'बिग बॉस' मोदी अन् त्यांचे 'बिग फोर'; काय आहे 'या' चौकडीची खास बात!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 04:34 PM2019-05-31T16:34:41+5:302019-05-31T17:51:35+5:30
पूर्वी स्वतंत्र असलेली काही खाती एकाच मंत्रालयात विलीन केली आहेत.
- प्रशांत दीक्षित
लोकसभा निवडणुकीतील विजयाची मोदींना खात्री असली तरी इतका मोठा विजय मिळेल असे त्यांनाही अनपेक्षित नसावे. एकट्या भाजपाला ३००हून अधिक जागा मिळाल्याचा मोदी-शहा यांना आनंद वाटत असला तरी अशा मोठ्या विजयाचे ओझेही असते. मोदींच्या देहबोलीत ते ओझे जाणवत आहे. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत तर राजीव गांधींसारखी आपली अवस्था होईल याची कल्पना या दोघांना आहे.
मंत्रिमंडळाची रचना व खातेवाटप यावर हे विजयाचे ओझे जाणवते. मोदींनी यावेळी मंत्रिमंडळाच्या रचनेमध्ये बदल केले आहेत. पूर्वी स्वतंत्र असलेली काही खाती एकाच मंत्रालयात विलीन केली आहेत. उदाहरणार्थ, कृषी खात्यामध्येच आता पंचायत राज, ग्रामविकास, शेतकरी कल्याण ही खाती विलीन केली आहेत. असाच प्रकार अन्य काही खात्यांबाबत करून मंत्रिमंडळ सुटसुटीत करण्याचा प्रयत्न केला आहे. नीती आयोगाच्या एका अहवालात ही सूचना करण्यात आली होती. एकच उद्दिष्ट असलेली खाती एकत्र आणली तर त्याचा अर्थवृद्धीसाठी उपयोग होईल असे नीती आयोगाचे म्हणणे होते. मोदी यांनी ते मान्य केले आहे.
गृह, अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्र यांना दिल्लीत बिग फोर म्हणतात. यामध्ये पक्षसंघटना व बुद्धीमत्ता याना एकत्रित करण्यात आले आहे. हा महत्वाचा बदल आहे. गृहमंत्री अमित शहा यांचे पक्षावर नियंत्रण आहे, तसेच त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. खेड्यापाड्यातील लोकांना काय हवे आहे याची अद्ययावत माहिती त्यांच्याकडे असते. राजनाथ सिंह यांचा अनुभव मोठा आहे व पाच वर्षे गृहखाते सांभाळल्यामुळे प्रशासनाचा अनुभव आहे. या दोघांमुळे निर्णय प्रक्रियेवर संघटनेचे वर्चस्व राहिल. मात्र धाडसी निर्णय घेण्यासाठी वेगळी बुद्धीमान माणसे लागतात.
निर्मला सीतारामन आणि जयशंकर यांच्या प्रवेशामुळे ती तूट भरून निघेल. दोघेही जेएनयूचे विद्यार्थी आहेत. सीतारामन यांनी संरक्षण खाते सांभाळले होते. आता त्या अर्थमंत्री असतील. संरक्षण व अर्थ खात्यांमध्ये नेहमी वाद सुरू असतो. संरक्षण जास्त निधीची मागणी करते व अर्थखाते ती टोलवते. यावेळी राजनाथसिंह हे वरिष्ठ नेते संरक्षण खात्यात असतील व पूर्वी संरक्षण खाते सांभाळणार्या सीतारामन या अर्थमंत्री असतील. यामुळे हा ताण कमी होईल. राष्ट्रवाद व देशाचे संरक्षण हा निवडणुक प्रचारात मोदींचा मुख्य मुद्दा होता. संरक्षण दल अद्ययावत करणे, नवी सामुग्री घेणे अशा संरक्षणाशी संबंधीत अनेक महत्वाच्या बाबींवर एकत्रित काम होईल.
निर्मला सीतारामन या भाजपा प्रवक्त्या म्हणून देशासमोर आल्या. संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी चांगले काम केले. पदव्युत्तर अभ्यासात आंतरराष्ट्रीय व्यापार हा त्यांचा संशोधनाचा विषय होता. अर्थशास्त्रात त्यांना गती आहे. भाषेवर प्रभुत्व आहे. अर्थ वर्तुळातील मान्यवरांजवळ तसेच आंतरराष्ट्रीय परिषदेत त्या जेटली यांच्याप्रमाणेच बोलू शकतात. महिलेला अर्थमंत्री केल्याचा वेगळा परिणाम देशात पाहायला मिळेल.
महत्वाची नेमणूक एस जयशंकर यांची आहे. त्यांची कारकिर्द मोठी आहे. परराष्ट्र मंत्री म्हणून ते अत्यंत लायक व्यक्ती आहेत. सुषमा स्वराज यांनी हे खाते चांगले सांभाळले होते व त्या लोकप्रियही होत्या. मात्र जयशंकर यांना परराष्ट्र व्यवहारातील प्रत्यक्ष डावपेचांची चांगली माहिती आहे. रशिया, वॉशिंग्टन, बिजींग अशा सध्याच्या जगातील महत्वाच्या शक्तीकेंद्रांवर त्यांनी काम केले आहे. अन्य अनेक देशांतील त्यांची कामगिरी वाखाणली गेली आहे. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून जयशंकर यांच्याशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते. अमेरिकेने मोदींचा व्हिसा रद्द केला. पंतप्रधान झाल्यावर मोदींना तो पुन्हा मिळाला. मोदींचा पहिला अमेरिकन दौरा बराच गाजला. तो यशस्वी करण्यात जयशंकर यांचा वाटा महत्वाचा होता. भारताच्या अणुकार्यक्रमातही त्यांची भूमिका महत्वाची राहिली आहे. अनेक राष्ट्रप्रमुखांशी त्यांचा थेट संबंध आहे. त्यांचे वडिल सुब्रह्मण्यम हे नावाजलेले सामरिक सल्लागार होते.
