ॲलन ट्युरिंग : स्त्री आहे की पुरुष? मानव आहे की संगणक?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 01:41 PM2022-01-29T13:41:37+5:302022-01-29T13:43:54+5:30
ॲलन ट्युरिंग यांची टेस्ट विचारते, उत्तर देणारा माणूस आहे की संगणक? आज हाच प्रश्न आपल्याला खुद्द संगणकच - म्हणजे कॅपचा विचारतो!
विश्राम ढोले
एका पार्टी गेमची कल्पना करा. एक स्त्री आणि एक पुरुष एकेका खोलीत बंद आहेत. बाहेर राहून तुम्ही ओळखायचे की, कोणत्या खोलीत कोण आहे. त्यासाठी तुमच्याकडे फक्त एकच साधन- कितीही प्रश्न विचारा. खोलीतून टाईप केलेले उत्तर मिळेल. ते बरोबर की, चूक, सरळ की, फसवे हा मुद्दा नाही; पण जी उत्तरे मिळतील त्यावरून अंदाज बांधायचा, की आतील व्यक्ती स्त्री आहे की पुरुष. इमिटेशन गेम नावाचा हा खेळ एकेकाळी ब्रिटिश मध्यमवर्गीय पार्ट्यांमध्ये लोकप्रिय होता. घटकाभराची करमणूक यापलीकडे कोणी त्याला महत्त्व दिले नाही. पण, महान ब्रिटिश गणितज्ज्ञ, कूटभाषातज्ज्ञ ॲलन ट्युरिंग यांना त्यात कृत्रिम बुद्धिमत्ता जोखण्याची प्राथमिक चाचणी दिसली. १९५० साली प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या कम्प्युटिंग मशीन अँड इंटेलिजन्स या अतिशय महत्त्वपूर्ण शोधनिबंधाची सुरुवातच या खेळाने होते.
इथे फरक एवढाच आहे की, बाहेरच्या व्यक्तीला खोल्यांमध्ये स्त्री आहे की पुरु, याऐवजी मानव आहे की संगणक हे ओळखायचे आहे. ट्युरिंग यांचा दावा होता की, पुढील पन्नासेक वर्षांमध्ये संगणकाची क्षमता इतकी वाढेल की, खोलीतून येणारे उत्तर माणसाने दिले आहे की संगणकाने, हे बाहेरच्या माणसाला सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त अचूक ओळखतादेखील येणार नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात ख्यातनाम असलेली ट्युरिंग चाचणी (टेस्ट) ती हीच. ती तेव्हाही विवादास्पद होती. आजही आहे. पण, ट्युरिंग यांच्या त्या शोधनिबंधाचे महत्त्व मात्र वादातीत आहे. एकतर यंत्र माणसासारखा विचार करू शकतील का, या मूलभूत प्रश्नाला त्यांनी त्यात थेट हात घातला होता. असा प्रश्न विचारणारे ते पहिले नव्हते. सतराव्या शतकातील तत्वज्ञ, गणितज्ज्ञ रेने देकार्तपासून ते मागील लेखात ज्यांचा उल्लेख आला त्या एदा लोवलेसपर्यंत अनेकांनी यावर भूमिका मांडली होती. एदाने तर, यंत्र कधीच स्वतःहून विचार करू शकणार नाही, असे निःसंदिग्धपणे म्हटले होते. ट्युरिंग यांनी या निबंधात अशा सर्व आक्षेपांचा विस्ताराने समाचार घेतला होता. यंत्राला माणसासारखी बुद्धी आणि भान येईल का, वगैरे प्रश्न व्यापक आणि तात्विक आहेत. त्यापेक्षा एखाद्या प्रश्नाला यंत्राने दिलेले उत्तर मानवी प्रतिसादासारखे आहे का, हा खरा व्यावहारिक प्रश्न आहे, असे ट्युरिंग यांचे म्हणणे होते. इमिटेशन गेमची चाचणी हे त्याचेच व्यावहारिक रुप.
