली. हे धान्य किमान पुढील सहा महिने पुरेल इतके होते. त्यामुळे महापुरात घरे वाहून गेली तरी लोक त्यातून सावरले व संसाराला लागले.
आता यंदाही महापुराचा धोका लोकांच्या मनात घर करून राहिला आहे. गेल्यावर्षी महापुरानंतर जिल्हा प्रशासनाने गावे स्थलांतरित करण्याच्या योजना आखल्या; परंतु त्या कागदावरच राहिल्या. आता प्रशासन असे म्हणत आहे की, ‘यावर्षी तुमचे तुम्ही सावध रहा, आम्ही तुमच्या मदतीला येणार नाही.’ आता स्थलांतरित व्हायचे झाल्यास जायचे कुठे, असा प्रश्न लोकांसमोर आहे. त्यामुळे पूरबाधित लोकांनी आताच पंढरपूरच्या दिंडीला जाताना जशी बांधतात, तशी खर्ची बांधली आहे. यावर्षी महत्त्वाचा प्रश्न आहे जायचे कुणाच्या घरी... कारण कोरोनाच्या संसर्गामुळे भावकीतील किंवा मित्रमंडळींच्या घरीही कोण घेणार नाहीत. लोक तसे बोलून दाखवू लागले आहेत. कोरोनाचे संकट अजून पुरेसे दूर झालेले नाही. त्यामुळे घरात गर्दी करून धोका पत्करायला नको, अशी लोकांची मानसिकता आहे आणि ती बरोबर आहे. गेल्यावर्षी गावे मदतीला धावून आली, तशी यंदा येणार नाहीत. त्यामागेही कोरोनाचे कारणच आहे.

मुळात पुणे-मुंबई ही शहरे कोरोनामुळे बेजार झाली आहेत. त्यात आपण सर्वांनीच पुणे-मुंबईकरांमुळे आपल्या जिल्ह्यात कोरोना आला म्हणून त्यांची हेटाळणी केली आहे. या शहरांतील बहुतांशी लोक मुळीच आपापल्या गावी आले आहेत. त्यामुळे तिथे मदत गोळा करण्यासाठी कोण पुढाकार घेणारे नाही. परिणामी या शहरांतून मदत मिळण्याची शक्यता नाही. औरंगाबादसह सोलापूर व अन्य शहरांत लॉकडाऊन असल्याने तेच लोक संकटात आहेत. अशा स्थितीत बाहेरून कुठलीही मदत येणार नाही. स्थलांतरित व्हायचे तर कुठे जायचे आणि हे संकट कसे पेलायचे, असा प्रश्न या लोकांच्या मनात भीतीचे काहूर माजवत आहे.

( लेखक लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीच वरिष्ठ मुख्य उपसंपादक आहेत )

Web Title: Fear gripped the minds of the people in the flood-hit villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.