अमित शहा यांची निवड ही दिल्लीमध्ये अपेक्षित होती. अमित शहा यांच्याकडे अर्थ खाते जाईल असे काल बोलले जात होते. पण ते गृहमंत्री होतील हे जाणकारांना माहित होते. अमित शहा यांनी निवडणूक लढवून लोकसभेत यावे व गृहमंत्री बनावे ही मोदींची इच्छा होती. अमित शहांचा स्वभाव हा अर्थमंत्री पदापेक्षा गृहमंत्री पदासाठी योग्य आहे. एक प्रकारे अमित शहा यांना वरच्या पायरीवर नेण्याचा हा प्रयत्न आहे. किंवा पंतप्रधान पदासाठी त्यांची जडणघडण सुरू झाली आहे. गृहमंत्री पद हे ताकदवान पद आहे. देशातील व राज्यातील अनेक बाबी गृहखात्याशी संबंधीत असतात.
साधारणपणे राजकीयदृष्ट्या कमकुवत व्यक्तीकडे हे पद देण्याचा पंतप्रधानांचा कल असतो. कारण गृहमंत्री कधीही डोईजड होऊ शकतो. इथे तसे झालेले नाही. शहा हे राजकीयदृष्ट्या ताकदवान व्यक्तिमत्व आहे. शहा यांचा मुख्य गुण म्हणजे ते टास्क मास्टर आहेत. अडचणींची पर्वा करीत नाहीत. त्याहून महत्वाचे म्हणजे संघ परिवाराच्या विचारधारेवर शहांची पूर्ण निष्ठा आहे. सरदार वल्लभभाई पटेल व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर शहा यांची श्रध्दा आहे. याच दोन नेत्यांची पोर्टेट त्यांच्या कार्यालयात आहेत. ही वैचारिक वीण महत्वाची आहे. वैचारिक निष्ठा पक्की असणारा मंत्री आजपर्यंत गृहमंत्रालयाला मिळाला नव्हता.
यातील आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे भाजपच्या जाहीरनाम्यातील राम मंदिर, कलम ३७०सारखे महत्वाचे मुद्दे हे गृहमंत्रालयाच्या अखत्यारित येतात. केंद्र-राज्य संबंध हे गृहमंत्रालय हाताळते. निवडणुका लढविताना गृह मंत्रालयाचे काम अतिशय महत्वाचे असते. पश्चिम बंगाल व दिल्लीतील निवडणुका मोदींसाठी महत्वाच्या आहेत. शहांच्या हाती गृहमंत्रीपद असणे हे त्यावेळी मोलाचे ठरेल. गृहखात्यामुळे संपूर्ण प्रशासनावर पकड येते. गृहमंत्री म्हणून ते पक्ष यंत्रणेवरही लक्ष ठेऊ शकतात. शिवाय विरोधी पक्षांवर सुरू असलेल्या विविध खटल्याचे नियंत्रण आता अमित शहा यांच्याकडे येईल.
राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेली काही प्रकरणे राजनाथसिंह पुरेशा कठोरपणे हाताळत नाहीत अशी अमित शहा यांची तक्रार असे. केवळ लोकसभेतील संख्याबळ सरकारला स्थिरता देत नाही. सरकार स्थिर व कणखर असल्याचा प्रत्यय कारभारातून यावा लागतो. तेथे गृहमंत्रालय महत्वाची भूमिका बजावते. अंतर्गत सुरक्षा, दहशतवाद रोखण्याच्या कारवाया, नक्षलवादाचे उच्चाटन, अशा अनेक संवेदनशील बाबी अमित शहा यांना हाताळाव्या लागतील. या सर्व विषयांबाबत संघ परिवाराची मते ठाम आहेत.
राजनाथसिंह हे संघ परिवारातील असले तरी अडवाणी-वाजपेयी यांच्या प्रभावाखालील होते. शहा तसे नाहीत.
आणखी एक महत्वाचा बदल म्हणजे नितीन गडकरींकडे मध्यम व लघु उद्योग या खात्याची अधिकची जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी फार महत्वाची आहे. कारण अर्थव्यवस्थेला गती ही मध्यम व लहान उद्योगातूनच मिळेल यावर अर्थतज्ज्ञांचे जवळपास एकमत होत आहे. सर्वात जास्त रोजगारही याच क्षेत्रातून येतात. नोटबंदी व जीएसटी या धोरणांचा फटका याच क्षेत्राला बसला.
गडकरी यांची धडाडी नावाजलेली आहे. तेही टास्क मास्टर आहेत. लहान उद्योगांना गती देण्यात ते यशस्वी ठरले तर ते मोलाचे योगदान ठरेल. गडकरी स्वतः उद्योजक असल्याने कायद्याच्या जाळ्यातून या उद्योगांना ते बाहेर काढतील. नोकरशाहीला व अन्य प्रभावांना बाजूला टाकून काम करण्याची कला त्यांना अवगत आहे. रस्ते विकासाबरोबर लहान व मध्यम उद्योगांना वर आणण्याची मोठी जबाबदारी नरेंद्र मोदींनी नितीन गडकरींवर टाकली आहे.
मोदी-०२ या सरकारच्या मंत्रिमंडळाचे मुख्य स्वरुप असे आहे.
(पूर्ण)