पण, फक्त चाचणी सांगून ते थांबले नाहीत. माणसासारखी उत्तरे देण्याची क्षमता संगणकांमध्ये कशी आणता येईल याचा एक मार्गही त्यांनी सुचविला. त्यांचे म्हणणे होते की, संगणकाला प्रौढ माणसासारखे नाही तर, बालकासारखे वागवा. मोठ्या माणसांसारखे सारे काही एकदम सांगून टाकू नका. हळूहळू सांगा. नियम नाही कृती सांगा. चुकांमधून शिकू द्या. उदाहरणार्थ, बुद्धिबळाच्या सर्व चाली डोक्यात आधीच टाकण्याऐवजी, सतत खेळायला लावून संगणकाला शिकण्यासाठी अवकाश मिळवून द्यायचा. संगणकाला ‘अभ्यास’ करू द्यायचा. उत्तर बरोबर आले तर, बक्षीस आणि चुकले तर, फटका हे साधे तत्त्व पाळायचे. तसे झाले तर, संगणक चुकांमधून शिकेल. स्वतःच्या समजुती आणि आज्ञावली सुधारून घेत जाईल.
- कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात आज त्याला मशिन लर्निंग म्हणतात, त्यामागचा हा सूत्ररुप विचार. त्याची पायाभूत मांडणी केली ती ट्युरिंग यांनी. मुलांप्रमाणेच संगणकालाही शिकण्यासाठी काही प्राथमिक नियम (खेळ) आणि विदेचे (डेटा) भलेमोठे मैदान उपलब्ध करून द्यावे लागते. स्पष्ट उल्लेख नसला तरी ट्युरिंग यांच्या तर्कामध्ये विदेला असे स्थान अभिप्रेत होतेच. म्हणूनच ट्युरिंग यांच्या या मांडणीला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे.
ट्युरिंग यांच्या या विचारांना प्रत्यक्ष कामाचा आणि त्यातील उत्तम यशाचा आधार होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनांचे अतिशय क्लिष्ट कूट संदेश उलगडण्याची कामगिरी त्यांनी बजावली होती. जर्मनांच्या एनिग्मा (गूढ) मशिनद्वारे निर्माण होणारे कूट संदेश उलगडण्यासाठी ब्रिटिश सरकारने एक गोपनीय विभाग निर्माण केला होता. तिथे १९३८ ते १९४५ या काळात ट्युरिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गणितीय आणि संगणकीय प्रणालींद्वारे एनिग्माची अनेक गूढ उकलली. काही युद्ध इतिहासकारांच्या मते तर, ट्युरिंग आणि सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली नसती तर, महायुद्ध आणखी किमान दोन वर्षे चालले असते आणि काही लाख लोक त्यात मरण पावले असते. ट्युरिंग यांनी निर्माण केलेली ती यंत्रे आजच्या अर्थाने संगणक नव्हते. पण, आजच्या संगणक आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मुळाशी असलेल्या गणित, नियम, आज्ञावली आणि शक्यतांचे जाळे अशा अनेक तत्त्वांचा तो पहिला आणि यशस्वी आविष्कार होता. म्हणून पुढे कितीतरी वर्षे संगणकांना ट्युरिंग मशिन्स असेही संबोधले जाई. ट्युरिंग यांच्या नाट्यमय आणि शोकात्म आयुष्यावर आधारित दी इमिटेशन गेम (२०१४) या चित्रपटामध्ये त्या काळाचे आणि घडामोडींचे अतिशय सुंदर चित्रण आहे.
ट्युरिंग यांनी सुचविलेल्या इमिटेशन गेमच्या चाचणीत उत्तर देणारा संगणक आहे की, माणूस हे माणसाला ओळखायचे असते. आज सत्तरेक वर्षांनी बरोब्बर उलटी स्थिती आलीय. आज संगणकच आपल्याला विचारतोय की, उत्तर देणारे तुम्ही मानव प्राणी आहात की, (त्याच्यासारखे) यंत्रमानव (बॉट). कॅपचा नावाची ही चाचणी आपल्यापैकी बहुतेकांना माहीत आहे. माणूसच बरोबर उत्तर देऊ शकेल असे काही साधेसे प्रश्न विचारून कॅपचा प्रणाली ठरविते की, उत्तरे देणारी बुद्धी माणसाची आहे की, संगणकाची. उत्तर देणारा माणूस आहे की, संगणक हा ट्युरिंग टेस्टचा प्रश्न आजही कायम आहे. फक्त ते विचारणारा आणि ठरवणारा बदलला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासाचा विलक्षण प्रवास या बदलांतून शोधावा लागतो.
(माध्यम, तंत्रज्ञान, संस्कृती या विषयांचे अभ्यासक आहेत)
vishramdhole@gmail.com