विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 07:59 AM2024-11-23T07:59:16+5:302024-11-23T08:00:16+5:30

एकटे असाल, तर ‘जेवायला या’ असे आमंत्रण देऊन अमेरिकेत नवी चळवळ उभी राहते आहे. त्यानिमित्ताने एकेकट्या माणसांच्या नव्या संघर्षाची गोष्ट!

Featured Article: 'Project Gather': An 'American' Solution to Loneliness | विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय

विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय

संजीव साबडे, ज्येष्ठ पत्रकार
तुम्ही एकटे वा एकाकी आहात का?  तुम्हाला जवळचा एकही मित्र नाही? गप्पा मारायला कोणी नाही?  जेवताना कोणाची सोबत नाही?   व्यसने वाढली आहेत? रात्री झोप येत नाही? तुम्ही कोणत्याही वेळेस, काहीही खाता?  अचानक रक्तदाब, मधुमेह, हृदरोग बळावले आहेत? टीव्ही बघायचा,  वाहन चालवायचा, फोनवर  वा ऑफिसात सहकाऱ्यांशी बोलायचा कंटाळा येतो? 
- असे वाटत असेल, तर ‘जेवायला या.’ तिथे तुमच्यासारखीच अवस्था असलेले अनेकजण असतील. उत्तम जेवण आणि एकाकीपण दूर करण्याच्या पाककृतीही तिथे असतील. घरात बसून कुढत राहण्यापेक्षा रेस्टॉरंटमध्ये सहभोजन करू. एकमेकांशी ओळख करून घेऊ,  सुख-दुःखाच्या गोष्टी एकमेकांना सांगू,  नव्याने नवे मित्र शोधू. स्वतःचा इतरांशी थांबलेला संवाद इथे सुरू होईल. हा संवाद, गप्पा, विनोद हीच तुमचा एकाकीपणा दूर करण्याची मस्त पाककृती आहे.   

...हे सारे विचित्र वाटते ना?  एकाकीपणाचा आजार दूर करण्याचा हा अभिनव मार्ग अमेरिकेचे सर्जन जनरल डॉ. विवेक मूर्ती आणि समाजकार्यात सक्रिय असलेले प्रख्यात शेफ जोस अँड्रेस यांनी शोधून काढला आहे. या प्रकल्पाचे नाव ‘प्रोजेक्ट गॅदर.’  सहभोजनासाठी एकत्र येण्याच्या मार्गाने काही कोटी अमेरिकन लोकांचा एकाकीपणा दूर होईल, अशी खात्री त्यांना वाटते आहे. 

सोबतीला चार दिवस कोणी नसेल वा कोणी बोलणारे नसेल तर वेड लागायची पाळी येते. सतत काही तरी चुकल्यासारखे वाटते. हे एकटे एकाकीपण खूपच त्रासदायक. आपल्याशी बोलणारे, आपली चौकशी करणारे, जेवायला वाढणारे कोणी नाही. गप्पा माराव्यात असे कोणी नाही, पैसा आहे, घरात टीव्ही, मोबाइल, एसी वगैरे सुविधा आहेत, कारही आहे; पण कोणाकडे जावेसे वाटत नाही, फोनवर बोलावेसे वाटत नाही आणि टीव्हीवरील कार्यक्रम वा बातम्या पाहण्यात रस वाटत नाही. यात डिप्रेशन म्हणजे नैराश्य आहे. आपण एकाकी आहोत ही  भावना आहे. या भावनेतून नैराश्य येते, व्यसने सुरू होतात, ती वाढतात, भूक नसूनही खात राहतो, त्यातून वजन वाढते आणि मग सुदृढ व्यक्तीलाही मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग असे आजार होऊ लागतात. अनेकदा आत्महत्येची भावनाही बळावते. आजच्या घडीला अमेरिकेत नेमकी हीच स्थिती आहे. जगभरात लोकांचे एकाकीपण आणि त्यातून अन्य आजार वाढत आहेत.  

