विशेष लेख: भ्रमिष्ट झालेल्या मुंगीचे शरीर एकाक्षणी फुटते, आणि...

By Shrimant Mane | Published: January 21, 2023 10:40 AM2023-01-21T10:40:31+5:302023-01-21T10:40:53+5:30

कल्पनाविलासाची झेप ब्रह्मांडापलीकडची. आजच्या काल्पनिक विज्ञानकथा हे उद्याचे वास्तव! जगाच्या सर्वनाशाचे भाकित करणाऱ्या भयावह कल्पनांचा धांडोळा.

Featured article The disillusioned ant's body explodes in an instant | विशेष लेख: भ्रमिष्ट झालेल्या मुंगीचे शरीर एकाक्षणी फुटते, आणि...

विशेष लेख: भ्रमिष्ट झालेल्या मुंगीचे शरीर एकाक्षणी फुटते, आणि...

Next

श्रीमंत माने

इवलीशी मुंगी, तिचा तसाच डोळ्यांना न दिसणारा मेंदू. एक बुरशी तिच्या शरीरात प्रवेश करते. मेंदूत शिरते. मेंदूचा ताबा घेते. अशा मुंग्या नित्यनेमाने घराकडे येत नाहीत. भ्रमिष्ट होऊन कुठेतरी झाडांच्या पानांवर कोपऱ्यात बसून राहतात. खाद्य म्हणून वनस्पतीच्या पानाला डंख मारला की जबडा ठप्प होतो. तिथेच मुंगीचा जीव जातो. मग, बुरशी प्रसरण पावत जाते व एका क्षणी मुंगीचे शरीर फुटते. त्यात मग बीजाणू जिवाणू, विषाणू जे काही असेल त्याचा इतर मुंग्यांना संसर्ग होतो. अख्खा समूह असाच मरतो. हे कसे घडते ते डेव्हिड अॅटनबरो यांनी बीबीसीच्या प्लॅनेट अर्थमध्ये दाखविले होते. या झाँबी बुरशीचे नाव आहे कॉर्डिसेप्स. पावणेदोनशे वर्षांपूर्वी, १८५९ मध्ये आल्फ्रेड • रसेल यांनी विषुववृत्तीय जंगलात ती शोधली. वनस्पतीच्या पानावर जिवाश्माच्या रूपात ती सापडली. आणि त्यावर मुंगीने घेतलेल्या चाव्याचे व्रण होते तब्बल ४ कोटी ८० लाख वर्षे जुने.

परजीवी झाँबी बुरशीने मेंदूवर असा ताबा मिळविण्याच्या आणि यजमान सजीवाला भ्रमिष्ट करून त्याचा जीव घेण्याच्या वास्तवातील विज्ञानाला कल्पनेचे पंख फुटले. कीटक नव्हे, तर माणसांनाच ही बुरशी घेरते. संसर्ग झालेला माणूस इतरांना चावा घेत सुटतो व अख्खी मानवजात संपुष्टात येते, ही ती कल्पना. तिच्यावर बेतलेला 'लास्ट ऑफ अस' या टीव्ही गेम सिरीजचा पहिला भाग एचबीओने २०१३ मध्ये आणला. सर्वाधिक यशस्वी गेम सिरीजपैकी एक असा तिने लौकिक मिळविला. गेल्या रविवारी 'लास्ट ऑफ अस'च्या दुसऱ्या भागाचा प्रिमिअर झाला. 'अपोकॅलिक्टिक वर्ल्ड' म्हणजे जगाचा विनाश, सर्वनाश असे या गेम सिरीजचे भीतीदायक सूत्र आहे. वास्तवात 'कॉर्डिसेप्स ब्रेन इन्फेक्शन' (सीबीआय) मुंग्यांसारखे कीटक वगळता इतर सजीव अथवा माणसांसारख्या सस्तन प्राण्यांमध्ये कधीही शक्य नाही. झाँबी बुरशीत माणसांमध्ये केमिकल लोचा करण्याचा रेबिजसारखा गुणधर्मच नाही. अशी फंगल पॅन्डेमिक अर्थात बुरशीजन्य महामारी पृथ्वीतलावर तेरा कोटी वर्षांत कधी झालेली नाही. म्हणून 'लास्ट ऑफ अस'मुळे भयभीत होण्याची गरज नाही, असे बुरशीतज्ज्ञ काकुळतीला येऊन- -सांगायला लागले आहेत.

अर्थात, हे झाले निसर्गदत्त वास्तव व त्यावर आधारित कल्पनांचे. माणसांनी लावलेल्या शोधांचे मात्र वेगळे आहे. कल्पनाविलासाची झेप ब्रह्मांडापलीकडे जाते. म्हणूनच आजच्या काल्पनिक विज्ञानकथा उद्याचे वास्तव असते. कोरोना महामारीने जग विळख्यात घेण्याच्या दहा वर्षे आधी, २०११ मध्ये कंटेजन सिनेमा आला. चीनच्या मांस बाजारात वटवाघळाच्या माध्यमातून एक विषाणू मानवी शरीरात संक्रमित होतो, जग अभूतपूर्व महामारीचा सामना करते आणि महत्त्वाचे की हे संकट एका षड्यंत्राचा भाग असते, हे तंतोतंत त्या सिनेमात दाखवले गेले. अंतराळातील माणसांच्या झेपेचेही भाकित विज्ञानलेखक, सिनेनिर्मात्यांनी आधीच केले. अंतराळातील सुरक्षेची तयारी म्हणून गेल्या सप्टेंबरमध्ये नासाने एक यान धुमकेतूवर आदळविले. त्याची छायाचित्रे पृथ्वीवर पोहोचली. जवळपास शंभर वर्षांपूर्वी, १९३० मध्ये एडमंड हॅमिल्टन यांनी ही कल्पना लिहून ठेवली होती. नील आर्मस्ट्राँग व एडवीन ऑल्ड्रीन यांनी २० जुलै १९६९ रोजी चंद्रावर पाऊल ठेवण्यापूर्वीच १९६६ मध्ये पहिली 'स्टार 

'ट्रेक' मालिका प्रसारित झाली होती. त्याच्या दोन वर्षे आधी ‘फर्स्ट मेन इन द मून' चित्रपट आला होता. त्याही आधी. १९५० मध्येच 'डेस्टिनेशन मून' हा सिनेमा आला होता. डेस्कटॉप कॉम्प्युटरपासून सेलफोन व झूम मिटिंगपर्यंत व त्याही पुढे ॲमेझॉनच्या अलेक्सापर्यंत विज्ञानाच्या आजच्या आविष्कारांची प्रेरणा मूळ 'स्टार ट्रेक' मालिका मानली जाते. आता इलॉन मस्कसारखे दिग्गज खासगी अंतराळ मोहिमा काढतात तेव्हा विस्मय वाटतो. पण, महान विज्ञान कथालेखक रॉबर्ट हेनलिन यांनी १९५० च्या आधीच 'मॅन हू सोल्ड द मून' ही कादंबरी लिहिली होती... तेव्हा, 'लास्ट ऑफ अस'मधून श्रील मिळवायचे आणि 'फर्स्ट ऑफ अस' बनून कल्पनाविश्वात रमायचे.

कार्यकारी संपादक, लोकमत, नागपूर
shrimant.mane@lokmat.com

 

Web Title: Featured article The disillusioned ant's body explodes in an instant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.