‘सेज’ने दखल घेतलेल्या मानसशास्त्रातील दिग्गजांचा सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 04:51 AM2019-01-30T04:51:29+5:302019-01-30T04:53:56+5:30
‘सेज’ या आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्थेने एक आढावा घेऊन भारतातील शिक्षण व संशोधनावर प्रभाव टाकणारे ५९ मानसशास्त्रज्ञ निवडून त्यांच्या कार्याचा आढावा घेणारे पुस्तक प्रसिद्ध केले. या ख्यातनाम प्राध्यापकांमध्ये पुण्यातील प्राध्यापकांचा समावेश आहे.
- प्रकाश तुळपुळे
‘सेज’ या आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्थेने एक आढावा घेऊन भारतातील शिक्षण व संशोधनावर प्रभाव टाकणारे ५९ मानसशास्त्रज्ञ निवडून त्यांच्या कार्याचा आढावा घेणारे पुस्तक प्रसिद्ध केले. या ख्यातनाम प्राध्यापकांमध्ये पुण्यातील प्राध्यापकांचा समावेश आहे. त्यांचा सत्कार समारंभ माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केला आहे. हे त्रिमूर्ती म्हणजे प्रा. प्रभाकर भागवतवार, प्रा. मदन पलसाने व प्रा. चंद्रशेखर देशपांडे़ यांचा सत्कार बुधवारी, ३० जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. नितीन करमाळकर यांच्या हस्ते होणार आहे. या त्रयींवर लिहिलेले ‘मेमोयर्स इन ट्रिब्यूट’ हे पुस्तक पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. राम ताकवले यांचे हस्ते प्रकाशित होणार आहे. प्रा. प्रभाकर भागवतवार हे उपयोजित व औद्योगिक मानसशास्त्राचे गाढे अभ्यासक म्हणून ओळखले जातात. चंद्रपूर जिल्ह्यातील एका छोट्या खेड्यात २६ जून, १९३४ रोजी त्यांचा जन्म झाला. नागपूर येथे पदवीपूर्व शिक्षण घेऊन पदव्युत्तर शिक्षण व पीएच.डी. पुणे विद्यापीठात त्यांनी संपादन केली. प्रा. भागवतवार यांनी एस.पी. कॉलेजमध्ये मानसशास्त्र विभागाची सुरुवात करून २० वर्षे विभागप्रमुख म्हणून काम केल़ आपल्या कारकिर्दीत त्यांनी पुणे विद्यापीठात औद्योगिक मानसशास्त्र विभाग सुरू केला. पुणे विद्यापीठात मानसशास्त्र विभाग तत्त्वज्ञान विभागापासून वेगळा करून त्याला स्वायत्तता मिळवून देण्यात पुढाकार घेतला. यानंतर, १९८७ मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठात मानसशास्त्राचे विभागप्रमुख म्हणून कार्यभार सांभाळला़ तेथे ते १९९४ पर्यंत कार्यरत होते. मुंबई विद्यापीठात त्यांनी समुपदेशन केंद्र सुरू करून अनेक वर्षे त्याचे काम पाहिले व त्यास विद्यापीठाची अधिकृत मान्यता मिळवून दिली. सामाजिक व औद्योगिक विषयांवरील त्यांची ७ पुस्तके प्रकाशित झाली आहेत़ त्यांनी विकसित केलेल्या चाचण्या औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात.
अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन, मराठी मानसशास्त्र परिषद, इंडियन असोसिएशन ऑफ मेंटल हेल्थ, या संस्थांच्या माध्यमातून ते अजूनही कार्यरत आहेत. प्राध्यापक मदन पलसाने म्हणजे संख्याशास्त्र व मनोमितीय मापन शास्त्राचे दुसरे नाव म्हणता येईल. त्यांचा जन्म वाशीम जिल्ह्यातील रीसोड गावी १९३५ मध्ये झाला. बडोरे येथे पीएच.डी. पूर्ण करून त्यांनी अध्यापनास सुरुवात केली. १९७० नंतर ते पुणे विद्यापीठात रुजू झाले. १९७६ मध्ये त्यांनी विभागप्रमुखाचा पदभार सांभाळला व सुमारे २० वर्षे हे पद भुषविले. परीक्षापद्धती तसेच अभ्यासक्रमात बदल करून सेमिस्टर सीस्टिम अंगीकारण्यात त्यांचे मोठे योगदान होते. संशोधन कार्याबरोबरच एक उत्तम प्रशासक म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. विद्यापीठ विकास मंडळाचे ते पहिले संचालक होते व त्या माध्यमातून सुमारे ४० वर्षांपूर्वी त्यांनी स्कील बेस्ड शिक्षण चालू केले!
निवृत्तीनंतर त्यांनी यूजीसी, एनसीईआरटी, आयसीएसएसआर, यूपीएससी इ. राष्ट्रीय संस्थांमध्ये त्यांनी निरनिराळ्या पदांवर काम केले. त्यांनी अनेक प्रमाणित चाचण्या विकसित केल्या आहेत़ त्यापैकी शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या ‘समायोजन’, ‘आवड निवड’ व ‘अभ्यास सवयी’ या चाचण्या प्रसिद्ध आहेत़ इतर भाषांमध्येसुद्धा त्या रूपांतरित झाल्या आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन विद्यापीठ अनुदान आयोग व फाय फाउंडेशन यांनी त्यांना सन्मानित केले आहे. प्रा. चंद्रशेखर देशपांडे यांनी सामाजिक मानसशास्त्र, मनोविकृती विज्ञान व कुटुंब कल्याण या क्षेत्रात केलेले काम व संशोधन हे भारतात मान्यता प्राप्त आहे. २३ डिसेंबर, १९३८ रोजी त्यांचा नागपूर येथे जन्म झाला. तेथे पदवीपूर्व शिक्षण पूर्ण करून पुणे विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. पूर्ण केली. ते १९६९ मध्ये पुणे विद्यापीठात प्रपाठक म्हणून रुजू झाले़ १९८९ पर्यंत ते कार्यरत होते. या काळात त्यांनी अनेक महत्त्वाचे प्रकल्प राबविले व त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले.
बँकिंग सिलेक्शन संस्थेमध्ये त्यांनी ८ वर्षे प्रमुख ‘टेस्ट अॅडमिनिस्ट्रेटर’ म्हणून काम पाहिले. पुणे विद्यापीठाचे बोर्ड ऑफ स्टडिज, तसेच ऑल इंडिया सायकॉलॉजिकल कौन्सिलचे कार्याध्यक्षपद त्यांनी भूषविले. इंडियन सायकॉलॉजिकल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. मुंबई विद्यापीठाच्या विभागप्रमुखपदी १९९४ मध्ये त्यांची नेमणूक झाली़ त्या वेळी त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टडिजचे कार्याध्यक्ष म्हणून काम पाहिले. प्रा. देशपांडे यांनी अनेक संशोधन प्रकल्प राबविले़ ४० हून अधिक शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ते सादर केले. व्यक्तिमत्त्व विकास, आंतरजातीय विवाह, जीवनातील ताणतणाव यावर विपुल लेखन केले, यावर अनेक पुस्तके प्रसिद्ध केली. इंडियन असोसिएशन ऑफ ह्युमन बिहेवियर व ह्युमन एज्युकेशन सोसायटी यामधून त्यांनी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मानसशास्त्राचे प्राध्यापक व विद्यार्थ्यांकरिता व्यासपीठ उपलब्ध करून दिले व त्याद्वारे त्यांचे काम चालू आहे.
(लेखक मानसशास्त्राचे अभ्यासक आहेत.)