सण पर्यावरणपूरक करण्यावर भर हवा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 07:38 AM2018-11-13T07:38:08+5:302018-11-13T07:38:52+5:30
दृष्टिकोन
सर्वोच्च न्यायालयाने रात्री ८ ते १0 या वेळेतच फटाके फोडण्याचे आदेश दिल्याने गेल्या दिवाळी सणाच्या काळात त्याचे कोणते परिणाम होतात याकडे सर्वांचं लक्ष खिळलं होतं. यंदा फटाके फुटण्याचं प्रमाण २0 ते ३0 टक्क्यांनी कमी होतं. एकूणच ध्वनी आणि वायुप्रदूषणाच्या मुद्द्यावर जनजागृती वाढत जाणे अपेक्षित आहे.
फटाक्यांमुळे प्रदूषण होणं ही बाब आता काही नवीन राहिलेली नाही. सर्वसामान्यांना या प्रदूषणाचा त्रास होतो. पन्नास - साठ वर्षांपूर्वीपर्यंत प्रदूषण नव्हतं. वाहनांची संख्या तेव्हा आजच्या इतकी नव्हती. झाडांची बेसुमार कत्तलही आजच्या इतकी झाली नव्हती. पण गेल्या काही वर्षांत परिस्थिती झपाट्याने बदलली. जे बदल झालेत त्या बदलांनी पराकोटीची स्थिती गाठली आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटाके वाजवण्याबाबत दिलेला निर्णय हा काही तडकाफडकी दिलेला नाही. असा निर्णय देण्यामागे एक विचार असतो. न्यायालयाने फटाके वाजवण्यावर बंदी घातलेली नाही तर वेळेची मर्यादा ठरवून दिली आहे. कारण कशावर तरी बंदी घातली की त्या क्षेत्रातला भ्रष्टाचार वाढतो, असा आजवरचा अनुभव आहे.
आपल्या समाजात कित्येक बाबतींत तारतम्य बाळगलं जात नाही. एकदा मुभा मिळाली की ऊस मुळापासून खायचा ही सर्वसाधारण मानसिकता असते. घटनेने आपल्याला हक्क दिलेत आणि त्यासोबत जबाबदाऱ्याही दिल्यात याची जाणीव क्वचितच ठेवली जाते. न्यायालयाने दिलेला लोकहिताचा निर्णय हा आपल्यासाठी आणि पुढील पिढ्यांसाठी हितकारक आहे, हे सर्वांत आधी लक्षात घ्यायला हवं. तो निर्णय देताना वैज्ञानिक कारणं, अर्थकारण असे वेगवेगळे मुद्दे न्यायालयाने तपासलेले असतात. त्यामुळे त्याचे दूरगामी परिणाम हे इष्टच असतील, यात शंका बाळगण्याचं कारण नाही. वास्तविक फटाक्यांचा आणि धर्माचा काहीही संबंध नाही. सर्वांनी दीपावलीनिमित्त दिव्यांचा सण साजरा करावा, एकत्र यावं, फराळ करावा अशीच परंपरा आहे. आपल्या सणांची वैशिष्ट्यं अशी की, आपले सगळे सण मूळात पर्यावरणपूरक आहेत. पण नंतर आपणच ते पर्यावरणदूषक केले आहेत. त्यामुळे आता समाजाने न्यायालयाने दिलेला निर्णय आनंदाने स्वीकारत त्याचं पालन केलं पाहिजे.
न्यायालयाने दिलेले निकाल विज्ञानाच्या कसोटीवर उतरलेले असतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालांची दखल घेतलेली असते. राज्य घटनेच्या चौकटीत आपण हे निकाल स्वीकारले पाहिजेत. मार्गदर्शक तत्त्वांची दखल घेतली पाहिजे. अगदी आता लहान मुलांनाही हे पटतं. पण मोठ्यांना ते पटत नाही हे दुर्दैव आहे. काळाच्या ओघात सार्वजनिक गणेशोत्सव, रंगपंचमी यांसारख्या सणांचं स्वरूप बदलत आहे. नको त्या अट्टाहासापायी सणांच्या काळात प्रदूषण वाढतं. परिणामी कान, नाक घसा यांसारख्या असंख्य आजारांचं प्रमाण वाढतंय, याचीही दखल सर्वांनी घेणं आवश्यक आहे. फटाके वाजवू नका, असे आवाहन मुख्यमंत्री यांनी केलं. त्याचप्रमाणे धर्मगुरू, राजकीय नेते, सेलिब्रिटी यांनी असं आवाहन करण्यात आघाडीवर राहिलं पाहिजे. समाज मनावर त्याचा योग्य तो परिणाम होतो. आपले सण पर्यावरणपूरक कसे करता येतील ते आपणच कटाक्षाने पाहिलं पाहिजे.
डॉ. महेश बेडेकर
ध्वनिप्रदूषणाचे अभ्यासक