अमेरिकेत ४८ टक्के लोक एकाकी आहेत. त्यात आशियाई तसेच अन्य देशांतील लोकांची संख्या मोठी असली तरी मूळ अमेरिकनही या आजाराने ग्रस्त आहेत. सुमारे १२ टक्के अमेरिकन लोकांना एकही मित्र नाही, चार-सहा महिने  घराबाहेर न पडणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड आहे. सुमारे २५ टक्के लोकांना रोज एकटेच जेवावे लागते.  

१८ ते २२ वयोगटातील एकाकी तरुणांचे प्रमाण मोठे आहे. अमेरिकेत या वयाची मुले स्वतःच्या पायावर उभी राहण्यासाठी घराबाहेर पडतात आणि मनासारखे काहीच होत नसल्याने एकाकी होतात. बेरोजगारी, योग्य व वेळेत नोकरी न मिळणे, उच्चशिक्षणासाठीचा आर्थिक त्रास आणि भावनिक गुंतवणुकीविना शरीरसंबंध हीही एकाकीपणाची कारणे आहेत. त्यांचे ४० ते ५० वयोगटातील किंवा अधिक वयाचे आई-बाप संवाद नसल्याने एकाकी होत आहेत. 

यावर संशोधन करून लोकांनी एकत्र येणे, सहभोजन कारणे हा चांगला उपाय आहे,  असे डॉ. मूर्ती यांच्या लक्षात आले. त्यासाठीच्या त्यांच्या ‘प्रोजेक्ट गॅदर’ उपक्रमात जोस अँड्रेस आणि अन्य हजारो लोक व डॉक्टर जोडले जात आहेत. एकाकीपणा ही साथ वा महामारी असून, तिचा एकत्र येऊन सामना करायला हवा, असे डॉ. मूर्ती म्हणतात. 

भारतात कुटुंबव्यवस्था, नातेसंबंध बऱ्यापैकी टिकून आहेत, घरात काही पदार्थ केला की शेजाऱ्याकडे तो नेऊन देण्याची पद्धत आहे. ऑफिसमधील सहकारीही आपल्याकडे मित्र-मैत्रीण बनतात. अमेरिकेइतकी एकाकीपणाची समस्या भारतात नसली तरी वृद्धांमध्ये नैराश्य, एकाकीपण, अस्वस्थता, मुलांनी घरात डांबल्याने वा वृद्धाश्रमात सोडल्याने भीती आणि त्यातून विस्मरणाचे आजार वाढत आहेत. 

अनेकांची मुले शिक्षण-नोकरीसाठी परदेशात असल्याने पालक एकटे, एकाकी झाले आहेत. युरोप, जपान, चीन, दक्षिण आशियातील देशांमध्येही एकाकीपणा शिरू लागला आहे. चीनमध्ये आनंदाचा अभाव, अतिनिर्बंध, पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे कमी प्रमाण, वृद्धांची वाढती संख्या ही त्याची कारणे आहेत. कामाच्या दबावामुळे चीनमध्ये तर सतत कामात व्यग्र राहण्याच्या सवयीमुळे जपानमध्ये एकाकीपणा वाढला आहे.  

कामाच्या वाढलेल्या वेळा, मित्र, घर, मुलांसाठी वेळ न देता येणे, शारीरिक, मानसिक थकवा, नोकरी टिकण्याची नसलेली शाश्वती यांमुळे एकाकीपण वाढत आहे. अनेक देशांत एकाकीपण दूर करण्यासाठी संवादक, टोल फ्री क्रमांक आहेत. ब्रिटनमध्ये त्यासाठी मंत्रालय सुरू झाले आहे. 

आपल्या शेजारीही एकाकी लोक असल्यास त्यांना बोलते करणे, त्यांच्या संपर्कात राहणे, त्यांना घरी बोलावणे अशा मार्गांनी त्यांना आपल्या परीने मदत शक्य आहे. अर्थात आपण एकाकी आहोत, लोकांपासून तुटत आहोत, हे जाणवताच स्वत:च या आजारातून बाहेर पडण्यासाठी वैद्यकीय सल्ला व मित्रांचे साह्य घ्यायला हवे. अन्यथा परिस्थिती बिकट आहे. 
sanjeevsabade1@gmail.com

Web Title: Featured Article: 'Project Gather': An 'American' Solution to Loneliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.