विशेष लेख: डोनाल्ड ट्रम्प की कमला हॅरिस? - प्रश्न तो नाहीच!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 11:39 AM2024-11-06T11:39:24+5:302024-11-06T11:40:08+5:30
US Elections 2024: वंदनीय नेत्यांच्या प्रभावातून बाहेर पडून साधारण नेत्यांच्या कच्छपी लागण्याचे नवे युग सर्वत्रच सुरू झालेले आहे, असा याचा अर्थ घ्यावा का?
- योगेंद्र यादव
(अध्यक्ष, सदस्य, स्वराज इंडिया जय किसान आंदोलन )
मतदानाचा दिवस पार पडलेला असेल आणि अख्ख्या जगाला तिथे काय निकाल लागतो, याची उत्सुकता असेल. राजकारणाच्या विद्वान अभ्यासकांच्या मते यावेळची लढत भलतीच चुरशीची आहे. दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनू पाहणारे रिपब्लिकन पक्षाचे ट्रम्प आणि अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रथमच उतरलेल्या डेमोक्रॅटिक उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस या दोघांनाही जवळपास सारखीच म्हणजे प्रत्येकी ४५ % मते पडण्याची दाट शक्यता आहे. कमला हॅरिस यांना २ ते ३ % अधिक मते मिळाली, तरी अमेरिकेची विचित्र निवडणूक पद्धत पाहता त्यांच्या पराभवाची शक्यताही व्यक्त केली जाते आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा हटवादी माणूस जगातील सर्वाधिक शक्तिशाली देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी आला, तर किती अनर्थ होईल याची चिंता अनेकांना लागून राहिली आहे.
सगळ्यात उत्तम है की, 'बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना' मुळीच न बनता आपण लांबूनच या निवडणुकीचे सखोल निरीक्षण करावे आणि काही धडे घ्यावेत. या निवडणुकीच्या धुमश्चक्रीच्या निमित्ताने अमेरिकन स्वप्नावरचा सोनेरी पडदा दूर होऊन तेथील नग्न वास्तव समोर आलेच आहे. या परिस्थितीचा फायदा घेऊन, साऱ्या दुनियेला लोकशाहीचे धडे शिकवणाऱ्या, या 'स्वप्निल स्वर्गा'चे सत्य रूप न्याहाळण्याची नामी संधी आपण हातची गमावू नये.
सर्वप्रथम दिसतील आदरणीय डोनाल्ड ट्रम्प। अर्धी अमेरिका त्यांच्या बाजूने उभी आहे. गोऱ्या पुरुषांमधले अर्ध्याहूनही जास्त मतदार त्यांचे पाठीराखे आहेत. त्यात इलॉन मस्क यांच्यासारख्या धनदांडग्यांचा समावेश आहे. हे महाशय करू धजावणार नाहीत, असे दुष्कर्म दुनियेत अस्तित्वातच नाही. बांधकाम व्यवसायात त्यांनी ६६० कोटी डॉलर्सचे साम्राज्य उभारले आहे. ते टॅक्स घोटाळ्यात अडकलेत. फसवेगिरी आणि द्वेषाचाही धंदा ते खुलेआम चालवतात. गौरेतर स्थलांतरितांबद्दल उघडउघड अफवा पसरवतात. नुकतेच ते म्हणाले की, अमेरिकेत आलेले मेक्सिकन स्थलांतरित कुत्रे व मांजरे मारून खात आहेत. हे खोटे असल्याचे उघड झाले. पण, खरे आणि खोटे यात भेदभाव करण्याचा ट्रम्परावांचा मुळी स्वभावच नाही. अमेरिकेतील माध्यमे त्यांच्या लबाडीला लबाडी म्हणण्यात हयगय करत नाहीत. स्त्रियांच्या बाबतीत ते जाहीरपणे अश्लील टिप्पण्या करीत असतात. व्यापारात, अध्यक्षीय कार्यालयात आणि पक्षात त्यांच्यासमवेत काम करणारी असंख्य माणसे त्यांची लबाडी, दुष्टभाव, मूर्खपणा, उर्मटपणा आणि निर्लज्जपणा यांना वैतागून त्यांची साथ सोडून गेलेली आहेत. २०२० ची राष्ट्राध्यक्ष निवडणूक हरल्यानंतर, ट्रम्पनी आपल्या समर्थकांना राजधानी आणि संसदगृहावर हल्ला करायची चिथावणी दिली आणि अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच लोकशाही सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न केला. एकंदरीत अशी प्रतिमा असलेला हा माणूस, सार्वजनिक जीवनात आजवर टिकून राहिलाच कसा, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडेल.
हा प्रश्न तुम्हाला या मंचाच्या दुसऱ्या बाजूला घेऊन जाईल. तिथे दिसतील एक्याऐंशी वर्षांचे वृद्ध जो बायडेन. स्वतःतच हरवल्यासारखे वाटणारे, लडखडत्या चालीचे आणि अडखळत्या बोलीचे हे सद्गृहस्थ आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. जगातील सर्वात शक्तिमान सैन्याचे घटनात्मक प्रमुख आहेत. परवा परवापर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवारही तेच होते. टीव्हीवरच्या चर्चेत भांडे फुटल्याने त्यांना अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर व्हावे लागले.
आणि ट्रम्प यांच्याशी लढा देणाऱ्या कमला हॅरिस. त्यांची आई मूळची तमिळी भारतीय. वडील जमैकन. कमला गौरेतर आहेत, उच्चशिक्षित आहेत. बोलण्यात चटपटीत आहेत. मात्र, त्यांची ही पार्श्वभूमी पाहून त्यांना भारत किंवा तिसऱ्या जगातील गौरेतरांबद्दल खास सहानुभूती असेल, या भ्रमात आपण राहू नये. याबाबतीत त्या अमेरिकेच्या मुख्य प्रवाहातील राजनीतीच्याच प्रवक्ता आहेत. जगभरात चालू असलेल्या अमेरिकन दादागिरीच्या पाठीराख्या आहेत. त्यांच्यावर काही वाईट केल्याचा आरोप झालेला नाही, काही चांगले केल्याचा इतिहासही त्यांना नाही. अमेरिकन जनेतेसमोर पर्याय आहे तो हा असा उर्वरित जगाच्या काठावर बसून अमेरिकन निवडणुकीकडे पाहिले, तर लक्षात येते की, 'कोण जिंकणार' हा प्रश्न मुळीच महत्त्वाचा नाही. अमेरिकन निवडणूक याच स्वरूपाच्या पर्यायात का सीमित झाली आहे, हा खरा प्रश्न आहे. ट्रम्पसारखा माणूस दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनण्याच्या इतक्या जवळ येऊच कसा शकला? अमेरिकन समाज असा झर्रदिशी पतित झाला की, अमेरिकी समाजाचे पूर्ण सत्य पाहण्याची ही संधी जगाला अकस्मात लाभली? ट्रम्प हे सर्वसाधारण अमेरिकन माणसाच्या लपवलेल्या, दडपलेल्या वैफल्यग्रस्ततेचे आणि अमेरिकेच्या खऱ्याखुऱ्या स्वभाव वैशिष्ट्याचेच मूर्तरूप तर नसेल? की वंदनीय नेत्यांच्या प्रभावातून बाहेर पडून साधारण नेत्यांच्या कच्छपी लागण्याचे नवे युग आता सगळ्या जगातच सुरू झालेले आहे?