विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 08:11 AM2024-10-26T08:11:12+5:302024-10-26T08:12:31+5:30

‘जास्त मुले जन्माला घाला’ असे सल्ले दक्षिण भारतातले दोन मुख्यमंत्री देत असताना चीन सरकारने जन्मदर वाढविण्यासाठी नवीनच टूम काढली आहे!

Featured Article Do whatever you want, get married, have a baby New trend to increase the birth rate in India | विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!

विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!

सुवर्णा साधू, चिनी राजकारण-समाजकारण यांच्या अभ्यासक

‘यंदा आमच्याकडे कर्तव्य आहे’, आपल्याकडे हे वाक्य हल्ली ऐकू येते का? चीनमध्ये मात्र अजूनही अनेकदा मुला-मुलींचे आई-बाप ‘हून-यीन चियांग लाय-लिन’ म्हणजेच ‘यंदा आमच्याकडे कर्तव्य आहे’, असे सांगत असतात. कोणत्याही आशियाई संस्कृतीप्रमाणेच, चीनमध्येदेखील विवाहसंस्था अत्यंत महत्त्वाची आहे. लग्न करणे, कुटुंबव्यवस्था चालवणे, हे चीनमध्ये प्रगतीचे, विकासाचे द्योतक मानले जाते. मात्र, चीनची तरुण पिढी लग्नासाठी अजिबात तत्पर नाही. एकेकाळी लग्नासाठी मुलींचा बाजार भरवणाऱ्या चीनमध्ये खूप बदल झाला आहे खरा, पण तरीही कन्फुशियन विचारांचा पगडा तितकासा कमी झालेला नाहीच. पारंपरिक रितीरिवाज, सरकारी धोरणे आणि आधुनिकीकरणामुळे चीनमधील विवाहसंस्थेत गेल्या काही वर्षांपासून लक्षणीय बदल होत आहेत. वर्षानुवर्ष चालत आलेल्या कन्फुशियनवादाचा पगडा नष्ट करणे हे माओंच्या कम्युनिस्ट पक्षाचे सुरुवातीपासूनचे ध्येय होतेच. गेल्या काही वर्षांत लग्न, करिअर आणि मुले यांच्यात निवड करायची झाल्यास तरुण पिढी करिअरच निवडत चालली आहे. हल्ली त्यांचे मुख्य ध्येय पैसे कमावणे हेच झाले आहे. 

१९७९ साली लागू केलेल्या ‘दर घरटी एक मूल’ धोरणाचे उद्दिष्ट, वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे, पर्यावरण व नैसर्गिक संसाधनांची आव्हाने व असंतुलन कमी व्हावे आणि लोकसंख्या वाढीचा दर आर्थिक विकास दराच्या पुढे जाऊ नये, हे होते. या धोरणामुळे तीन महत्त्वपूर्ण दुष्परिणामांचा सामना आज चीन करत आहे. कमी झालेला प्रजनन-दर, मुलगे होण्याकडे झुकता कल, त्यामुळे वाढलेले भ्रूणहत्येचे प्रमाण आणि ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढीस लागून काम करणाऱ्यांची संख्या कमी होणे!

सुधारणा वाढल्या, तसा जीवनशैलीचा स्तरही वाढू लागला आणि पैशांच्या गरजेपोटी संपूर्ण तरुण पिढी झटून कामाला लागली. एकच मूल धोरणापायी थोडाफार जो काय असंतोष होता, तो आर्थिक समृद्धीने खोडून काढला. सरकारी अपेक्षेप्रमाणे, २०१६ साली दोन मुले धोरणाचा प्रचार आणि २०२१ साली तीन मुले किंवा जास्त असा प्रचार करूनही चीनमध्ये ‘बेबी बूम’ काही आला नाही. लोकांना सुबत्तेत राहण्याची सवय जडली आहे आणि त्यासाठी पैसा कमवणे अंगवळणी पडले आहे.

