एका माळेचे मणी

By admin | Published: January 6, 2017 01:49 AM2017-01-06T01:49:10+5:302017-01-06T01:49:10+5:30

मूलतत्त्ववादी आणि खरे तर बुरसटलेले विचार ही काही कोणा एका विशिष्ट विचारसरणीची किंवा कुणा एका व्यक्तीची मक्तेदारी नसते हेच खरे.

A feather beads | एका माळेचे मणी

एका माळेचे मणी

Next

मूलतत्त्ववादी आणि खरे तर बुरसटलेले विचार ही काही कोणा एका विशिष्ट विचारसरणीची किंवा कुणा एका व्यक्तीची मक्तेदारी नसते हेच खरे. त्यामुळे कोणत्याही महिलेवर अतिप्रसंग झाला की, महिलांच्या आधुनिक पेहराव्यावर तुटून पडणारा जसा कुणी एखादा महंत असतो तसाच आबू आझमींसारखा आमदार असतो आणि कर्नाटक राज्याचे गृहमंत्रीपद सांभाळणारा परमेश्वरदेखील असतो. सारे एका माळेचेच मणी. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी बेगळुरु शहरात आनंदोत्सव साजरा करणाऱ्या युवतीवर अतिप्रसंग झाल्याची घटना घडल्यानंतर या घटनेबाबत चिंता व्यक्त करण्याऐवजी परमेश्वर यांनी ‘अशा घटना तर होतच राहणार’ अशी अत्यंत असंवेदनशील प्रतिक्रिया व्यक्त केली तर आबू आझमी थेट महिलांच्या आणि विशेषत: युवतींच्या तोकड्या कपड्यांवर टीका करुन मोकळे झाले. तोकडे कपडे घालून रात्री-बेरात्री शहरात फिरले तर असे होणारच असे आझमी यांना वाटते. आपला मुद्दा स्पष्ट करताना त्यांनी साखर सांडली तर मुंगळे गोळा होणारच अशी उपमाही वापरली. मागे उत्तर प्रदेश राज्यातील नेताजी मुलायमसिंह यादव यांनी अशाच स्वरुपाची प्रतिक्रिया व्यक्त करताना हुल्लडबाजी करणाऱ्या टारगट मुलांची वकिली केली होती. याचा अर्थ एकच हे सारे लोक स्वत:बाबतीत किंवा त्यांच्या मुलग्यांबाबतीत नव्हे तर केवळ महिला आणि युवतींबाबत अजूनही मध्ययुगीन मानसिकतेचेच गुलाम आहेत. पण तसे तरी कसे म्हणावे? याच आबू आझमी यांच्या सूनबाई हिन्दी सिनेमात काम करतात किंवा करीत होत्या. कारण इतक्यात त्यांचे नाव फारसे कानी पडलेले नाही. तरीही सूनबाई आयेशा टाकीया यांचा गाजलेला सिनेमा म्हणजे वॉन्टेड. सलमान खान त्यांचा हिरो. श्वशुर आबू आझमी यांचे विचार लक्षात घेऊन आयेशाने खरे तर या सिनेमात पायघोळ अंगरखा आणि डोक्यावरुन घेऊन नाकापर्यंत येणारी ओढणी लेवूनच काम करायला हवे होते. पण तसे काही त्या सिनेमात नव्हते. आझमींच्या भाषेत तिचे कपडे तोकडेच होते. केवळ सिनेमासंगतच नव्हे तर तिचे कपडे कालसंगतही होते. पण जे सुनेला साजेसे ते इतर युवतींच्या दृष्टीने म्हणजे पाप असा आझमी यांचा अजब न्याय असावा. त्यामुळे आझमी आणि परमेश्वर या दोहोंना राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस बजावली हे चांगलेच झाले.

 

Web Title: A feather beads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.