‘कावीळ’ग्रस्त व शिंदेंचा सत्कार

By Admin | Published: July 28, 2016 04:19 AM2016-07-28T04:19:15+5:302016-07-28T04:19:15+5:30

क्षेत्र कुठलेही असो, आपल्या गावाची ओळख देशभर निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान भूमिपुत्राचा अभिमान त्या गावातील प्रत्येक माणसाला असतो. याला अपवाद ठरतात ते वैचारिक, सामाजिक

Felicitated 'jaundice' and Shindon | ‘कावीळ’ग्रस्त व शिंदेंचा सत्कार

‘कावीळ’ग्रस्त व शिंदेंचा सत्कार

googlenewsNext

- राजा माने

क्षेत्र कुठलेही असो, आपल्या गावाची ओळख देशभर निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान भूमिपुत्राचा अभिमान त्या गावातील प्रत्येक माणसाला असतो. याला अपवाद ठरतात ते वैचारिक, सामाजिक आणि राजकीय ‘कावीळ’ जडलेले मूठभर लोक. सध्या नेमक्या याच काविळीने सोलापूरचे भूमिपुत्र सुशीलकुमार शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त महापालिकेच्या वतीने होणाऱ्या नागरी सत्कार व मानपत्र प्रदान सोहळ्यास खोडा घातला जात आहे.
संपूर्ण देशात आपल्या गावाची ओळख निर्माण करून देणाऱ्या भूमिपुत्राचा अमृतमहोत्सवी वाढदिवस हा त्या व्यक्तिमत्त्वाला सलाम करण्याचा आणि त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करण्याचा असावा ही आपली संस्कृती. पण नेहमी संस्कृतीच्या गप्पा मारणारेच या संस्कृतीला विसरले आहेत.
महापालिका हे जनतेचे सभागृह मानले जाते. त्याच कारणाने महापालिकेच्या वतीने होणारा सोहळा हा तिथल्या जनतेचा सोहळा असतो. राज्यात सुशीलकुमार शिंदे यांचा अमृतमहोत्सव साजरा व्हावा, अशी भावना घेऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रेम करणारे सर्वच क्षेत्रातील मान्यवर काही महिन्यांपूर्वीपासून कामाला लागले. मुंबई-दिल्लीत मोठा सोहळा व्हावा, असा त्यांचा मानस होता. त्यात प्रातिनिधिक स्वरूपात माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्याकडे पुढाकाराची सूत्रे देण्यात आली.
‘मी आज जो काही आहे ते सोलापुरातील ढोर गल्लीपासून सुरू झालेल्या माझ्या प्रवासातील प्रत्येक वळणावर साथ देणाऱ्या सोलापूरकरांमुळे आहे. त्यामुळे देशातील कुठल्याही सत्कारापेक्षा सोलापूरकरांचे प्रेम मला महत्त्वाचे आहे’, अशी भूमिका सुशीलकुमार शिंदे यांनी घेतली. सोलापूरची महापालिका आज काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. साहजिकच काँग्रेसच्या महापौर सुशीलाताई आबुटे, सभागृह नेते संजय हेमगड्डी, गट नेते पद्माकर काळे, उप महापौर प्रवीण डोंगरे, माजी महापौर यु.एन.बेरिया, यांच्यासह सत्ताधारी नगरसेवकांनी महापालिकेच्या वतीने नागरी सत्कार व्हावा यासाठी पाठपुरावा केला. महापालिकेच्या सभागृहात सर्वपक्षीय नगरसेवकांनी तसा एकमताचा ठरावही केला.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, सोनिया गांधी यांच्यासह राष्ट्रीय पातळीवरील अनेक नेत्यांचे चार सप्टेंबरच्या कार्यक्रमासाठीचे सोलापूर दौरेही निश्चित झाले. या पार्श्वभूमीवर सोलापुरात भाजपा-सेना यांच्यासह कॉ. आडम मास्तर यांनी कार्यक्रमाच्या खर्चाच्या मुद्यावरून सत्कार सोहळ्याला ब्रेक लावण्याचा प्रयत्न सुरू केला होता. अनाठायी खर्च आणि उधळपट्टी याचे समर्थन कोणीही करणार नाही. परंतु खर्चाचे निमित्त करून नेहमीची राजकीय धुणी धुण्याचा प्रयत्न कुणी करू लागले तर मात्र ते ओंगळवाणे ठरेल.
राज्यपाल, मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, संसदीय काँग्रेस पक्षाचे नेते या उच्च पदांपर्यंत पोहोचणे सोपे आहे काय? त्या पदांपर्यंत सुशीलकुमार शिंदे आपल्या कर्तृत्वाने पोहोचले! एक अजातशत्रू अशी त्यांची प्रतिमा आहे. राष्ट्रीय पातळीवर त्यांनी बजावलेल्या अनेक भूमिकांबद्दल त्यांचा गौरवच केला जातो.
अतिरेक्यांना फाशी देण्याच्या निर्णयावेळी केन्द्रीय गृहमंत्री म्हणून त्यांनी दाखविलेला कणखरपणा असो वा देशात पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात दलित-आदिवासींपासून कुडमुड्या जोशींचा अंतर्भाव करताना त्यांनी मुख्यमंत्री म्हणून दाखविलेली सामाजिक कणव असेल, असे अनेक संदर्भ सर्वच क्षेत्रातील लोकांना अभिमानाचे वाटत आले आहेत.
विविध क्षेत्रात नाव कमावणारी उत्तुंग व्यक्तिमत्त्वं ही त्या गावाची सामाजिक संपत्ती व ठेवा असतात. तो ठेवा जतन करण्याची जबाबदारी सर्वांचीच असते. शिंदेंच्या नागरी सत्काराच्या निमित्ताने त्या जबाबदारीची जाणीव कावीळग्रस्तांना आणि त्यांच्या बोलवित्या धन्यांना कोण आणि कशी देणार? ती जाणीवच काविळीवर जालीम उतारा ठरेल !

 

Web Title: Felicitated 'jaundice' and Shindon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.