सण आणि उत्सवही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:27 AM2017-10-18T00:27:28+5:302017-10-18T00:27:48+5:30
दिवाळी सण देशाच्या विविध भागात उत्साहाने साजरा होत आहे. हा सण अवघ्या भारताचा. त्यामुळे सर्वत्र दिव्यांची रोषणाई, रंगीबिरंगी रांगोळ्या, ठिकठिकाणी लावलेले आकाशकंदिल, कमी-अधिक प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी, मिठायांचा गोडवा जाणवू लागला आहे.
दिवाळी सण देशाच्या विविध भागात उत्साहाने साजरा होत आहे. हा सण अवघ्या भारताचा. त्यामुळे सर्वत्र दिव्यांची रोषणाई, रंगीबिरंगी रांगोळ्या, ठिकठिकाणी लावलेले आकाशकंदिल, कमी-अधिक प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी, मिठायांचा गोडवा जाणवू लागला आहे. अर्थात दरवर्षी तो या पद्धतीने साजरा होतोच. पण आता दिवाळीचे महत्त्व वाढू लागले आहे. गेल्या काही वर्षांत अंधार दूर करणारा, दिव्यांचा हा सण केवळ भारतापुरता मर्यादित न राहता, जगभर साजरा होऊ लागला आहे. तो केवळ भारतीयांचा वा हिंदूंचा न राहता समस्त मानवजातीचाच बनून गेला आहे. म्हणजेच इतर देश, धर्म यांनीही तो उत्सव म्हणून स्वीकारला आहे. ख्रिसमस हा जसा केवळ ख्रिश्चनांचा राहिला नाही, तशीच दिवाळीही केवळ एकाच धर्माची राहिलेली नाही आणि त्यामुळेच ती जगभर साजरी होताना दिसत आहे. एखाद्या धर्मीयांचा वा देशवासीयांचा कोणताही सण जगभरात उत्सव म्हणून साजरा होणे, ही मोठी बाब म्हणायला हवी. एकेकाळी मुस्लीम राष्ट्र असलेल्या पाकिस्तानमध्ये दिवाळी साजरी करण्यावर बंदी होती. पण तिथेही गेली काही वर्षे दिवाळी साजरी होते. दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफही त्यात सहभागी झाले होते. अनेक मुस्लीम संघटनांची दिवाळीच्या शुभेच्छा देणारी पोस्टर्स तिथे पाहायला मिळतात. श्रीलंका, नेपाळ, म्यानमार, सुरिनाम, मलेशिया, त्रिनिदाद आदी देशात भारतीय वंशाचे लाखो लोक वर्षानुवर्षे राहतात. तिथे ते मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी करतातच. पण आता तेथील सरकारांनीही दिवाळीनिमित्त सुटी जाहीर केली आहे. म्हणजे दिवाळी त्या देशांचाही जणू अधिकृत उत्सव झाला आहे. सिंगापूर, इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, न्यूझीलंड, फ्रान्स, जर्मनी, आॅस्ट्रेलिया, स्पेन, अफगाणिस्तान, चीन, रशिया या देशांनाही आता दिवाळी नवी राहिलेली नाही. तिथे असंख्य भारतीय असणे, हे दिवाळी साजरी होण्याचे प्रमुख कारण आहेच. पण तेथील स्थानिक लोक दिवाळीच्या उत्सवात सहभागी होताना, स्वत:हून तेही दिवाळी साजरी करताना दिसणे, ही बाब अधिक आनंददायी. म्हणजे दिवाळी आता हा केवळ सण नव्हे तर उत्सव बनून गेला आहे. एकप्रकारे या उत्सवाचे जागतिकीकरण म्हणजे ग्लोबलायझेशनच झाले आहे. दिवाळीच्या काळात या देशांत गेल्यास केवळ भारतीयांच्या वस्त्या व घरांमध्येच नव्हे, तर त्यांच्या राजधानीच्या शहरांमध्येही दिव्यांची रोषणाई दिसते. भारतीय नसलेल्या लोकांच्या घरांवरही आपल्यासारखे विविध रंगांचे आकाशकंदिल लावलेले दिसतात. आयफेल टॉवरपासून, अमेरिकेतील टाइम्स स्क्वेअरपर्यंत आणि लंडनच्या ट्रॅफलगर स्क्वेअरपासून न्यूझीलंडमधील आॅकलंडच्या स्काय टॉवरपर्यंत केलेली विद्युत रोषणाई खरोखरच अभूतपूर्व असते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसमध्येही दिवाळीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना त्यांनी अनेक भारतीयांना तसेच विविध देशांच्या राजदूतांना दिवाळी महोत्सवासाठी व्हाईट हाऊसमध्ये निमंत्रित केले होते. थोडक्यात सांगायचे तर दिव्यांचा सण सर्वधर्मीयांनाच हवाहवासा वाटू लागला आहे. आयुष्य अनेकदा अतिशय नीरस असते. त्यातील तोचतोचपणा नकोसा असतो. त्यातून बाहेर पडण्यासाठी जीवनात काहीतरी वेगळे हवे असते. त्यामुळेच सण व उत्सवांना अधिक महत्त्व येते. पण बºयाचदा सण जाती-धर्मापुरते मर्यादित राहतात. अशा वेळी एखादा सण उत्सव म्हणून जाती, धर्म, पंथ, प्रांत देश यांच्यापलिकडे जाऊ न साजरा होतो, तेव्हा त्याचा गोडवा वाढतो. दिवाळीचा आनंद द्विगुणित होण्याला आणखी मिळालेले हे कारणच म्हणता येईल.