याचा विपरित परिणाम टाळण्यासाठी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी अनेकदा आपल्या भाषणात, कौटुंबिक मूल्यांचे महत्त्व आणि चिनी समाजाचे प्रमुख आधारस्तंभ म्हणून विवाहसंस्थेवर भर दिला आहे. चांगली कुटुंबसंस्था राष्ट्रीय स्थिरता आणि समृद्धीमध्ये योगदान देते, असे त्यांचे म्हणणे. त्यांच्या भाषणांत ते वारंवार कौटुंबिक निष्ठा आणि लग्नासह चिनी सांस्कृतिक परंपरांचे महत्त्व अधोरेखित करतात. हाच तो कन्फुशियन विचार, ज्याच्याविरोधात माओ आणि त्यांच्या फौजेने एकेकाळी लढा दिला होता. पण आज चिनी शासनाला ह्याचाच आधार घेत पुढची पायरी चढायची आहे.

चिनी सरकार तरुणांना लग्न करून मुले जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. तरीही लोकसंख्या वाढ होत नाही. कारण तरुण मुले लग्नाला नकार देत आहेत.  बेरोजगारी, महागाई आणि कोरोनानंतर खालावत गेलेला आत्मविश्वास, यामुळे जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्थेतील तरुण  अविवाहित राहणे किंवा लग्न करणे पुढे ढकलणे पसंत करत आहेत.  २७-२८ वर्षे वयाच्या अविवाहित मुलींना ‘शंग न्य्वी’ म्हणजेच उरलेल्या स्त्रिया अशी उपाधीदेखील लावून झाली, तरीही आज चीनमध्ये लग्नाला प्राधान्य नाही! चीनच्या सरकारने आता आणखीन एक प्रयत्न करायचे ठरवले आहे. चीनच्या नागरी व्यवहार विद्यापीठाने ‘मॅरेज सर्व्हिसेस अँड मॅनेजमेंट’ हा पदवी अभ्यासक्रमच सुरू केला आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना कौटुंबिक समुपदेशन आणि विवाह नियोजन यासारख्या क्षेत्रात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

चिनी सरकारसाठी दुसरी चिंताजनक गोष्ट म्हणजे, घटस्फोटाचा वाढता दर. हा पदवी कार्यक्रम सुरू करून विवाह-संबंधित उपक्रम आणि संस्कृतीला प्रोत्साहन देता येईल, असा त्यांचा विश्वास आहे.  या पदवी-कार्यक्रमाद्वारे, चीनची सकारात्मक विवाह आणि कौटुंबिक संस्कृती विद्यार्थी आणि लोकांसमोर 
येईल. त्याचबरोबर चीनच्या विवाह रितीरिवाजांमध्ये सुधारणाही सुचवल्या जातील, असे चीनच्या सरकारचे म्हणणे आहे.

या पदवी कार्यक्रमावर सोशल मीडियामध्ये टीकेची झोड उठली आहे. अनेकांनी विवाह-दर कमी होण्याच्या मुख्य कारणांवर तोडगा न काढता, एका नवीन उपक्रमाच्या आवश्यकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अनेकांनी खिल्ली उडवत, ‘राज्याच्या मालकीची विवाह संस्था सुरू करण्याची वेळ आली आहे’, असेदेखील म्हटले आहे. देशभरातून आलेल्या ७० विद्यार्थ्यांना या विषयाचे पूर्ण मार्गदर्शन करण्यात येणार आहे. काही काळाने हा उपक्रमदेखील यशस्वी ठरल्याचे चिनी शासन घोषित करेल. मुख्य प्रश्नाला हात न घालता, नवीन उपक्रम सुरू करणे, ही चूक माओंनीदेखील केली होती. आज शी जिनपिंगदेखील तीच चूक करत आहेत. त्याचे परिणाम काय आणि कसे होतील, हे भविष्यात कळेलच.

suvarna_sadhu@yahoo.com

Web Title: Featured Article Do whatever you want, get married, have a baby New trend to increase the birth rate in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.